शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...
Written By वेबदुनिया|

तिकीटांचे दर कमी ठेवायला हवेत- सनी देओल

चंद्रकांत शिंदे

PR
सनी देओल पत्रकारांना जास्त भेटत नाही आणि भेटलाच तरी तो जास्त बोलत नाही. परंतु मंगळवारचा दिवसच वेगळा होता. सनी सुपर साउंडच्या पाचव्या मजल्यावरील सनीच्या आलिशान केबिनमध्ये सनीने आपल्या नव्या राइट या राँग चित्रपटानिमित्ताने वेबदुनियाशी खास संवाद साधला. गप्पांच्या वेळेस तो खूपच चांगल्या मूडमध्ये होता आणि त्याने केवळ चित्रपटांशी संबंधितच प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर प्रथमच त्याने आपल्या मुलांबद्दलही माहिती दिली. खरे तर देओल परिवार आपल्या कुटुंबियांविषयी जास्त बोलत नाही परंतु सनीने मुलांबद्दल प्रश्न विचारला असता माहिती दिली आणि सनी बदलला असल्याचे जाणवले.

राइट या राँग कशा प्रकारचा चित्रपट आहे?
हा अत्यंत वेगळा चित्रपट आहे. खरे तर आता वेगळा शब्द वापरायचा म्हणजे भीती वाटते कारण सगळेच आपल्या चित्रपटाला वेगळा, हटके चित्रपट म्हणतात. या चित्रपटासारखा चित्रपट मी आजवर केला नाही आणि अशी भूमिकाही साकारली नाही. लेखक नीरज पाठक ने अपनेच्या वेळेस जेव्हा मला चित्रपटाचे कथानक ऐकवले तेव्हाच मी त्याला म्हटले की चित्रपट केव्हा सुरु करूया? मी यात एका पोलिस इंस्पेक्टरची भूमिका साकारली आहे. मी चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलणार नाही कारण हा रहस्यमय चित्रपट आहे. माझी एक्शन नायकाची इमेज आहे परंतु यात मी एक्शन करताना दिसणार नाही. हा चित्रपट रहस्यमय थ्रिलर आहे. बुद्धीची चुणूक दाखवणारे हे कथानक आहे. यात एक-दोन वेळाच खरी एक्शन आहे असे असले तरी संपूर्ण चित्रपटभर एक्शन जाणवत राहते. नीरज पाठकने अत्यंत उत्कृष्टरित्या हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

पण हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता?
हो होणार होता. परंतु नंतर काय झाले ते मला ठाउक नाही आणि मी त्याकडे लक्षही देत नाही. माझे काम आहे अभिनय करणे आणि ते मी पूर्ण केले होते. आता मार्चमध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि सुभाष घई व नीरज पाठक यांनी मला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुलाखती देण्याची विनंती केली म्हणून मी तुला मुलाखत देत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास उशीर का झाला याचे उत्तर नीरज पाठकच देऊ शकेल.

PR
आज चित्रपटाचे मार्केटिंग आवश्यक झाले आहे. मार्केटिंगमुळे चित्रपट चालतो का?
चित्रपटाचे मार्केटिंग आज ज्या पद्धतीने केले जात आहे ते चुकीचे आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक गोष्टीचे मार्केटिंग करणे गरजेचे असते परंतु आजचा प्रेक्षक, आजचाच नव्हे तर पूर्वीपासूनच प्रेक्षक चोखंदळ आहे. त्याला बर्‍यावाईटाची चांगलीच जाण आहे. त्यामुळे एखादा चित्रपट प्रचंड हवा निर्माण केल्यानंतरही तिकीट खिडकीवर आपटतो तर एखादा मार्केटिंग न करताही सुपरहिट होतो. मार्केटिंग केल्यामुळे चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना होते. चित्रपट चांगला असेल, चांगला म्हणजे चित्रपटाचे कथानक चांगले असेच तरच चित्रपट चालतो. थ्री इडियट हिट झाला, मी तो पाहिला नाही परंतु मला वाटते की त्याचे कथानक चांगले असेल. चांगले कथानक असेल तर ते कोणताही दिग्दर्शक बिघडवू शकत नाही, मात्र कथानक वाईट असेल तर कोणीही काहीही करू शकत नाही. आज चांगल्या लेखकांची बॉलीवुडला गरज आहे. चांगले कथानक नसल्यामुळेच मी अत्यंत कमी चित्रपटात दिसतो. राइट या राँगचे कथानक मला आवडले म्हणून मी हा चित्रपट केला. मात्र कधी कधी कथानक चांगले वाटते आणि पडद्यावर येईपर्यंत त्याची वाट लागलेली असते तेव्हा तो चित्रपट अयशस्वी होतो. मला अनेक वेळा याचा अनुभव आलेला आहे. आज निर्माता चित्रपट फक्त शहरात चालला की नाही हे पहातो जे चुकीचे आहे.

