मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2015 (11:01 IST)

रणबीरचे हेलिकॉप्टर जमिनीवरच, शूट रद्द

छोटी विमाने, हेलिकॉप्टर्स यांचे जाळे महाराष्ट्रात विणण्याची घोषणा सरकारी स्तरावर होत असतानाच, स्थानिक पातळीवर असलेल्या उदासीन आणि निष्क्रियतेचा अनुभव अभिनेता रणबीर कपूर याला आला. कर्जतजवळच्या एनडी स्टुडिओत जाहिरातीच्या शूटिंगसाठी झटपट पोहोचण्यासाठी जुहूवरून हेलिकॉप्टरने जाण्याची तयारी रणबीरने केली. मात्र, यासाठी खालापूर पोलिसांकडून हवी असलेली परवानगीची वाट पाहत त्याला दोन तास जुहू विमानतळावरच रखडावे लागल्याने हे शूटच अखेर रद्द झाले.
 
मुंबईतील शूटिंग आटोपून एनडी स्टुडिओत सूर्यास्तापूर्वीचे काही मोक्याचे तास शूटिंग करायचे होते. त्यामुळे जाहिरात कंपनीने तिथे रणबीरला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती. हेलिकॉप्टर जर खासगी हेलिपॅडवर उतरणार असेल, तर त्यास जिल्हाधिकारी परवानगीची गरज नसते. मात्र कोणतीही कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून स्थानिक पोलीस ठाण्यास सूचना दिली जाते. त्यानुसार, राज्याच्या नागरी हवाई वाहतूक विभागाकडून सर्व रीतसर परवानग्याही घेतल्याची माहिती हेलिकॉप्टर कंपनी व जाहिरात कंपनीतील सूत्रांनी दिली. त्यानंतर, दुपारी सव्वा वाजता जुहूवरून टेकऑफची परवानगीही मिळाली होती. मात्र, खालापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांनी हेलिकॉप्टर उतरण्यासाठी आवश्यक असलेले परवानगीचे पत्र स्वीकारण्यासच नकार दिला. त्यामुळे परवानगीची प्रतही मिळू शकली नाही. 
 
वारंवार आग्रह करूनही खालापूर पोलिसांनी पत्र घेतले नाही. उलट जिल्हाधिकार्‍यांकडून परवानगी आणण्याचाच आग्रह धरला. हे नाट्य तिकडे घडत असताना दोन तास रणबीर जुहूला ताटकळला होता. अखेर, ही परवानगी दिवसभरात येणारच नसल्याचे दिसल्यावर हे शूट रद्द करावे लागले.