गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टविनायक
Written By वेबदुनिया|

श्री चिंतामणी

अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली.

गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते चढवले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.

गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. 100 वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला 40 हजार रूपये लागले होते.

हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. चिंतामणीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या.

त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या 27 वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपती समोरच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिध्दी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.

जाण्याचा मार्ग :

पुण्यापासून थेऊर अवघे 22 किलोमीटर आहे. पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर लोणी मार्गे आपण थेऊरला जाऊ शकतो.