testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

स्पर्धा परीक्षार्थींच्या जीवनाला कलाटणी देणारे पुस्तक - स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र

book review
Last Modified शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (10:19 IST)
आज महाराष्ट्रातील अनेक तरुण भारतीय प्रशासनाचे अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात; पण त्या विद्यार्थाना अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी अपयशाला सामोरे जावे लागते. स्पर्धा परीक्षांचे स्वरूप नेमके कसे असते, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते, मुलाखत कशी द्यावी यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतात. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा मार्ग सुकर करण्यासाठी जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास सिरीज अंतर्गत लेखक संजय मोरे द्वारा लिखित ‘स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा ठरवण्यासाठी विद्यार्थी-पालक-शिक्षक यांना मोलाची मदत होणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठीचे तंत्र अवगत करणे आवश्‍यक आहे. बॅंकिंग परीक्षेचेही तंत्र आत्मसात केल्यास बॅंकिंग स्पर्धा परीक्षा कठीण नाहीत. हे तंत्र जीवनाला कलाटणी देणारे आहे. स्पर्धा परीक्षांविषयी जाणीव जागृतीचा एक निश्‍चित पल्ला आपण गाठला आहे. मोठ्या संख्येने तरुणाई या क्षेत्राकडे वळताना दिसत आहे. करिअरविषयी स्पष्टता आणि प्रशासकीय सेवांविषयीचा स्पष्ट दृष्टिकोन आजच्या तरुणाईकडे आहे. नुकतंच प्रकाशित झालेलं ‘स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र’ या पुस्तकामुळे हा दृष्टिकोन आणखी धारदार होईल, हे निश्‍चित.

येत्या काळात राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये नोकरीच्या लाखो संधी विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. बॅंकिंग क्षेत्र विस्तारते आहे. बॅंकिंगविषयक प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना निश्‍चितच फायदा होईल; मात्र विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी होऊ नये. परीक्षेपुरता अभ्यास करण्यापेक्षा अभ्यास करण्याची पद्धती विकसित करावी. परीक्षेबाबत न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. भोवतालच्या जगातली स्पर्धा प्रचंड वाढते आहे. त्यामुळेच स्वतःची आवड बघण्यापेक्षा कुणीतरी यशस्वी झाला म्हणून आपणही त्यात यशस्वी होऊ, अशा पद्धतीने करिअरची निवड केली जात आहे. ही स्पर्धा करियरसाठीच आहे असे वाटावे असे चित्र निर्माण होत आहे. असे जरी असले तरी आपली स्पर्धा ही इतर कुणाशी नसून आपल्या स्वतःशीच आहे, असा विचार करूनच विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडले पाहिजे.
स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे उमेदवार, मग ते पूर्व-मुख्य-मुलाखत अशा कोणत्याही टप्प्यावर असोत, त्यांच्यासाठी ‘स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र’ योग्य मार्गदर्शक ठरेल. दहावी, बारावीपासून किंवा पदवी-पदविकेच्या वाटेवर असणारे विद्यार्थी, ज्यांना पुढील काळात प्रशासकीय सेवांची वाट चोखाळायची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक परफेक्‍ट गाईड ठरेल. पाल्यांच्या करिअरविषयी चिंतेत असणा-या पालकांना स्पर्धा परीक्षा समजून घ्यायला हे पुस्तक उत्तम पर्याय आहे. अलीकडे काही नवे बदल परीक्षा प्रक्रियेत झाले. परीक्षेच्या अभ्यासक्रमासह पॅटर्न बदलला. अभ्यासक्रम, प्रश्‍नांचे बदलते स्वरूप, बदलणारा पॅटर्न या सर्व गोष्टी लक्षात घेता, अभ्यासाची दिशा नेमकी कसी असावी, बदलांचे नेमके स्वरूप काय असावे, या बदलांना सामोरे जाण्यासाठी कशी तयारी केली पाहिजे, या सर्व बाबींचा ऊहापोह साध्या सोप्या भाषेत व अभ्यासू पद्धतीने लेखक संजय मोरे यांनी केला आहे. तयारीकरणा-यांच्या दृष्टीने पूर्व - मुख्य - मुलाखत या परीक्षेच्या सर्व टप्प्यांविषयी मार्गदर्शन या एकाच पुस्तकात मिळू शकते.
