मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (13:32 IST)

यशवंतराव चव्हाण एक अव्दितीय व्यक्तीमत्व

मी लहानपणापासून शाळेत, नंतर महाविद्यालयात शिकत असताना माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जीवनातील अनेक गोष्टी ऐकल्या, वाचल्या आहेत. त्यांचा जीवनपट अनेक पुस्तकातून वाचला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतः न डगमगता खंबीरपणे उभे कसे रहायचे हे मी यशवंतराव चव्हाण साहेबांकडूनच शिकलो असे स्पष्टपणे सांगतो. गरीब कुटुंबात जन्म झाला असला तरी सुद्धा आणि लहान वयातच वडिलांचे डोक्यावरील छत्र गमावून आईने ज्या ताकदीने आणि सुसंस्काराने यशवंतरावांना घडविले, त्याचा उपयोग अखंडपणे जीवन जगत असताना त्यांनी केला.
 
आई हा सर्वप्रथम आणि सर्वोत्कृष्ट गुरूही असते. आपण जरी गरीब म्हणून जन्माला आलो, ही आपली चूक नाही. परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये जर आपण बदल घडवू शकलो नाही तर मात्र आपले जीवन व्यर्थ गेले असे समजायला हवे, असे विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे आहेत. गणपतराव रघुनाथराव कणसे यांनी लिहिलेले छोटेखानी पुस्तक मला वाचावयास मिळाले. ‘सह्याद्रीचा कोहिनूर’ यशवंतराव चव्हाण साहेबांची मराठी चरित्रमाला वाचून असे वाटते की, खूप कमीत कमी शब्दांमध्ये कणसे सरांनी संपूर्ण यशवंतराव चव्हाण साहेबांचा जीवनपट दर्शविला आहे.
 
यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेक अडचणींवर कशा पद्धतीने मात केली, त्याचबरोबर यशाच्या सर्वोच्च शिखरावरती पोहचून सुद्धा समाजातील, तळागाळातील व्यक्तींसाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे धडपडणारे आणि गगनाला स्पर्श करतानासुद्धा स्वतःचे पाय जमिनीशी घट्टपणे रोवून उभे राहणे हे क्वचितच व्यक्तींना जमते. अशा प्रकारच्या व्यक्तीमत्वाबद्दल प्रत्येकाला एक वेगळीच उत्सुकता असते आणि यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेकजण आज वाटचाल करीत आहेत. यशवंतरावांनी ज्याप्रमाणे जीवन जगले आहेत त्याच्यापेक्षा खूप चांगली परिस्थिती आज समाजामध्ये प्रत्येकाची आहे.
 
गणपतराव कणसे सरांनी संपूर्ण यशवंतराव चव्हाण एका छोटेखानी पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे. कोणतीही व्यक्ती हे पुस्तक एक बैठकीमध्ये सहज वाचून काढू शकते. ‘सह्याद्रीचा कोहिनूर’ हे छोटेखाणी पुस्तक वाचून माझ्या ज्ञानामध्ये यशवंतरावांच्या खंबीर नेतृत्व गुण कौशल्याची भर पडली त्याबद्दल मी लेखकाचे आभार मानतो. लेखक श्री. गणपतराव रघुनाथराव कणसे आणि कवितासागर प्रकाशन संस्थेचे संस्थापक व कार्यकारी संचालक डॉ. सुनिल दादा पाटील यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो.

- मंगेश विठ्ठल कोळी (9028713820)