गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Modified: मंगळवार, 14 एप्रिल 2015 (12:00 IST)

बाबासाहेब समजले पाहिजेत

शतकानुशतकं ज्या बहुजन समाजाचं धर्म आणि धार्मिक रूढी परंपरा यांच्या नावानं शोषण केलं जात होतं त्यांची राजकीय उपेक्षा केलेली होती, आर्थिक नाकेबंदी केलेली होती, या सर्व प्रश्नांची सोडवणूक करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वच क्षेत्रातल्या परिवर्तनाला चालना देऊन मुर्दाड समाजाला त्यांच्या स्वत्वाचं भान निर्माण करून दिलं. म्हणूनच त्यांचा लढा, त्यांचा विचार, त्यांच्या चळवळीचे विविध पैलू लक्षात घेऊन तशा पद्धतीची वाटचाल करणे काळाची गरज आहे. बाबासाहेबांची चळवळ ही क्रांतीबा फुले-राजर्षी शाहू महाराज यांच्या  कर्तृत्वाला शिरोधार्थ मानत गतिमान झाली. जाती-जातीत, पोटजातीत विभागलेला समाज एकसंघ करू आणि जगणसाठी आवश्यक असणार्‍या साधनांची निर्मिती करू, अशा स्वाभिमानी मूल्यांना बाबासाहेबांनी आपल्या लढय़ाचा केंद्रबिंदू बनविलं होतं. हे भान बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सतत निसटलं गेललं आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. बाबासाहेबांची लढाई ही स्वाभिमानाची होती. त्यांचा लढा आत्मभान जागवणारा होता. तसा तो न्याय्य वाटा सिद्ध करणारा होता. मानवतेच्या वाटांना बाबासाहेबांच्या लढय़ानं प्रशस्त तर केलचं, परंतु तेजांकितही केलं.
 
आपण गुलाम आहोत याची जाणीवही नसलेल्या समाजाला गुलामगिरीची जाणीव करून देऊन किडय़ा मुंग्यासारखं जगू नका. तुम्हीही माणूस आहात, तुम्हालाही माणसासारखं जगण्याचा हक्क आहे. हा सामाजिक स्वाभिमानाचा संदेश देत त्यांनी या समाजातलं माणूसपणं जाणवलं. 
 
बाबासाहेब आंबेडकर हयात असताना भारतीय परंपरेतल्या सर्व व्यवस्थांना मग ती समाजसंस्था असो, धर्मसंस्था असो किंवा राजकीय क्षेत्र असो या सगळ्यांनाच त्यांचा धाक होता. त्यांच मुख्य कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या ठायी अविचल बलदंड स्वाभिमान होता. 
 
आंबेडकर अनुयायी हा अन्यायाच्या विरुद्ध झुंजणारा लढाऊ बाण्याचा शिलेदार मानला जातो. अन्यायविरुद्धची प्रखर प्रतिक्रिया स्वातंत्रनंतरच्या काळात जर कुणी दिली असेल तर ती आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. अगदी मंडल आयोगासाठी रस्त्यावर कोण आलं असेल तर ते आंबेडकर अनुयायी. प्रश्न होता ओबीसी समाजाच्या वाटय़ाचा, हा समाज अविकसित आहे. त्याच्या कल्याणासाठी   समंजसपणाची भूमिका घेऊन अतिशय आक्रमक पद्धतीनं बाबासाहेबांना शिरोधार्ह मानणारा समाज रस्त्यावर आला. पण आजच्या चंगळवादी युगामध्ये आपले सगळेच प्रश्न संपले आहेत का? हा विचार करण्याची गरज भासत आहे. वामनदादा कर्डक आपल्या काव्यातून म्हणायचे. 
 
भीमा तुझ मताचे जर पाच लोक असते; 
तलवारीच तांचे नरेच टोकं असते. 
वाणीत भीम आहे. करणीत भीम असता.
वर्तन ता पिलांचे सारेख चोख असते. 
 
वामनदादांना जी खंत वाटली त्याचं काय? मग असचं म्हणावं लागेल आजही आपण बाबासाहेबांच्या मताचे झालो नाहीत. 
 
अन्यायविरुद्ध झुंजणारी सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याची चिंता वाहणारी निकोप समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहणारी भीम ही प्रवृत्ती नष्ट झाली की काय? असा प्रश्न पडावा इतकी मनं मेलेली आहेत का? बोथट झालेली आहेत? आजूबाजूला प्रश्नाचं जाळं निर्माण होत आहे. अशावेळी त्यांच्या प्रश्नांना समोर ठेवून कुठे मोर्चा निघत नाही. अन्यायाची परिसीमा जरी झाली तरी कुठे निषेधाचा आवाज उठत नाही. एवढा मुर्दाडपणा समाजात आला की, नेतृत्वाच कमरेत बळं उरलं नाही. नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नाही. पण एक मात्र सत्य    असं आहे की, नेतृत्वात द्रष्टेपण राहिलं नाही. हे द्रष्टेपण जर असतं, तर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मोर्चाच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल असत्या. 
 
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानी वाटा निर्माण केलेल्या होत्या. आपली स्वाभिमानी राजकीय शक्ती उभी करण्याचा बाबासाहेबांनी आदेश दिलेला होता. जाती निर्मूलनाची चळवळ कशी करावी याचे धडे दिलेले होते. आर्थिक समता निर्माण करण्याची हमी दिलेली होती. पण बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी वाटा चोखाळण्याच्या ऐवजी पळवाटांचा आश्रय घेतो की काय, असे चित्र दिसत आहे. 
 
आजचा तरूण दिशाहीन झाला आहे. त्याला योग्य दिशा प्राप्त करून घ्यायची असेल त्याला आंबेडकरी चळवळ व बाबासाहेब समजले पाहिजेत, त्यासाठी लोप पावत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाली पाहिजे. यासाठी तरुणांनी वाचलं पाहिजे. विचार केला पाहिजे. चळवळीला गतिमान करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जयंती, धम्मचक्रप्रर्वतन, महापरिनिर्वाणदिन या दिवशी बाबासाहेबांचे फोटो लावून त्यांचे विचार समजणार नाहीत. विचारांचा प्रवाह असणार्‍या बाबासाहेबांच्या विचार धारेतील एक थेंब जरी विचार आपल्या आचरणात उतरवला तरच आपल्याला बाबासाहेबांची ओळख होईल, असे जेव्हा घडेल तेव्हा ती प्रज्ञासूर्यास मानवंदना ठरेल.
 
डॉ. धम्मपाल माशाळकर