बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जन्मदिवस निमित्त : आशा भोसले

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण द्विगुणित करण्यासाठी आणि दु:खाच्या क्षणी ताण-तणाव दूर करण्यासाठी धावून येणारी ही गायिका. वैयक्तिक जीवनानुभवाच्या बळावर सुरांना आकृतिबंध देणारी, सातत्याने निरनिराळी स्वरलेणी ल्यालेली ही गायिका. ‘गोरी गोरी पान’ यासारख्या गीतांच्या जोडीने त्यांनीच आपले बालपण आनंदी केले. आंब्याच्या वनात नाचणारा मोर दाखविला. ‘हृदयी प्रीत जागते’, असे म्हणत ‘जीवलगा’ अशी आर्त साद घातली. ‘हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम’ अशी ग्वाही दिली. ‘पान खाए सैया हमारो’ असे म्हणत म्हणत ‘भँवरा बडा नादान’ हेही सांगितले. पी. सावळाराम, पाडगावकर, सुधीर मोघे या कवींच्या कवितांना सुरांची घरं दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या मादक आवाजाची जादू जागती ठेवली. इना-मिना-डिका सारखी बोलगाणी म्हटली, तशीच ओ.पी. नयंरच्या ठेकेबाज चालीही गायल्या. ‘उमराव जान’ मध्ये लताबाईंसह श्रवणानंदाची मेजवानीही दिली. हिंदी-मराठीच नव्हे, तर इतर अनेक भाषांत विविध संगीत प्रकार आपल्या गळ्यातून अस्सलपणे उमटविणारी ही पार्श्वगायिका.