गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2019 (13:44 IST)

हवामान बदलामुळे गिर्यारोहण दिवसेंदिवस धोकादायक होत चाललंय का?

नवीन सिंग खडका
उंचच उंच बर्फाच्छादित हिमशिखरं अनंत काळापासून माणसाला भुरळ घालत आहेत आणि तेव्हापासूनच हिमशिखरं सर करण्याची गिर्यारोहणाची कला विकसित होत आली आहे.
 
मात्र वातावरण बदलाचा दुष्परिणाम जसा जमिनीवर जाणवतोय, तसा तो बर्फाच्छादित पर्वतरांगांवरही होत आहे. परिणामी गिर्यारोहण अधिक आव्हानात्मक बनत आहे.
 
जगातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये गिर्यारोहण दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चाललंय आणि याचं कारण आहे 'वातावरण बदल'. गिर्यारोहण तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे.
 
तापमान वाढू लागल्याने आल्प्सच्या पर्वतरांगांवरचा बर्फाचा थर पातळ होऊन दरड आणि दगड कोसळण्याच्या घटना वारंवार घडू लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
International Climbing and Mountaineering Federation या संघटनेची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत तापमान बदलाविषयी काळजी व्यक्त करण्यात आली.
 
वितळणाऱ्या हिमनद्यांमुळेही गिर्यारोहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
 
धोका वाढल्याने अनेक ठिकाणी गिर्यारोहणाचे जुने मार्गे बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी मार्ग बदलण्यात आले आहेत.
 
काही ठिकाणी तर गिर्यारोहणाचा संपूर्ण हंगामच पुढे ढकलावा लागला आहे.
 
वैज्ञानिक काय म्हणतात?
माउंट ब्लँक पर्वत शिखरांवर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांच्या मोहिमांमध्ये अनेक बदल झाल्याचं दिसून आलं आहे. या भागातल्या जवळपास सर्वच मार्गावर 1970 सालापासून परिणाम झाला आहे. काही मार्ग तर पूर्णपणे बंद झाले आहेत.
 
ग्रेनोबेल आल्प्स अँड कलिग्ज विद्यापीठातले जॅक्युस मुरे 'आर्क्टिक, अँटार्क्टिक आणि अल्पाईन रिसर्च' या नियतकालिकात लिहितात, "उन्हाळ्याच्या ज्या काळात हे मार्ग सर केले जायचे त्या काळात तिथलं वातावरण कसं असेलं, याचा अंदाज बांधणं आता अवघड झालं आहे आणि चढाईसाठी जो सर्वोत्तम काळ मानला जायचा तोदेखील वसंत ऋतू आणि पानगळीच्या ऋतूकडे सरकत आहे. हे मार्ग पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक बनल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे."
2017 साली एका फ्रेंच टीमने मॉन्ट ब्लँक पर्वतशिखरांवर झालेल्या अनेक मोहिमांचा अभ्यास केला. यात असं आढळलं की 1850 ते 2015 या काळात पर्माफ्रॉस्टचं (ध्रुवप्रदेशातील कायम गोठून असलेली जमीन) लक्षणीय नुकसान झालं आहे. तिथले उतार अस्थिर होऊन दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.
 
ऑस्ट्रेलियन आल्प्सच्या अभ्यासातही अशीच निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत.
 
व्हिएन्नामधल्या नॅचरल रिसोर्सेस अँड लाईफ सायन्सेस विद्यापीठातले फ्लोरियन रिटर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतंच 'बायोवन कम्प्लिट' या नियतकालिकात लिहिलं आहे, "यातले अनेक मार्ग अत्यंत धोकादायक बनले आहेत."
 
"दरड कोसळणे, दगड पडणे यामुळे पूर्व आल्प्समधल्या अनेक उत्कृष्ट हिमशिखरांचं नुकसान झालं आहे. तसंच उन्हाळा सरताना आणि शरद ऋतूच्या सुरुवातीला इथला बर्फ वितळतो. त्याचाही परिणाम हिमशिखरांवर झालेला दिसतो."
 
या अभ्यासात गिर्यारोहण अधिक आव्हानात्मक होण्यामागे आणखीही काही घटकांचा उल्लेख केला आहे.
 
"जागतिक तापमानवाढीचा परिणाम झाला असला तरी मुसळधार पावसासारख्या जागतिक तापमानवाढीशी संबंध नसलेल्या घटनांचाही परिणाम होत असतो", असं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे.
 
स्वित्झर्लँडच्या बर्निज आल्प्सवर गिर्यारोहण करणाऱ्या गिर्यारोहकांसाठी असलेल्या माहिती पुस्तिकांच्या अभ्यासावरूनही या बदलांची पुष्टी होते.
 
