शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. मुस्लिम
  4. »
  5. मुस्लिम धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

'ख्वाजा मेरे ख्वाजा'

ND
आशुतोष गोवारीकरच्या 'जोधा अकबर' या चित्रपटातील 'ख्वाजा मेरे ख्वाजा' हे गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. या गाण्याच्या शेवटी अकबराच्या भूमिकेत असलेला ह्रतिक रोशन नृत्य करताना दाखविला आहे. बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चनने हा चित्रपट पाहिला तेव्हा तो अत्यंत प्रभावित झाला. या नृत्याची तुलना त्याने १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या '२००२ स्पेस ओडेसी' या हॉलीवूडच्य चित्रपटाशी केली. या चित्रपटात काही तरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न केला होता. तोच प्रयत्न या गाण्यातून दिसून येतो, असं अमिताभचं म्हणणं आहे. हे गाणं सुरू असताना अचानक ह्रतिक उठून नाचायला लागतो आणि समाधीवस्थेत जातो. या गाण्याची कल्पना आशुतोषने मांडली तेव्हा त्याचे चित्रीकरण कसे करायचे असा प्रश्न पडला. पण ह्रतिकने अप्रतिम पद्धतीने हे गाणं सादर केलं आहे. त्याआधीचा ह्रतिक वेगळा होता, असं वाटावा असे त्याचे हे नृत्य आहे.

ही सुफी कव्वाली गुणवान संगीतकार ए.आर.रहमान याने संगीतबद्ध केली आहे. रहमानची अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्यावर मोठी श्रद्धा आहे. तो म्हणतो, 'ख्वाजा साहेबांवर गाणं तयार करायची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण संधी मिळत नव्हती.' अखेर २००५ मध्ये मी माझ्यासाठी हे गीत तयार केले. ते गायलेही स्वतःच. आशुतोषने 'जोधा-अकबर'साठी सिच्युएशन सांगितली त्यावेळी मी या गाण्याविषयी त्याला सांगितलं. आशुतोषने कव्वाली ऐकली आणि लगेच ती चित्रपटात घेण्यास मान्यता दिली.

IFM
या गाण्यात जे नृत्य दाखविले आहे, ते म्हणजे ध्यान स्थितीत जाण्याचा विधी आहे. मौलाना जलालुद्दीन मोहम्मद 'रूमी' यांच्या पंथाचे अनुयायी अशा पद्धतीने नृत्य करून ईश्वराशी लीन होण्याचा मार्ग अवलंबतात. सर्वशक्तीमान परमेश्वराशी संपर्क साधण्याचे माध्यम त्याला मानले जाते. पाश्चिमात्य जगात तर सध्या या नृत्याची अतिशय 'क्रेझ' आहे. 'रूमी' यांचे विचार माहिती आहेत, वाचले आहेत, असे सांगणे ही देखिल फॅशन झाली आहे. वास्तविक 'रूमी' याहूनही बरेच काही होते. त्यांचा जन्म १२०७ मध्ये अफगाणिस्तानातील बल्ख या प्रांतात झाला. त्यावेळी तो भाग फारसी साम्राज्याचा भाग होता. त्यांचे वडिल बहाउद्दीन अतिशय विद्वान होते. सुफी पंथाचे ते अनुयायी होते. मंगोलियन आक्रमकांनी बल्ख प्रांतावर हल्ला केला त्यावेळी बहाउद्दीन पश्चिमेकडे स्थलांतरीत झाले. अखेरीस ते तुर्कस्तानातील कोर्‍या शहरात वसले. त्यावेळी हा भाग रूम साम्राज्याचा भाग होता. त्यामुळेच जलालुद्दीन यांच्या नावात 'रूमी' जोडले गेले. या भागात आल्यानंतर बहाउद्दीन एका मदरशाचे प्रमुख बनले. त्यांच्या मृत्यूनंतर २५ वर्षाच्या रूमीने त्यांच्या जबाबदार्‍या आपल्या खांद्यावर घेतल्या. पण १२४४ मध्ये झालेल्या एका घटनेने त्यांचे जीवनच पूर्णपणे बदलले.

  एका कथेनुसार, शम्सच्या मृत्यूनंतर एके दिवशी बाजारातून जात असताना रूमी यांनी हातोडीचा 'ठक ठक' असा आवाज ऐकला. या आवाजाने त्यांना संमोहित केले आणि ते उभे उभे गोल गोल फिरू लागले.      
त्या दिवशी बाजारातून जात असताना त्यांची भेट शमसुद्दीन (शम्स) यांच्याशी झाली. शम्स हे पोहोचलेले दरवेशी होते. काही जण त्यांना सणकीही समजत. शम्सला एका चांगल्या मित्राची गरज होती. योगायोगाने रूमी त्यांच्यासमोर आले आणि ते दोघेही चांगले मित्र बनले. त्यावेळी शिक्षक, दार्शनिक, बुद्धिजीवी असलेल्या रूमी यांनी सर्व पुस्तके फेकून दिली आणि ते पूर्णपणे शम्सच्या भजनी लागले. प्रकाशाच्या दिशेने जाणारा मार्गदर्शक त्यांना मिळाला होता. पण त्यांची मैत्री काहींना पाहावली नाही. विशेषतः रूमीच्या नातेवाईक आणि शिष्यांना. त्यांनी एके दिवशी शम्सची हत्या केली. त्यामुळे तरी रूमी भौतिक जगात परततील असे त्यांना वाटले. पण त्यांची आशा फोल ठरली. उलट रूमी शम्सच्या विरहात बुडून गेले. या एकाकीपणात स्वतःच्या अंतर्मनात डोकावताना त्यांना शम्सच्या अस्तित्वाची जाणीव झाली. यातूनच त्यांनी आपल्या या गुरूला आदरांजली म्हणून 'दिवाण ए शम्स ए तबरेज' हे पुस्तक प्रसिद्ध केले.

  बासरी वाजविणे म्हणजे जीवांमध्ये प्राण फुंकण्यासारखे मानले जाते. त्यानंतर खाली वाकून परस्परांना अभिवादन केले जाते. मग सर्व समाजन आपल्या अंगातील काळे वस्त्र फेकून देतात. हे असत्याला त्यागून सत्याला प्राप्त करण्याचे प्रतीक मानले जाते.      
शम्सच्या मृत्यूनंतर वेडेपिसे झालेल्या रूमी यांनी व्यथित होऊन एका खांबाला आपल्या उजव्या हाताने पकडून त्याच्या आजूबाजूला ते फिरू लागले. प्रेम आणि विरहाने ते गोल गोल फिरत राहिले. दुसर्‍या एका कथेनुसार, शम्सच्या मृत्यूनंतर एके दिवशी बाजारातून जात असताना रूमी यांनी हातोडीचा 'ठक ठक' असा आवाज ऐकला. या आवाजाने त्यांना संमोहित केले आणि ते उभे उभे गोल गोल फिरू लागले. ते सतत ४८ तास असे फिरत होते, अशी अख्यायिका आहे. अशा पद्धतीने सुरू झाली समाधीवस्थेला प्राप्त होण्याची सुफी परंपरा. पुढे रूमी यांच्या अनुयायांनी ही परंपरा पुढे नेली. १७ डिसेंबर १२७३ मध्ये रूमी परमेश्वराशी लीन झाले.

रूमी यांनी शोधून काढलेला नृत्यातून समाधी साधण्याचा विधी आता समजून घेऊया. या विधीला 'समा' असे म्हणतात. हा 'धिक्र' म्हणजे ईश्वराला भजण्याचा प्रकार आहे. त्यात भावनात्मकतेवर भर दिला जातो. मंत्रमुग्ध करणारे संगीत, अध्यात्मिक रूबाया व सतत ईश्वराचा जप व तालबद्ध गोल गोल फिरणे हे सगळे करणे म्हणजे 'समा' बांधणे. सगळे 'समाजन' एकत्र येऊन स्वतःला एका अध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवतात.

अल्लाह व पैगंबर साहेब वा त्यापूर्वी आलेल्या सर्व पैगंबरांप्रती नात-ए-शरीफची प्रस्तुती केल्यानंतर 'समा' बांधण्यास सुरवात होते. त्यानंतर होतो 'कदम'. त्यात ड्रमसारख्या वाद्याच्या ध्वनीवर पुढे येऊ लागतात. हा आवाज म्हणजे ईश्वराची हाक मानली जाते. त्यानंतर 'ने' वाजवली जाते. ही एक प्रकारची बासरी आहे. बासरी वाजविणे म्हणजे जीवांमध्ये प्राण फुंकण्यासारखे मानले जाते. त्यानंतर खाली वाकून परस्परांना अभिवादन केले जाते. मग सर्व समाजन आपल्या अंगातील काळे वस्त्र फेकून देतात. हे असत्याला त्यागून सत्याला प्राप्त करण्याचे प्रतीक मानले जाते. उंटाच्या केसांपासून बनलेली टोपी व पांढरे पायघोळ वस्त्र म्हणजे गर्वाची कबर आणि कफन यांचे प्रतीक असते. यानंतर समाजन आपले दोन्ही हात बांधून छातीवर ठेवतात. या अवस्थेत ते १ चे प्रतिनिधीत्व करून इश्वर एक आहे, हे सांगत असतात. त्यानंतर मग बाजूला उभ्या असलेल्या शेखची (गुरू) समामध्ये जाण्यासाठी अनुज्ञा मागतात. त्यानंतर मग ते गोल फिरणे सुरू करतात. हळू हळू ते हात उघडतात. उजवा हात वर नेऊन परमेश्वराशी आणि डावा हात खाली नेऊन धरतीशी संपर्काचा प्रयत्न करतात. उजवीकडून डावीकडे फिरत ते मनात अल्लाहचा नामजप करतात. संपूर्ण सृष्टी आपण कवेत घेतली असून प्रेमाचा प्रवाह आपल्यातून वाहतो आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण होते. गोल गोल फिरण्याची चार सत्रे असतात. ती पंधरा मिनिटे चालतात. याला चार सलाम असे म्हणतात. चौथ्या सलाममध्ये शेख म्हणजे गुरूही सामील होतात. कुराण पठणानंतर समा थांबवला जातो.

नीट पाहिलं तर या अध्यात्मिकतेही भौतिकावस्था दिसून येते. गोल गोल फिरण्याच्या या प्रकारात हे समाजन म्हणजे सूर्याभोवती म्हणजेच ईश्वराभोवती फिरणारे ग्रह वाटतात. परिवलन आणि परीभ्रमणाचाच आभास यातून होतो. थोडक्यात सत्यापर्यंत जाण्याचाच हा प्रयत्न वाटतो. संगीत व नृत्य या अवस्थेतून हे सत्य मिळविले जाते. आशुतोष गोवारीकरने हे नृत्य पडद्यावर दाखवून त्या प्राचीन परंपरेची ओळख नव्याने घडवून दिली आहे.