गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. जैन
  3. जैन धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

प्रमुख जैन तीर्थ क्षेत्र

संपूर्ण भारतात जैन धर्माची अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. बिहारमधील सम्मेद शिखर, कुलुआ डोंगर, गुणावा, पावापुरी, राजगृही, कुंडलपूर, चंपापूर व पाटणा ही प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत.

1. सम्मेद शिखर- पूर्व रेल्वेवरील पारसनाथ किवा गिरीडिह स्टेशनपासून अनुक्रमे चौदा व अठरा मैलावर हे तीर्थक्षेत्र आहे. पारसनाथ व गिरीडिह येथून शिखरजीला जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. या तीर्थक्षेत्रात वीस तीर्थंकर व पुष्कळशा मुनींना मोक्षप्राप्ती झाली आहे.

2. कुलुआ डोंगर - घनदाट जंगलात हा डोंगर आहे. गया येथून या ठिकाणी जाता येते. त्यासाठी दोन मैल चढाई करावी लागते. या डोंगरावर दहावे तीर्थंकर शीतलनाथजी यांनी तप करून केवलज्ञान प्राप्त केले होते.

3. गुणवा- गुणवा हे ठिकाण पाटणा जिल्ह्यातील नवादा स्टेशनपासून साधारणतः दीड मैल अंतरावर आहे. येथून गौतम स्वामींना मोक्ष प्राप्त झाला होता.

4. पावापुरी- बिहारमधील बिहार शरीफ स्टेशनपासून पावापुरीचे अंतर बारा किलोमीटर आहे. येथे जाण्यासाठी नवादा येथून बससेवा उपलब्ध आहे. येथून भगवान महावीर यांना मोक्षप्राप्ती झाली होती. येथील जलमंदिर प्रेक्षणीय आहे.

5. राजगृही- राजगृही बिहार शरीफ येथून चोवीस मैलाच्या अंतरावर तर राजगिरी कुंड स्टेशनपासून चार मैलाच्या अंतरावर आहे. येथील विपुलाचल, सोनागिरी, रत्नागिरी, उदयगिरी व बैभारगिरी हे पाच पर्वत प्रसिद्ध आहेत. येथून पुष्कळ मुनींना मोक्षप्राप्ती झाली आहे.

6. कुंडलपूर- कुंडलपूरचे अंतर नालंदा स्टेशनपासून साधारणतः तीन मैल आहे. कुंडलपूर भगवान महावीरांचे जन्मस्थान असल्याचे मानण्यात येते.

7. चंपापूर- भागलपूर स्टेशनवरून येथे जाता येते. येथून वासूपूज्य स्वामी यांना मोक्षप्राप्ती झाली होती.

8. पाटणा- येथील गुलजारबाग स्टेशनजवळच एका छोट्याशा टेकडीवर पादुका स्थापित करण्यात आल्या आहेत. येथून सेठ सुदर्शन यांना मुक्तीलाभ प्राप्त झाला होता.