गुणवत्ता यादीत येणारे तेवढेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतात, असे नाही. सामान्य बुद्धिमत्तेचेही विद्यार्थी बॅंकिंग परीक्षेतून निवडले जाऊ शकतात; मात्र परीक्षेची पद्धती, बॅंकेसंबंधित विषय समजून घेतले पाहिजेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, केलेले वाचन यातून जीवनात यशस्वी होण्याचे धडे मिळतात. शिक्षणाला मर्यादा नाहीत. त्यामुळे ज्ञान मिळेल तिथून घेतले पाहिजे.
जगात सुमारे 7500 करिअर आहेत. आपल्याला तर त्यातील काही बोटांवर मोजणा-या करिअरचीच माहिती आहे. करिअर निवडण्यासाठी एक विशिष्ट पद्धती निर्माण झाली पाहिजे. मित्र किंवा मैत्रीण जी शाखा निवडेल, तिकडे आपण जायचे किंवा आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाइकांच्या चर्चेतून जी शाखा चांगली वाटेल, अशा शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा, अशा पद्धतीने सर्वसाधारणपणे शिक्षणक्षेत्र निवडले जाते. त्यामुळे स्वत:च्या आवडीनिवडी व नक्की या क्षेत्रातून मला काय शिकता येईल व या क्षेत्रामध्ये पुढे गेल्यावर मला कोणता स्कोप आहे, याचा विचारच विद्यार्थ्याने केलेला नसतो. आपले ध्येयसुद्धा कोठेतरी लिपिक किंवा शिपाई होण्याचे नसावे. त्यामुळे प्रचंड मेहनत करून, 30 - 40 वर्षे रियाझ करून शास्त्रीय गायक व्हावे व बिस्मील्लाखॉं यांच्यासारखे सनईवादक व्हावे, असा विचार करताना विद्यार्थी दिसत नाहीत. आताची पिढी जरा हिशोबी आहे. तिला पैशांचा हिशोब पटकन समजतो व पैशांच्या भाषेत सांगायचे तर सरकारी नोकरीतील अधिका-याच्या पगारापेक्षा जास्त पैसे एकाच मैफलीमध्ये मिळू शकतील व प्रचंड नावदेखील होईल; पण असे क्षेत्र निवडावे, असे मुलांना वाटत नाही. इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे की, ‘वरच्या पातळीवर अजिबात स्पर्धा नाही. कोणत्याही शिडीच्या पहिल्या पायरीपाशी जातानाच सर्वांत जास्त गर्दी असते.' 90 टक्के विद्यार्थी त्या शिडीच्या पहिल्या पायरीजवळूनच परत येतात. जे 10 टक्के विद्यार्थी शिडीपर्यंत पोचतात त्यापैकी शिडीचे वरचे टोक गाठेपर्यंत फारच थोडे विद्यार्थी उरलेले असतात.
