गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. मुस्लिम
  4. »
  5. मुस्लिम धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

रमझान

मुस्लिम दिनदर्शिके नुसार नववा महिना रमझानचा असतो. याच महिन्यात सर्वशक्तीमान अल्लाने मोहम्मद पैगंबर यांना दिव्य संदेश दिला. याच संदेशाचे एकत्रीकरण कुराण या पवित्र धर्मग्रंथात करण्यात आले आहे.

त्यामुळे रमझान महिन्याचे पावित्र्य पाळण्यासाठी या महिन्यात उपवास करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या काळात उपवास करणे म्हणजे आत्मताडन करणे असा याचा अर्थ नसून सवर्शक्तीमान अल्लाप्रती समर्पण व्यक्त करण्याची संधी या महिन्यात मिळते.

कुणी आजारी असल्यास व प्रवासात असल्यास त्याला ते दिवस नंतर उपवास करून भरून काढण्याची मुभा आहे. रमझानच्या काळात श्रद्धायुक्त अंतःकरणाने उपवास केल्यास व सर्वशक्तीमान अल्लाच्या कृपेची याचना केल्यास मागचे सर्व पाप धुतले जाते, असे मानले जाते.

या काळात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करून रात्री हलका आहार घेतात. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, परिचित यांच्या भेटीगाठी घेतल्या जातात. मुस्लिम धर्मात ज्या पाच पवित्र बाबी सांगितल्या आहेत,

त्या या काळात पूर्ण केल्या जातात. प्रार्थना, उपवास, जकात (दान) आणि आत्मपरिक्षण यांमध्ये हा महिना घालविला जातो. हा काळ संपूर्ण समाजाला बांधून ठेवणारा, एकत्र आणणारा आहे. ईद उल फितर ने या महिन्यातील उपवासाची सांगता होते.