शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 30 मे 2015 (17:21 IST)

वर्णभेदामुळे अमेरिका सोडावं लागलं

अमेरिकेत आपल्यालाही वर्णभेदाला सामोरं जावं लागलं.. तेही इतक्या मोठय़ा प्रमाणात की त्यामुळे आपल्याला अमेरिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा खुलासा प्रियांका चोप्रा हिनं नुकताच केलाय. 
 
12 वर्षाची असताना प्रियांकाला अमेरिकेत शिक्षणासाठी धाडण्यात आलं होतं. परंतु, इथं शाळेत तिला वर्णभेदाला सामोरं जावं लागलं. मला आठवतं की जेव्हा मी शाळेत शिकत होते तेव्हा तिथं मला सगळे जण ‘ब्राऊनी’ म्हणत हिणवत होते, असं प्रियांकानं म्हटलंय. अमेरिकेत भारतीयांकडे नेहमीच एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. भारतीय लोक डोकं हलवत बोलतात, असं म्हणून तिथं भारतीयांची टर उडवली जाते तसंच आपल्या शैलीचीही टर उडवली जाते. यालाच कंटाळून मी अमेरिका सोडून भारतात परतले होते, असं प्रियांकानं म्हटलंय. 
 
प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, मूळ भारतीय असलेल्या एखाद्या मुलीला हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तरी ती एखाद्या भारतीय कुटुंबातील एखादी भूमिका असते (उदाहरणार्थ इंडियन आई) किंवा अशी एखादी मुलगी जी अरेंज मॅरेजचं कल्चर दर्शवते. आज अमेरिकेतल्या एका हॉलिवूड प्रोडक्शनचा भाग असलेल्या प्रियांकाला आता मात्र अमेरिकेचा भारताकडे पाहाण्याचा दृष्टिकोन थोडाफार  बदलल्याचं जाणवतंय. प्रियांका सध्या हॉलिवूडचा एक कार्यक्रम ‘क्वान्टिको’मध्ये एलेक्स वीवर नावाच्या एफ बीआयच्या एजंटच्या भूमिकेत दिसतेय.