शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

वर्ल्ड कप 2019 : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

वेस्ट इंडिजने 269 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव 143 धावांतच आटोपला आणि टीम इंडियाने 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 4 विकेट्स पटकावणारा मोहम्मद शमी आणि एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स पटकावणारा जसप्रीत बुमराह हे या विजयाचे शिल्पकार ठरले.
 
जसप्रीत बुमराहने एकाच ओव्हरमध्ये कार्लोस ब्रेथवेट आणि फॅबिअन अॅलन यांना माघारी धाडत वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.
 
ख्रिस गेल आणि शे होप यांना झटपट गमावलं. अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेणाऱ्या मोहम्मद शमीनेच या दोघांना तंबूत परतावलं. गेलने 6 तर होपने 5 धावा केल्या. या दोघांपाठोपाठ सुनील अंबरीस आणि निकोलस पूरन बाद झाले. जेसन होल्डरही फार काळ टिकला नाही.
 
टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारलेल्या टीम इंडियाने 268 धावा केल्या. विराट कोहलीने 82 चेंडूत 72 तर महेंद्रसिंग धोनीने 61 चेंडूत 56 धावा केल्या.
 
चौथ्या क्रमांकावर खेळण्याची आणखी एक संधी मिळालेल्या विजय शंकर 14 धावांवर बाद झाला. केमार रोचने त्याला विकेटकीपर शे होपकडे झेल देण्यास भाग पाडलं. धडाकेबाज फलंदाज केदार जाधव रोचच्या गोलंदाजीवर बाद झाला. केमार रोचच्या गोलंदाजीवर केदारने होपकडे झेल दिला. मैदानावरील अंपायरने नॉटआऊटचा निर्णय दिला. मात्र थर्ड अंपायरने हा निर्णय बदलला. केदारने केवळ एका धावेची भर घातली.
 
कोहलीने 8 चौकारांसह 72 धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यावर हार्दिक पंड्या आणि महेंद्रसिंग धोनीने सहाव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. हार्दिक 46 धावा करून बाद झाला. धोनीने 61 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली.
 
वेस्ट इंडिजतर्फे केमार रोचने 3 तर शेल्डॉन कॉट्रेल, जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
सेमी फायनलचं तिकीट पक्कं करण्यासाठी आतूर टीम इंडियाचा मुकाबला आज वेस्ट इंडिजशी होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सलामीवीर रोहित शर्मा केमार रोचच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहित बाद झाल्यावर राहुल आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या लोकेश राहुलला जेसन होल्डरनं बाद केलं.
 
टप्पा पडून स्विंग होऊन आत आलेल्या चेंडूवर रोहित फसला. बॉल पॅडला लागला आहे का बॅटला याविषयी साशंकता असल्याने मैदानावरील अंपायर्सनी नॉट आऊटचा निर्णय दिला. थर्ड अंपायरने रिप्ले पाहिल्यानंतर आऊटचा निर्णय दिला.
 
रोहित बाद झाल्यानंतर राहुल आणि कोहली यांनी सावधपणे खेळ करत धावफलक हलता ठेवला. खेळपट्टीवर स्थिरावलेला राहुल 48 धावांवर बाद झाला.
 
जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर एक धाव पूर्ण करत विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावांचा टप्पा पूर्ण केला. विराटने 417व्या सामन्यात हा विक्रम केला. सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांना मागे टाकत विराटने हा विक्रम नावावर केला.
 
20,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठणारा विराट हा तिसरा भारतीय आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी 20,000 धावांचा टप्पा गाठला होता.
 
टीम इंडियाने आतापर्यंत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला नमवलं आहे. तर न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती.
 
टीम इंडियाला सेमी फायनलसाठी अजूनही दोन विजयांची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलचं तिकीट पक्कं केलं आहे. मात्र अन्य संघांची सेमी फायनलची वारी अद्याप पक्की झालेली नाही.
 
दुसरीकडे वेस्ट इंडिजचा प्रवास मॅचगणिक अवघड होत चालला आहे. वेस्ट इंडिजने सहापैकी केवळ एक मॅच जिंकली आहे. चार मॅचमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांची यापूर्वीची मॅच ते अवघ्या पाच धावांनी हरले होते. सेमी फायनल त्यांच्यासाठी अवघड आव्हान आहे.
 
राहुल-विराट-रोहितवर भिस्त
लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या त्रिकुटावर टीम इंडियाची मोठी भिस्त आहे. अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची मधली फळी ढेपाळली होती.
 
राहुलने चांगली सुरुवात केली मात्र रिव्हर्स स्वीपचा मोह त्याला आवरला नाही आणि तो आऊट झाला. रोहित शर्मा मुजीबच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला होता. विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. तो मोठी खेळी साकारणार अशी चिन्हं असतानाच तो आऊट झाला.
 
