शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By वेबदुनिया|

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकारांची ओळख घटनाकार, घटनातज्ञ, कायदेपंडित, अर्थतज्ञ अशा अनेक अंगांनी जगाला परिचित आहे, परंतु, पत्रकार डॉ. आंबेडकर म्हणून अद्यापही वृत्तपत्रसृष्टीने बाबासाहेबांची म्हणावी तेवढी दखल घेतल्याचे दिसून येत नाही. वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही काही पोटभरू किंवा प्रचारकी पत्रकारिता नव्हती, तर तिला समाजोद्धाराचे पर्यायाने राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठान लाभलेले होते. या बाबीकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकतर जाणीवपूर्वक कानाडोळा केला किंवा पारंपरिक मानसिकतेमुळे या पत्रकारितेची दखल घ्यावी, असे त्यांना वाटले नसावे. 

डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), जनता (1930) आणि प्रबुद्ध भारत (1956) या नावांनी पाक्षिके चालविली. यापैकी जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन बाबासाहेबांनी स्वत: न करता सहकार्‍यांकडून करून घेतले. मात्र 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत' या दोन्ही पत्रांचे संपादन मात्र त्यांना स्वत:लाच करावे लागले. बहिष्कृत भारताच्या संपादनात बाबासाहेब स्वत: ओळ न ओळीकडे लक्ष देत असत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ''बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची सांपत्तिक स्थिती नव्हती तसेच बिनमोली संपादकी काम करण्यास स्वार्थ्यत्यागी असा दलितातील माणूसही लाभला नाही. बहिष्कृत भारताच्या संपादकाच्या प्रौढ लिखाणास दबून गेल्याने म्हणा किंवा सार्वजनिक कार्याविषयी कळकळ वाटली नसल्यामुळे म्हणा, बाहेरच्या लोकांचा त्यास मिळावा तितका पाठिंबा मिळाला नाही. अशा स्थतीत बहिष्कृत भारताचे 24-24 रकाने लिहून काढण्याची सारी जबाबदारी एकट्या संपादकास घ्यावी लागली.''

थोडक्यात, बाबासाहेबांची पत्रकारिता सखोल जाणून घेण्यासाठी 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत' ही पत्रे त्यासाठी आधारभूत आहेत. या पत्रांमधून डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे समग्र दर्शन घडते.

काय करूं आतां धरूनिया भीड। नि:शंक हें तोंड वाजविले।।
नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित।।

'मूकनायक'च्या सुरवातीलाच बाबासाहेबांनी लिहिलेल्या या ओळीतून त्यांची भूमिका स्पष्ट होते. मूकनायकाने त्याकाळी सर्वार्थाने मुक्या असलेल्या समाजाला खर्‍या अर्थाने आवाज दिला. त्याकाळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश दिसून येतात. पहिला म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि दुसरा म्हणजे समाज सुधारणा करणे. बाबासाहेबांची पत्रकारिता मात्र यापेक्षा वेगळी म्हणजेच संपूर्ण मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. वरपांगी समाज सुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाशपाताळ एक करणारे नेते याच देशात माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी, यासाठी तोंडातून शब्दसुद्धा काढायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत दुसर्‍या बाजूला माणसाला माणूसकीचे निसर्गदत्त हक्क मिळवून देण्याचा, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाबासाहेबांच्या पत्रातून केला जात होता. व्यवस्थेने हजारो वर्षांपासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला मूकनायकच्या रूपाने नवा आवाज मिळाला.

त्यातून बाबासाहेबांच्या लेखणीचे अनेक पैलूही स्पष्ट होतात. बाबासाहेबांची पत्रकारिता जशी आक्रमक, तितकीच संयमी होती. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक लेखातून त्यांच्या प्रचंड विद्धत्तेचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. मूकनायकमधील बाबासाहेबांचे लेख प्रचंड कोटीचे तत्वज्ञान होते. उदाहरण म्हणून काही वाक्ये निश्चितपणे पाहावीत.

एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणार्‍या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले, तर सर्व बोटीबरोबर त्यालाही, आधी नाही तर मागाहून का होईना जलमाधी घ्यावी लागणार आहे. (मूकनायक अंक पहिला 31 जानेवारी 1920)

राजकारणाचे सर्वसाधारण असे दोन हेतू आहेत. एक शासन व दुसरा संस्कृती. (मूकनायक अंक दुसरा 14 फेब्रुवारी 1920)
अन्याय सहन न होणे, हेच मनुष्याच्या मनाचे उन्नत स्वरूप होय. (मूकनायक - अंक 14 वा 14 ऑगस्ट 1920)

ND
पत्रकारितेसाठी आवश्यक असणारी अत्युच्च दर्जाची पात्रता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. उच्च कोटीचे तत्त्वज्ञान, प्रकांड पांडित्य, गाढा अभ्यास, समुद्राचा ठाव घेणारी विश्लेषण क्षमता याचबरोबर भाषिक सौंदर्याचे उत्तुंग दर्शन त्यांच्या पत्रांमधून होते. तत्कालीन परिस्थितीत फक्त आपल्या चळवळीची मुखपत्रे म्हणून ही वृत्तपत्रे चालविली नाहीत, तर एकूण जागतिक घडामोडींचा आढावादेखील त्यातून व्यक्त होत होता. उच्च शिक्षणासाठी लंडनला जाताना त्यांनी 'मूकनायक'ची जबाबदारी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे सोपवली. तरीही विदेशातून बातम्या, लेख व इतर माहिती ते स्वत: पाठवीत असत. बाबासाहेब शिक्षण संपवून परत येईपर्यंत मात्र ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आणि काही इतर कारणांमुळे मूकनायक बंद पडले. त्याचे त्यांना अतीव दु:ख झाले.

कोणत्याही चळवळीत वृत्तपत्राचे योगदान काय असते, याची बाबासाहेबांना पूर्ण जाणीव होती. म्हणून पुन्हा जुळवाजुळव करून 'बहिष्कृत भारत'च्या रूपाने त्यांचे नवे पाक्षिक उदयाला आले. तो दिवस होता 3 एप्रिल 1927. या पाक्षिकाच्या मांडणीतून बाबासाहेबांची पत्रकारिता सर्वार्थाने अगदीच प्रगल्भ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रातील मजकूर, मांडणी, सदरे अगदीच अप्रतिम होती. या पाक्षिकामध्ये मुख्यत: 'आजकालचे प्रश्न' नावाने चालू घडामोडींविषयीचे सदर, अग्रलेख, 'आत्मवृत्त', 'विचार-विनिमय', 'वर्तमान सार' याबरोबरच 'विविध विचारसंग्रह' अशी अनेक सदरे नियमितपणे सुरू होती.

'बहिष्कृत भारत' सुरू झाले त्याचवेळी महाड येथील धर्मसंगरालाही सुरवात झालेली होती. त्यामुळेच या काळात या पत्राने चळवळीसाठी अतिशय अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात मोलाची भर घातल्याचे दिसून येते. या पत्रातूनदेखील बाबासाहेबांचे भाषावैभव अत्यंत खुलून दिसते. उदाहरण म्हणून लोकभाषेत त्यांनी दिलेली काही लेखांची शीर्षके पाहता येतील. 'आरसा आहे, नाक असेल तर तोंड पाहून घ्या!', 'खोट्याच्या साक्षीने खरे सिद्ध होते काय?', 'आपलेपणाची साक्ष दे, नाहीतर पाणी सोड', 'गुण श्रेष्ठ की जात श्रेष्ठ', 'बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय?', 'खरे बोल निश्चयात आहे, समुच्चयात नाही' अशा प्रकारच्या लेखांमधून बहिष्कृत भारताने अक्षरश: रान पेटवले.

त्याकाळी वरवर बोलघेवडेपणाने अस्पृश्यता निवारण्यासाठी सल्ला देणारी काही राष्ट्रीय स्वरूपाची वृत्तपत्रे होती. मात्र, प्रत्यक्ष त्या कार्याला वाहून घेणारे मात्र एकमेव बहिष्कृत भारत होते. किंबहुना ही तथाकथित राष्ट्रीय वृत्तपत्रे डॉ. बाबासाहेंबाच्या आंदोलनाची टवाळी करण्यासाठी आघाडीवर असल्याचे पदोपदी जाणवते. म्हणूनच पत्रकार म्हणून बाबासाहेबांना त्याकाळी प्रस्थापित वृत्तपत्रकारांशीदेखील ‍तेवढ्याच निकराने झुंज द्यावी लागली, याची प्रचीती ही पत्रे वाचताना येते. बहिष्कृत भारताच्या दिनांक 19 जुलै 1927च्या अंकातून, ''आमच्या टीकाकारांना आमचा सवाल आहे, की तुम्ही जर एखाद्या बहिष्कृत-अस्पृश्य मानलेल्या जातीत जन्मला असता तर तुम्ही असेच शांतिब्रह्म राहिला असता काय? ... दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांना तुच्छतेने वागविण्यात येते म्हणून तुमच्या अंगाचा संताप होतो. या देशात युरोपीयन, युरेशियन लोकांसाठी वेगवेगळे आगगाडीचे डबे राखून ठेवले तर तुम्हास खपत नाही. फार काय पण एडिंबरो येथील हिंदी लोकांना तेथल्या कित्येक हॉटेलांमध्ये जाऊन गोर्‍या मडमांबरोबर नाचण्याची बंदी केली एवढ्याच गोष्टीवरून तुम्ही आकाशपाताळ एक केले! पण अस्पृश्यतेच्या पायी होणारी मानहानी आणि उन्नतीच्या मार्गात होणारी कायमची बंदी यांच्यापुढे सदरील निर्बंध म्हणजे काहीच नव्हेत, ही गोष्‍ट तुम्हाला अद्यापि पटत नाही.'' असे खडसावून विचारायला बाबासाहेब मागेपुढे पाहात नाहीत. टीकाकारांपुढे बाबासाहेब कधीही झुकले नाही, तर आपल्या विद्वत्तेने, वाकचातुर्याने आणि हजरजबाबी स्वभावाने त्यांनी त्यांच्या टीकाकारांना नामोहरम केले.

