शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (10:53 IST)

अजरामर शिल्पकलेच्या निर्माणाची कहाणी

कुरूक्षेत्राच्या महायज्ञात संपूर्ण भारत वर्षावरील क्षात्रतेजाची आहुती पाडून सुमारे चार हजार वर्षाचा काळ लोटला असला तरी आजही कुरूक्षेत्राचे महत्व कमी झालेले नाही. इसवी सन पूर्वच्या पहिल्या सहस्त्रकाळात भारत वर्षात अनेक महानगरे, सांस्कृतिक नगरे, राजधान्या, नगर राज्ये, महानगरांचा प्रभाव भारतीय संस्कृतीवर दिसून येतो. पुनरुथानाच्या आणि संक्रमणाच्या काळात देवगिरीवर राष्ट्रकुट वंशाचे राजे दंतीदुर्ग यांचे राज्य होते. शूर, पराक्रमी, प्रजावत्सल दंतीदुर्ग राजाने अनेक कलांना राजाश्रय दिला होता. सैन्याच्या भरवशावर त्याने अनेक राज्ये जिंकून घेतले होते. उत्तरेकडील जनपदाची राजकन्या घृष्णावती हिच्याशी दंतीदुर्गाचा विवाह झालेला होता. अतिशय रूपसुंदर, प्रजावत्सल व धार्मिक वृत्तीच्या शिवभक्त असलेल्या पट्टराणी घृष्णावती ह्या जनतेच्या आदरास पात्र होत्या. पूर्वी राज्य जिंकण्यासाठी अश्वमेघ यज्ञ केला जात होता. दंतीदुर्ग राजाने आपल्या राज्याच्या विस्तारासाठी अश्वमेघ यज्ञ करून त्यांनी आपली कीर्ती दूरवर पसरवली होती. अश्वमेघ यज्ञ चालू असतांना दक्षिणेतील बदामी नगरीचा राजा पुलकेशीने तो अश्व अडविला व राजा दंतीदुर्गाला युद्धाचे आव्हान दिले. दंतीदुर्ग राजाचे कौशल्य, सैन्यबळ याच्या पुढे  पुलकेशी राजाचा निभाव लागला नाही. त्याने दंतीदुर्गराजाचे मांडलिकत्व पत्करून आपली कन्या मानकावती हिचा विवाह दंतीदुर्ग राजाशी लावून दिला.

सवतीच्या द्वेषापोटी अहंकारी मानकावतीने पट्टराणी घृष्णावतीची कायम अवहेलना तर केलीच शिवाय तिच्या पुत्राला कपटाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्ती प्रमाणे शिवभक्त असलेल्या घृष्णावतीला ईश्वरीय दृष्टांत होऊन घनदाट अरण्यात सोडलेला मुलगा तिला प्राप्त झाला. राजा दंतीदुर्ग यांनी शिवमंदिराची पुनर्बांधणी करून उत्कृष्ट शिवमंदिर उभारले. त्या मंदिराचे नाव घृष्णेश्वर असे ठेवले. इकडे मानकावतीला सुद्धा आपल्या नावे माणकेश्वर मंदिर उभारण्याचा अट्टाहास राज्यासमोर धरला. या कामासाठी राजाने राज्यातील व परराज्यातील अनेक शिल्पकारांना पाचारण केले. हे काम राजाने कलेशी इमान असलेल्या दुमार या कलाकाराच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरु केले. रात्रंदिवस शिल्प साकारण्यात मग्न असलेल्या दुमारच्या प्रेमात मानकावती पडली परंतु आपल्या कलेवर श्रद्धा असलेल्या दुमारने आपला संयम राखून काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतांनाच दुमार मधेच सोडून जाऊ नये म्हणून त्याच्याशी जाणूनबुजून गैरकृत्य करू लागली. राणीने दुमारला एकांतात गाठले आणि प्रणयोत्कट हव्यासापोटी मानकावती राणीचा अकाली मृत्यू झाला. आणि कैलास लेणी शापित झाली.

लेखक केशवराव संभाजीराव शिंदे (पाटील) यांनी मांडलेले विचार अतिशय हृदयस्पर्शी असून ही दीर्घकथा उत्कंठावर्धक आहे तसेच स्त्री मनाचे वर्णन लेखकाने उत्कृष्ट केले आहे. कोणत्याही प्रसंगी आपले नैतिक धैर्य ढळू देऊ नये असा मौलिक संदेश लेखक केशवराव संभाजीराव शिंदे (पाटील) यांनी या पुस्तकातून दिला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके असून कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. सुनील दादा पाटील यांनी मुद्रण आणि प्रकाशन अत्यंत सुबक आणि देखण्या स्वरुपात केले आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद. सदर पुस्तकास माझ्या लाख - लाख शुभेच्छा!

- नंदकुमार शंकरराव गायकवाड