उदाहरणच घ्यायचे झाले तर शहरी मुले कोणालाही न सांगता गुपचूप स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरतात व पालकसुद्धा त्यांना तसा सल्ला देतात हे अतिशय दुर्दैवी आहे. कारण ही स्पर्धा कोणत्याही एका बिल्डिंगमधील मुलांची नसून बाहेरील 5 लाख मुलांशी होत आहे हे लक्षात घ्यावे. किंबहुना मला असे वाटते, की ही स्पर्धा इतरांशी नाहीच, ती आपल्या स्वत:शीच आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. शिवाय जे करायचे आहे, त्याचा आधी प्लॅन तयार करायला हवा. प्लॅनिंगबाबत परफेक्‍ट असलेला नेपोलियन म्हणतो, ‘मी कोणतेही युद्ध प्रथम घरी कागदावर जिंकतो, मग रणांगणावर जिंकतो.’ याचा अर्थ माणूस अगोदर मनामध्ये जिंकतो व त्यानंतर तो प्रत्यक्ष जिंकतो. लेखकांनी एकूण सोळा प्रकरणांतून प्रकाश टाकला आहे. ‘स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र’ या पुस्तकात आजवर कोठेही वाचनात न आलेली माहिती वाचायला मिळते. राज्यसेवेतील विविध सेवा व पदांची संपूर्ण माहिती पुस्तकात आहे. अभ्यासाची नेमकी सुरवात कशी करावी, मार्गदर्शक, कोचिंग क्‍लास, संदर्भ पुस्तके निवडण्याचे निकष काय असावेत, या विषयी सविस्तर चर्चा केली आहे. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेच्या प्रत्येक घटक विषयावर अभ्यासाची रणनीती, संदर्भ पुस्तकांची यादी वेगवेगळ्या प्रकरणांतून दिली आहे. वेळेचे व्यवस्थापन, वाचनाचे तंत्र, अभ्यासतंत्र व मुलाखतीचे मार्गदर्शन आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे अनिश्‍चित वेळापत्रक, परीक्षेमध्ये होणा-या गैरप्रकारांविषयी शंका-कुशंका यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची निरिच्छावृत्ती या पुस्तकामुळे दूर व्हावी. अवास्तव गैरसमज व न्यूनगंड दूर व्हावेत यासाठी नाईकवाडे आणि शहा यांनी वेगळी प्रकरणे देऊन प्रशासकीय सेवा हा करिअरचा उत्तम पर्याय असण्यावर जोर दिला आहे. योग्य मार्गदर्शन व मार्गदर्शकाची निवड या प्रकरणात शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे धडे दिलेले आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना प्रत्येक विद्यार्थ्यास चांगले काय, दर्जात्मक काय हे समजलेले असते. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी हीच एक विशिष्ट जीवनपद्धती आहे. त्या जीवनपद्धतीची सवय लागली, की विद्यार्थी शिस्तबद्ध होतो, फोकस्ड होतो. कमीत कमी शब्दांत कोणत्याही विषयाची मांडणी करायला शिकतो. कमी शब्दांमध्ये जास्त मुद्दे मांडण्याची आपल्याला सवय लागते. नाहीतर आपण शाळेत असताना सर्व उत्तरे जास्तीत जास्त शब्द वाढवून ओळी भरण्यासाठी लिहिलेली असतात. मला वाटते शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी आता मुलांना अधिक अचूक लेखन करण्याकडे वळविले पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे सर्वांनी मिळून एकत्र अभ्यास करणे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे विद्यार्थी गटचर्चेमुळे मुलाखतीमध्ये सातत्याने पुढे असतात व निबंध लेखनातसुद्धा पुढे असतात. कारण एका विद्यार्थ्याने वाचलेल्या 4 मुद्द्यांपेक्षा सर्वांनी मिळून एकत्र वाचलेले 20 मुद्दे जर एकाच वेळी लिहिता आले तर जास्त गुण मिळू शकतात. शिवाय वेगवेगळे मतप्रवाह समजण्यास मदत होते. मुलाखतीत मुख्यत: आपल्या बायोडाटाच्या आधारे विद्यार्थ्यांबद्दल तसेच गाव, तालुका जिल्हा, विषयांची आवड, छंद यासंबंधी प्रश्‍न विचारले जातात. कोणत्याच मुलाखतीमधील प्रश्‍न हे अचानक विचारलेले व गैरलागू प्रश्‍न नसतात. कुठेना कुठे तरी त्या विद्यार्थ्याच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न विचारले जातात. स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तकात बहुतेकदा अभ्यासतंत्र दिलेले असते. पण प्रेरणेचा मंत्र न जपल्याने उपयुक्तता मर्यादित राहते. लेखक संजय मोरे यांच्या लेखनात नेमके हेच वेगळेपण आहे. त्यांच्या लेखनात अभ्यासाचे तंत्र व प्रेरणेचा मंत्र जपला गेल्याने ‘स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र’ या पुस्तकाची उपयुक्तता तर वाढतेच आणि मुलांवरील प्रभावसुद्धा टिकून राहील.


यावर अधिक वाचा :