काही जणांना वाटते की ते फक्त एलिट क्लाससाठी चित्रपट तयार करतात. खरे तर देशाच्या ग्रामीण भागातील प्रेक्षकांच्या जीवावरच चित्रपटसृष्टी चालली आहे. मात्र आज त्यांचाच विसर सगळ्यांना पडला आहे. तिकीटांचे दर कमी करून जास्तीत जास्त प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे वळवण्याऐवजी तिकिटांचे भरमसाठ दर वाढवून ठेवलेत जे चुकीचे आहे. पूर्वी मोबाइल महाग होते तेव्हा कमी लोकांकडे होते आज स्वस्त झाले आहेत तर सगळ्यांकडे आहेत. चित्रपटसृष्टी उलट दिशेने प्रवास करीत आहे. खरे तर याचा सगळ्यांनी विचार करावयास हवा. कमी तिकीट दर असतील तर चित्रपट जास्त दिवस आणि जास्त व्यवसाय करतील. आज चित्रपटांचा व्यवसाय फक्त तीन दिवसांपुरता मर्यादित राहिलेला आहे.

PR
विजेता फिल्म्स सध्या काय करीत आहे?
आम्ही नव्याने विजेता फिल्म्सची रचना करीत आहोत. चांगले आणि दर्जेदार चित्रपट निर्माण करण्याची आमची योजना आहे. या महिन्यात आम्ही यमला पगला दीवाना चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहोत ज्यामध्ये मी, बॉबी आणि पिता धर्मेंद्र पुन्हा एकत्र दिसणार आहोत. हा विनोदी चित्रपट आहे. मीसुद्धा यात प्रथमच विनोदी भूमिका साकारीत आहे. चित्रपट निर्मिती करणे आज खर्चिक झाले आहे. सुरुवातीला मला पैशांचा व्यवहार समजत नसे त्यामुळे आम्हाला खूप नुकसान झाले परंतु आता मला यातील खाचाखोचा कळल्या आहेत. आमच्यावरचे सगळे कर्ज फेडून आता आम्ही नव्याने उभे रहाणार आहोत. काही कंपन्यांशी आर्थिक सहयोगासाठी बोलणी सुरू आहेत.

कार्पोरेट कंपन्यांशी का?
कार्पोरेट कंपन्या फक्त पैसा देतात परंतु त्यांना चित्रपटाचे जे वेड असायला हवे असते ते नसते. पूर्वीच्या काळी निर्माता कर्जाने पैसे घेऊन चित्रपट निर्मिती करीत कारण त्यांच्यात चित्रपटाचे वेड ठासून भरलेले असायचे त्यामुळे ते चांगले चित्रपट तयार करीत. आज फक्त पैशांच्या मदतीवर चित्रपट तयार केले जातात त्यामुळे त्यात प्राण नसतो. आम्ही कार्पोरेट कंपन्या नव्हे तर खाजगी निर्मात्यांशी सहयोगासंबंधी बोलणी करीत आहोत.

धर्मेंद्र, सनी, बॉबीनंतर देओल परिवाराची पुढील पिढीही याच क्षेत्रात येणार का? (हा प्रश्न घाबरतच विचारला होता कारण सनीला खाजगी प्रश्न आवडत नाहीत. त्याने उत्तर दिली मात्र त्यासाठी वेळ अवश्य घेतला.)

माझा मोठा मुलगा करन ज्याला आम्ही प्रेमाने रॉकी म्हणतो तो आता लवकरच परदेशात चित्रपटाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. त्याने मला अगोदरच सांगितले आहे की त्याला चित्रपटातच करिअर करायचे आहे. मुलांच्या इच्छेनुसार त्यांना काम करू दिल्यास ते चांगले काम करतात त्यामुळे त्याची इच्छा मी पूर्ण करणार आहे. माझा लहान मुलगा राजवीर जो यंदा दहावीची परीक्षा देणार आहे त्यालाही चित्रपट क्षेत्रातच काम करायचे आहे. त्याने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आम्ही या क्षेत्रात आहोत म्हणून त्यांचा प्रवेश सुरळीत होईल. परंतु या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी माझ्या वडिलांना खूप कष्ट करावे लागले याची जाण त्यांनाही आहे.

तुझ्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या द मॅनचे काम कुठवर आलेय?
६० टक्के चित्रपट तयार झाला आहे. पैशांची चणचण असल्याने चित्रपटाचे काम आम्ही थांबवले होते परंतु आता आईपीएल झाल्यानंतर शिल्पाच्या डेट्स घेऊन चित्रपटाचे चित्रिकरण आम्ही सुरू करणार आहोत. जूनपर्यंत हा चित्रपट पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे. आतापर्यंत या चित्रपटावर आम्ही खूप खर्च केला आहे आणि तेवढाच खर्च अजून करणार आहोत. यावर्षी आमचे द मॅन आणि यमला पगला दीवाना हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होतील.