गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

’सिनेमातून ‘पिंगा’ काढा

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव-मस्तानी’ या आगामी चित्रपटातील ‘पिंगा’ नृत्य इतिहासाला धरून नसल्याने ते काढून टाकावे, अशी मागणी पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा यांनी केली आहे. चित्रपटातील नृत्य लावणी पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पिंगा’ नृत्यावर सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रियांकाने या चित्रपटात थोरल्या बाजीरावांची पत्नी काशीबाई यांची; तर दीपिकाने मस्तानीची भूमिका साकारली आहे. या दोघींवर चित्रित करण्यात आलेले ‘पिंगा’ नृत्य इतिहासाला धरून नाही; तसेच ती लावणी ढंगाने चित्रित करण्यात आल्याची भावना पेशवा यांनी व्यक्त केली. पिंगा नृत्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादाविषयी बोलताना पेशवा म्हणाले, की ‘पेशवे हे मराठी राज्याच्या छत्रपतींचे पंतप्रधान होते. अशा पंतप्रधानांची पत्नी असणारी कुलीन स्त्री अशा पद्धतीने नृत्य करणे अशक्य होते. तसे संदर्भही मिळत नाहीत. त्या काळच्या स्त्रिया घराबाहेर पडतानाही अंगभर वस्त्र लपेटून बाहेर पडत. लोकांमध्ये जाऊन नृत्य करणे, ही तर शक्यताही नव्हती. पिंगा गाण्यात पारंपरिक नृत्य नसून, ते लावणीसारखे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यामुळे कुलीन मराठी स्त्रिया अशा प्रकारची नृत्ये करत असल्याचा गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे गाणे सिनेमातून काढून टाकावे, अशी आमची मागणी आहे.