मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. डॉ.आंबेडकर
Written By वेबदुनिया|

ओढ दीक्षा भूमीची !

मोहन राठोड

MHNEWS
नागपूरचे सारे रस्ते सध्या दीक्षा भूमीच्या दिशेने वाहताना दिसत आहेत. 56 वर्षापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या पवित्र भूमीत आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दीक्षा दिली होती. त्याचे स्मरण म्हणून या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने बौध्द बांधव नागपुरात येतात.

'आँरेज सिटी ' बरोबरच नागपूरची ओळख आता दीक्षा भूमीच्या नावाने होऊ लागली आहे. येथे बांधण्यात आलेले स्तूप हे एक उत्तम वास्तूशिल्पाचा नमुना आहे. येथील वास्तू पाहण्यासाठी आणि अभ्यासणासाठी अभ्यासक येतात.

'दीक्षाभूमी' ही पवित्र भूमी झाली आहे. गेल्या तीन वर्षापासून मी जवळून न्याहळतो आहे. येथे येणारा भाविक कांही मिळविण्यासाठी नव्हे तर येथील माती कपाळाला लावण्यासाठी येतो. हजारो मैलावरुन लाखोंच्या संख्येने लोक येतात. बसने, रेल्वेने मिळेल त्या वाहनाने येतात. जो येतो तो येथून काही तरी घेऊन जातो. काही तरी म्हणजे बाबासाहेबांचे विचार...

सुमारे १५ ते २० लाख लोक शहरात येतात. प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी केली जाते परंतु येथे येणारा बौध्द बांधव शिस्तीत येतो. कुठलीही गडबड गोंधळ होत नाही. चेंगरा चेंगरी होत नाही. आपापल्या भक्तीभावात रममाण होतात. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही मोठया संख्येने बौध्द बांधव येतात. त्यांची शिस्तबध्दता खरोखरच वाखाणण्यासारखी असते.

या ठिकाणचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे पुस्तकांची दालने! अनेक प्रकाशन संस्था या ठिकाणी येतात. नवनवी पुस्तके पाहायला मिळते. तरुणापासून ते वृध्दापर्यंत बहुतांशी लोकांच्या हातात पुस्तक दिसते. या पुस्कातून बाबासाहेबांचे विचार वाचायला मिळते. त्यांचे विचारच तर आम्हाला बळ देऊन जाते, अशा कृतज्ञेचे भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसते.

या ठिकाणी अंध, अपंग, वृध्द, अशिक्षित, सुशिक्षित, कलावंत सर्वच स्तराचे लोक पाहायला मिळतात. दीक्षाभूमीवर येणार्‍या बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी, त्यांनी केलेला त्याग आणि त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांची आठवण व्हावी यासाठी बीड जिल्हयातून केज या गावातील ४० वर्षीय विष्णू शेषराव ओव्हाळ दहा वर्षांपासून नित्यनेमाने दीक्षाभूमीवर येतात. येथे बाबासाहेबांची गाणी गातात. त्यांची पत्नी वंदना ही तुणतुण्याची साथे देते. मोठी बहीण हरीबाई घाडगे या विष्णूच्या सुरात सूर मिळवितात. सोपान घाडगे हार्मोनियम वाजवितात.विष्णू जन्मापासून आंधळा आहे. सूर-तालांच्या आविष्कारात त्याचे अंधत्व कुठेच आड येत नाही.

ढोलकीवरील त्याची थाप थेट ऐकणार्‍याच्या हृदयाला साद घालते. ७० वर्षांचे अंध सोपान हे विष्णूला लयबध्द साथ देतात. विष्णू आणि मंडळी ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक, विष्णू शिंदे यांची सर्वच गाणी गातात. बाबासाहेबांच्या गाण्यावर आतापर्यंत जगलो आहे. यापुढेही जगेन, असा आत्मविश्वास आहे. जगण्यासाठी मला पैसे नकोत. परंतु माझ्या या गाण्यातून बाबासाहेबांनी केलेल्या त्यागाचा एकदा तरी विचार करा, अशी कळकळीची विनंती आपल्या गाण्यामधून करतो. त्याच्या कलेला सलाम करावा असा कलावंत ! त्यांच्याकडे पाहून 'जरी आंधळा मी तुला पाहतो ' या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

प्रसंग दुसरा पाहायला मिळाला. फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! हातात काठी. डोक्यावर लाल पगडी आणि बोधिवृक्षाखाली थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करुन बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७५ वर्षीय वृध्द. वयाने थकलेला मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृध्दाचा हा प्रवास २३ वर्षांपासूनचा आहे.

कबीरदास गायकवाड त्या व्यक्तीचे नाव आहे. लातूर जिल्हयातील निलंगा या गावातून ते आले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले. २३ वर्षांपासून दीक्षाभूमीवर येतोय. घरची मंडळी वय झाल्यामुळे जाऊ देत नाही गुपचुप आलो. राहावतच नाही. येथे येऊन आपल्या लोकांची गाठभेट होते. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगतो. अशिक्षित असलो तरी जे काही चार गोष्टी माहीत आहे ते सांगतो.

शाळा शिकणं म्हणजे बाबासाहेबांची भक्ती करण्यासारखं आहे. बाबासाहेबानं त्याग केला म्हणून आपण सुखी आहोत. कबीरदास दीक्षाभूमीवरुन घरी जाताना परिसरात भोजन वाटणार्‍यांना पाच किलो तांदूळ देऊन जातो आणि पुढच्या वर्षी कुणाले उपासी ठेऊ नका अशी कळकळीची विनंतीही करतात. माणूस मोठा नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे झाल्याची प्रचिती आल्यावाचून राहात नाही, हे दोन अनुभव प्रतिनिधीक स्वरुपात म्हणावी लागेल असे असंख्य लोक भेटतात.

दीक्षा भूमीच्या पवित्रस्थळी येणार्‍या प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडत असते. दीक्षा भूमीचा सोहळा कधी संपूच नये असे वाटत होते. यानिमित्ताने जनसागर जवळून पाहता आला. अनेकांचे विचार ऐकायला मिळाले.