शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (16:56 IST)

बालकादंबरी - गांव शिवारातील फिनिक्स

साहित्य प्रसव वेदना सहन करून निर्माण झालेली बालकादंबरी - गांव शिवारातील फिनिक्स
 
जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशन संस्थेचे प्रकाशक गुरूतुल्य मित्र डॉ. सुनिल दादा पाटील यांनी ‘गांव शिवारातील फिनिक्स’ ही बालकादंबरी मोठ्या  आपुलकीने पाठवली. पुस्तकातील टापटिपपणा, मजबूत बांधणी या प्रकाशककाकडील विशेष गुणांमुळे ही कादंबरी अधिक खुलली आहे. सदर पुस्तकांला बालकुमार साहित्य संमेलनचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यिक गोविंद गोडबोले यांनी पाठराख केली असून बालविश्वात रममानं होऊन लिहिण्यात डॉ. श्रीकांत पाटील ही यशस्वी झाले आहेत.
 
वास्तवाकडे डोळसपणे पाहता अनेक भल्या बु-या गोष्टी नजरेस पडतात. ज्यावेळी लेखन  कौशल्य अवगत नव्हतं त्यावेळी मौखिक वाङमयाद्वारे लहानग्यांच मनोरंजन केल जात असे. त्याचाच एक भाग म्हणून आपण आजीच्या गोष्टींकडे पाहतो. त्यानंतर लेखन कलेचा उदय झाला आणि मौखिक वाङमयांने लेखणीचे रूप घेतले.
 
त्यानंतरच्या काळात अनेकांनी साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारात लिखाण केले त्यातील एक थोडासा अवघड समजला जाणार प्रकार म्हणजे बालसाहित्य होय. बालसाहित्यात मुलांची आकलन क्षमता, त्यांचं जगणं समजून घेऊन केलेली साहित्य निर्मिती अव्वल ठरते याचाच प्रत्यय ‘गांव शिवारातील फिनिक्स’ वाचताना येतो.
 
कथेतील नायक हा ‘पक्या’ असून स्मशानातील झोपडी, पक्याची हुशारी, प्रेतांची भिती नसून भूकेसाठी जगण्याची भिती आणि समर्पक शेवटात कथन केल्याप्रमाणे प्रकाशची पोलिस अधिकारी पदापर्यतची झेप हे अगदी सारचं मनात रूंजी घालून जातं. साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील यांचा व्यासंग दांडगा असल्या कारणाने बालांच्या मनावर संस्काराची बीजे त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे रोवली आहेत.
 
सर्रास बालसाहित्यात मुलांच्या मनोरंजनाबरोबर योग्य संस्कार देऊन त्यांच्या आयुष्याला वळण दिले जाते. ते काम ही डॉ. श्रीकांत पाटील यांनी चोख पार पाडले आहे. ‘गांव शिवारातील फिनिक्स’ ही कादंबरी ग्रामीण भागाचा विचार करता मुलांच्या मनाचा ठाव घेणारी ठरेल पण शहरी मुलांच्या  दृष्टीने विचार केल्यास  लेखकाच्या बोलीभाषेतील काही शब्द तेथील मुलांना लवकर उमगतील असे वाटतं नाही. त्यासाठी प्रमाणभाषेतील उच्चार मागे नमुद केल्यास वावगं ठरणार नाही.
 
संकट कितीही मोठी असली तरी ती झेलणा-यांच्या ठिकाणी जिद्द, चिकाटी आणि पराक्रम असेल तर तो त्याच्या संकटाचीच राख करतो आणि यशाला गवसणी घालण्यासाठी आकाशात झेप घेतो. असा मौलिक सल्ला देऊन जीवन हरण्यासाठी नसून जीवन जिंकण्यासाठी आहे असे सांगणा-या व बालसाहित्यात एका चांगल्या साहित्य कृतीचा समावेश करणा-या डॉ. श्रीकांत पाटील यांना प्रदिर्घ साहित्य लिखाणांस शुभेच्छा! तसेच कवितासागर प्रकाशन संस्थेचे प्रकाशक डॉ. सुनिल दादा पाटील यांचेही मनोमन आभार.
 
- प्रमोद जा.चांदेकर, चंदगड (कोल्हापूर)