वेस्ट इंडिजविरुद्ध या तिघांची भूमिका मोलाची आहे. मोठी धावसंख्या उभारायची असेल किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर या तिघांना मोठी खेळी साकारावी लागेल.
 
धोनी-केदार वेगवान होणार का?
अफगाणिस्तानविरुद्ध महेंद्रसिंग धोनीने 52 चेंडूत 28 धावांची संथ खेळी केली होती. धोनी आणि केदार जाधव एकत्र खेळत असताना दहा ओव्हर्सच्या कालावधीत एकाही चौकाराची नोंद झाली नाही. हे दोघे खेळत असताना स्ट्राईक रोटेट होणंही कठीण झालं होतं.
 
सचिन तेंडुलकरने या दोघांच्या खेळावर टीका केली होती. मधल्या फळीला आणखी आश्वासक खेळ करावा लागेल असं सचिनने म्हटलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये या दोघांवर चाहत्यांचं लक्ष असेल.
 
विजय शंकर स्थान टिकवणार का ऋषभ पंतला संधी मिळणार?
चौथ्या स्थानासाठी विजय शंकरच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीने त्याला बॉलिंग दिली नाही. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगचा विचार करता विजय शंकर संघात स्थान टिकवण्याची शक्यता आहे.
 
शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला. ऋषभ पंतला संधी मिळावी अशी चर्चा सोशल मीडियावर रंगते आहे. मात्र केवळ पाच वनडेंचा अनुभव असणाऱ्या ऋषभला दडपणाच्या लढतीत खेळवण्यात येणार का हा प्रश्न आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ऋषभ प्रसिद्ध आहे.
 
कुलदीपऐवजी रवींद्र जडेजा?
कुलचा अर्थात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या जोडीपैकी चहलने सातत्याने विकेट्स मिळवल्या आहेत. मात्र कुलदीपच्या गोलंदाजीवर बॅट्समन रन घेताना दिसत आहेत. कुलदीपच्या तुलनेत बॅटिंग आणि फिल्डिंग या दोन्ही आघाड्यांवर रवींद्र जडेजा अव्वल आहे. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना रोखण्यासाठी रवींद्र जडेजाला संघात संधी मिळू शकते.
 
आंद्रे रसेलची उणीव भासणार
दुखापतीसह खेळणाऱ्या ऑलराऊंडर आंद्रे रसेलचा वर्ल्ड कप प्रवास संपुष्टात आला आहे. रसेलच्या जागी सुनील अंबरीसची संघात निवड करण्यात आली आहे. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्यासाठी प्रसिद्ध रसेल यंदाच्या स्पर्धेत खेळताना दुखापतीसह खेळत असल्याचं स्पष्ट झालं होतं. रसेल फिट होईल अशी संघव्यवस्थापनाला आशा होती. मात्र दुखापत बरी होणार नसल्याने रसेल वर्ल्ड कप बाहेर गेला आहे.
 
वेगवान गोलंदाजी वेस्ट इंडिजला तारणार का?
शेल्डॉन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शॅनन गॅब्रिएल, केमार रोच आणि जेसन होलडर यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांना या वेगवान माऱ्यापासून सावधान राहावं लागेल. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना उसळत्या चेंडूंचा सामना करावा लागू शकतो.
 
वेस्ट इंडिजने सहा मॅच खेळल्या असून आतापर्यंत केवळ एक मॅच जिंकली आहे. चार मॅचेसमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांचे फक्त 3 गुण झाले असून, सेमी फायनलमध्ये स्थान त्यांच्यासाठी दुरापास्त आहे. सन्मान वाचवण्यासाठी ते उर्वरित मॅचेस खेळू शकतात.
 
चांगला खेळ करून सेमी फायनलच्या शर्यतीत असणाऱ्या टीम्सना ते दणका देऊ शकतात.
 
या वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार असल्याची घोषणा ख्रिस गेलने केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये गेलला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. शेवटच्या काही लढतींमध्ये दिमाखदार कामगिरी करण्यासाठी गेल उत्सुक आहे. गेलच्या बरोबरीने हेटमेयर, शे होप, कार्लोस ब्रेथवेट, एव्हिन लुईस, निकोलस पूरन हे जोरदार फटकेबाजी ओळखले जातात. त्यांना रोखणं टीम इंडियासमोरचं आव्हान आहे.
 
हेड टू हेड
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आठ मॅचेस झाल्या आहेत. यामध्ये भारतीय संघ 5-3 असा आघाडीवर आहे.
 
खेळपट्टी आणि वातावरण
वातावरण कोरडं आणि लख्ख सूर्यप्रकाशमय असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची आहे.
 
संघ
भारत:
विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, विजय शंकर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
 
वेस्ट इंडिज:
जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरिस, शे होप, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, फॅबिअन अॅलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्रेथवेट, ख्रिस गेल, शिमरोन हेटमेयर, एविन लुईस, अॅशले नर्स, निकोलस पूरन, केमार रोच, ओशाने थॉमस.