नेदरलँडमधल्या वॅगेनिंग विद्यापीठातले भूगोलशास्त्रज्ञ आणि सहलेखक अर्नॉर्ड ट्रेमे म्हणतात, "या माहिती पुस्तिकांमध्ये गिर्यारोहकांच्या अनेक पिढ्यांनी संपूर्ण पर्वतरांगांमध्ये चढाई करताना येणाऱ्या धोक्यांच्या माहिती नोंदवली आहे."
 
ते पुढे म्हणतात, "यातली सर्वात जुनी माहिती पुस्तिका जवळपास 146 वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे दिर्घकाळात इथे काय बदल झाले, हे आम्हाला कळले आणि या बदलांचा वातावरण बदलाशी संबंध जोडून दाखवता आला."
 
आल्प्समधल्या मॅटरहॉर्न पर्वतावर गेल्या दहा वर्षांत वायरलेस सेंसर्स बसवण्यात आले आहेत. हे सेंसर्स बर्फाच्या कडा, पर्माफ्रॉस्ट आणि हवामान याची अचूक माहिती पुरवतात.
 
मॉनिटरिंग प्रोजेक्ट राबवणारे संशोधक जॅन ब्युटेल सांगतात, "या सेंसर्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक गोष्ट स्पष्ट जाणवते की बदलाचा वेग खूप जास्त आहे."
 
"हा वेग इतका जास्त आहे की काही शिखरांवर यापुढे भेट देता येणं शक्य नाही."
 
न्यूझिलँडमधल्या कुक पर्वतांवरही अशीच परिस्थिती आहे. हा पर्वत सर करण्यासाठी गिर्यारोहक तस्मन ग्लेशिअर नेव्हिगेट करायचे. मात्र हा हिमनग आता वितळू लागल्याने, नेव्हिगेशनमध्ये अडचणी येत आहेत.
 
गिर्यारोहकांनी केली पुष्टी
गिर्यारोहणासाठीचे मार्ग आता अधिक खडतर होत असल्याचं आणि बदल स्वीकारावेच लागतील, असं माहिती पुस्तिकांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
 
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ माउंटेन गाईड असोसिएशन्सचे अध्यक्ष क्रिस्टियन ट्रॉम्सडॉर्फ म्हणतात, "सर्वात मोठं आव्हान दगड कोसळण्याचं आहे. बदलत्या वातावरणाचे परिणाम वेगवेगळे असले तरी काही पर्वतांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसतं तर काही ठिकाणी कमी परिणाम दिसून येतो."
 
अशाच प्रकारचा अभ्यास हिमालयातल्या पर्वतरांगांवरही करण्यात आला आहे. या पर्वतरांगांमध्येही चढाई करणं अवघड झालं आहे.
 
पातळ बर्फावर किंवा उघड्या दगडांवर क्रॅम्पॉन (काटे असलेले शूज) वापरणे धोकादायक असतं.
 
नेपाळ माउंटेन गाईड असोसिएशनचे उपाध्यक्ष शेरिंग पांडे भोटे म्हणतात, "क्रॅम्पॉन वापरणं म्हणजे गुळगुळीत फरशीवर हाय हिल घालण्यासारखं आहे. जेव्हा पुरेसा स्नो आणि बर्फ असतो तेव्हा क्रॅम्पॉनला चांगली ग्रीप मिळते. मात्र आता हा स्नो आणि बर्फ कमी होतो आहे."
 
हिमनद्यांमधल्या वाढत्या भेगादेखील चिंतेचा विषय असल्याचं हिमालयीन गाईड्सचं म्हणणं आहे.
 
भोटे म्हणतात, "हिमनद्यांमधल्या भेगा विशेषतः पृष्ठभागाखालच्या भेगा रुंदावत असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. बर्फ वेगाने वितळत असल्यामुळे हे घडतंय."
 
हिमालयात विशेषतः एव्हरेस्टच्या भागातल्या हिमनद्या वेगाने आक्रसत आहेत. एव्हरेस्टची चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांना सर्वात आधी कुंभू ग्लेशिअर ओलांडावा लागतो. मात्र, या हिमनदीत आता पाण्याची अनेक तळी दिसू लागली आहेत. ही हिमनदी वेगाने वितळत असल्याने त्यातली तळी एकमेकांना जोडली जात आहेत.
 
गाईड्ससाठी प्रशिक्षण
हिमशिखरांवरची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, अवघड परिस्थितीत चढाई कशी करायची, यावर सायप्रसमध्ये होणाऱ्या International Federation of Climbing and Mountaineering संघटनेच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
 
ट्रॉम्सडॉर्फ म्हणतात, "या दिशेने आम्ही काही पावलं उचलणार आहोत. मात्र, आम्हाला अधिक संशोधनाची आणि डेव्हलपमेंटल सपोर्टची गरज आहे."
 
परिस्थिती बदलत असली या बदलांचा आम्ही उत्तमरित्या स्वीकार करत असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.