एकूणच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही त्यावेळच्या इतर पत्रकारांपेक्षा अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारी म्हणूनच भिन्न स्वरूपाची होती. त्यांना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागत होते. अशिक्षित, दारिद्रयाने पिचलेल्या समाजाचे नेतृत्व करायचे, त्यात वृत्तपत्र स्वत:च्या आर्थिक पायावर भक्कमपणे उभे नसलेले. अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही वृत्तपत्रासाठी केवळ बातम्या किंवा लेख लिहून रकानेच्या रकाने भरण्याचा धंदा त्यांनी कधीही केला नही. तर त्यातला प्रत्येक शब्द तोलून मापून लोकांपर्यंत जाईल, यासाठी ते सतत दक्ष राहिले.

सध्याच्या पत्रकारितेने डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. सध्या अनेक वृत्तपत्रे सवंग लोकप्रियतेसाठी अनेक नैतिक-अनैतिक मार्गसुद्धा बिनबोभाटपणे चोखाळताना दिसतात. वृत्तपत्र चालवणे हा व्यवसाय झाला असल्याने स्पर्धा प्रचंड वाढलेली असल्याने अनेक तडजोडी स्वीकाराव्या लागतात, अशी मल्लिनाथी करून आपल्या कृतीचे समर्थनदेखील केले जाते. आजच्या परिस्थितीत सर्व प्रकारची साधन सामग्री, तंत्रज्ञान उपलब्ध असूनसुद्धा कोणत्याही वृत्तपत्राचा मालक, संपादक जनतेच्या मनावर कायमची पकड घेऊ शकत नाही. याची कारणे अनेक असली तरी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या वृत्तपत्रांची समाजाशीच फारकत झालेली आहे. दारिद्रयरेषेखाली असलेल्या 40 कोटी जनतेच्या कोणत्याही प्रश्नांपेक्षा क्रिकेट, शेअर निर्देशांक आणि पुढार्‍यांच्या प्रसिद्धीला आजच्या वृत्तपत्रात सर्वाधिक जागा दिली जाते. आजही देशातल्या 50 टक्के लोकसंख्येला पुरेशा कॅलरीजचे अन्न मिळत नाही, ही आजच्या बातमी होत नाही. या अर्थाने देशातील कोट्यावधी बालके कुपोषित असल्याचीदेखील बातमी होत नाही. मात्र कोणता अभिनेता साईबाबांच्या दर्शनाला गेला, कोणत्या अभिनेत्यावर खटले चालू आहेत, हे मात्र वेगवेगळ्या अंगांनी चवीचवीने बातमीचे विषय होतात.

आज क्वचितच एखाद्या दैनिकाचा मालक अथवा संपादक जनतेचा पुढारी असतो, मात्र तो फक्त 'राजकीय नेता' म्हणून वावरताना दिसतो. सर्व प्रश्नांची उत्तरे राजकीय सत्तेत शोधण्याची सवय त्याला लागलेली असल्याने तो फक्त पुढारी होतो. सत्ता आणि संपत्ती या दोन कारणांसाठीच त्याचं पुढारीपण उरतं. अनेक सामाजिक विषयावर निकराची लढाई देण्याची आवश्यकता असूनही ते विषय त्याच्या गावीही नसतात. म्हणूनच आजच्या पत्रकारिता विश्वाला बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता अभ्यासण्याची नितांत आवश्यकता आहे. बाबासाहेब हे एकाच वेळी वृत्तपत्राचे संपादक होते, त्याचवेळी ते कोट्यावधी जनेतेचे नेते होते. कारण त्यांनी कधीही व्यावसायिक तडजोड केली नाही. म्हणूनच आजही पत्रकार म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कारकीर्द अंतर्मुख व्हायला भाग पाडते.