बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : गुरूवार, 21 एप्रिल 2016 (14:13 IST)

महाबलीपूरम् मंदिर

तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई. याच चेन्नईपासून सुमारे 55 कि.मी. अंतरावर आहे सुप्रसिद्ध महाबलीपूरम् मंदिर. पूर्वी याच मंदिराच्या आवाराला माम्मलापुराम असे नाव होते. काळाच्या ओघात त्या नावाचा अपभ्रंश होत गेला आणि महाबलीपूरम् रूढ झाले. अर्थात महाबलीपूरम् हे निव्वळ एक मंदिर नसून हे आवार आहे.
 
यात 100 हून अधिक वेगवेगळी मंदिरे आहेत, असे मानले जाते. तमिळनाडूमधील अनेक भव्य आवारांपैकी हे एक प्राचीन स्थान मानले जाते. सागर तटावर हे मूळ मंदिर बांधलेले आहे.
 
सातव्या शतकामध्ये ही पल्लव राजाची राजधानी होती. द्रविड वास्तुकलेच्या दृष्टीने पाहिल्यास या मंदिराचे स्थापत्यशास्त्र अग्रणी स्थानावर होते. समुद्र तटावरील या मंदिरामध्ये अनेक शिवमूर्ती आणि लहान लहान मंदिरे दिसून येतात.
 
पुरातन काळात शिवसंकल्पनेमागे काय विचार होते, ते कसे विस्तारित केले गेले हे या मंदिराच्या शिल्पकलेतून आपणास अभ्यासता येऊ शकते. ‘चित्रभाषा’ हे या आवाराचे वैशिष्टय़ आहे. म्हणजेच मंदिराचा इतिहास लिखित स्वरूपात न कोरता आकृत्याच त्या गोष्टीरूपात मांडलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही भाषेची गरज न भासता कोणीही या मंदिराचा इतिहास समजून घेऊ शकतो. भारतातील प्राचीनपैकी खूप कमी मंदिरांबाबत हा असा विचार झाला आहे.
 
येथील लोकप्रिय रथ मंदिराच्या दक्षिणेला स्थित आहे. महाभारतातील पाच पांडवांच्या नावाने त्याला पांडव रथ म्हणतात. महाबलीपूरममधील प्रवेशाकडील भागातील दगडाच भव्य शिला फोडून कृष्ण मंडप उभारला गेला आहे.
या मंडपाच्या प्रवेशद्वारावर तेथील ग्रामीण जीवनावर आधारित कथा कोरलेल्या आहेत.
 
भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलल्याचा प्रसंग तर अप्रतिम म्हणावासा चित्रबद्ध केला गेला आहे.
 
मंदिरावरील कोरीव काम हे अतीव कोरीव असे आता राहिलेले नाही. कारण इतक्या शतकानंतर वातावरणाचा परिणाम कलाकृतींवर झालेला आहे. तरीही साधेपणा आणि सौंदर्य यांचा उत्तम मिलाफ या सर्व मंदिरांमध्ये दिसून येतो. या मंदिराभोवती अनेक भव्य पिवळसर रंगाच्या  शिळा आहेत. या दगडाचे वैशिष्टय़ म्हणजे कितीही उन्हाचा मारा असला तरी हा दगड विशेष तापत नाही. वराह येथील गुहा प्रसिद्ध आहेत. 
 
राजा पल्लवाच्या 4 मननशील द्वारपालांसाठी! शिवाय या गुहा इतिहास अभ्यासकांतही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहेत.