शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शनिवार, 1 जुलै 2017 (10:44 IST)

अद्भुत आणि विलक्षण प्रतिभा असलेले लिखाण म्हणजे: प्रतिभा स्पंदन

‘प्रतिभा स्पंदन’ हा श्री. सचिन शरद कुसनाळे यांच्या 21 लेखांच्या संग्रहामध्ये ‘पांडित्य आणि प्रतिभा’, ‘अस्तित्व’, ‘निसर्गधर्म’, ‘विवेक’, ‘श्रद्धा’, ‘ज्ञान’, ‘अधर्म’ आणि ‘शून्य’ ही काही शीर्षके वाचून प्रस्तुत लेखसंग्रहाच्या आशय-विषयांची दिशा व दृष्टिकोन सहजच स्पष्ट होतो. कोणताही लेखक हा अवतीभवतीच्या चराचराकडे, अंतरिक्षाकडे, सुदूरवर्ती क्षितिजाकडे कधी कौतुकाने, कुतूहलाने; कधी चिकित्सक वृत्तीने पाहात असतो, निरखत असतो; मनाच्या मनात तो ते साठवत असतो आणि त्या अवलोकनाला आपल्या चिंतन-मननाच्या मुशीत घालून नवे असे काही अभिव्यक्त करू पाहतो. या एकूणच अभिव्यक्तीमधून लेखकाच्या अभिजात व अनिवार वृत्ती-प्रवृत्तींचा, अभिरुचीचा तसेच आत्मप्रत्ययी आकलनाचा एक आकृतिबंध उलगडत जातो. हा पैस, परीघ किंवा परिमिती लेखकाच्या व्यक्तिमत्वाने सीमांकित होत असते आणि तीच त्या लेखनाची ओळखही असते, तसेच मर्यादादेखील. म्हणूनच, ज्याचे-त्याचे जग हे ज्याच्या-त्याच्या डोक्याएवढे असते असे म्हटले जाते. या गृहीतकाच्या पार्श्वभूमीवर एकूणच लेखनाची कुंडली सहज मांडता येते. त्यातूनच त्या लेखनाचे मर्म आणि महत्त्व वगैरे आपसूकच अधोरेखित होते.

सचिन शरद कुसनाळे यांच्या लेखनाचा हा प्रमाथी असा प्रस्तुतचा प्रवास आत्मसंवाद आणि आत्मप्रत्यय या उभय घाटा-तटांमधून होतांना दिसतो. तात्त्विक किंवा वैचारिक लेखन हे अनेकदा शब्दजड होते, पण सचिनच्या लेखनात हा दोष नावालाही गवसत नाही. भाषाशैली नितांत सहज, सोपी, प्रवाही आणि म्हणूनच तिची संप्रेषणीयता मोठी आश्वासक आहे. भाषेचे किंवा शब्दांच्या अर्थानर्थहीन पसा-यात सचिन शरद कुसनाळे आपल्या कथ्यांवरची पकड शिथिल होऊ देत नाही, हे या लेखनाचे मर्मस्पर्शी व मोठे वैशिष्ट्य आहे. ‘नव्या युगाचे नवे गाणे जर रचले नाही तर आपण नव्याच्या नवलाईस प्रतिसाद न दिल्याचा प्रमाद घडेल.’ (पृ. क्र. ०८), अव्यक्ताचे स्पंदन जो जाणतो तोच जाणता बनतो’, ‘अध्यात्मवाद व भौतिकवाद अशा दोन्ही ठिकाणी अव्यक्ताचे स्थान हे अपरिहार्य व उच्च आहे.’ (पृ. क्र. ४२), ‘विश्वास हे श्रद्धेचे बाह्यरूप होय.’ (पृ. क्र. ५६), ‘स्वावलंबन ही स्वाभिमानाची जननी आहे.’ (पृ. क्र. ६८), या व अशांसारख्या चिंतनप्रसूत विचारशलाका प्रत्येक पानापानांवर भेटतात. सचिनच्या या लेखनाला विचार परिप्लुत व्यक्तिमत्वाचे भक्कम अधिष्ठान आहे. समाजशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, भूगोल, इतिहास, साहित्य आणि संस्कृती इत्यादी विषयांचा अभ्यास म्हणा किंवा चिंतन आणि त्याचा ठसठशीत आलेख या लेखनात आद्योपंत प्रतिबिंबित झाला आहे.

पुष्कळदा वैचारिक लेखनामध्ये का कोण जाणे; पण एक सुप्त आग्रह आणि अनावश्यक अशी आक्रमकता असते; परंतु सचिनच्या या लेखनात असे कुठेही दिसत नाही. याचा अर्थ असाही नाही की, त्याचे लेखन वाचकशरण आहे - ते तसे नाही, तरीही ते वाचनीय आहे.

खरेतर, मला एका गोष्टीचा उल्लेख इथे करावा की कसे; असा मला संभ्रम आहे. तरीही हा मोह टाळावा असे मला वाटत नाही. परवा सचिन जेव्हा माझ्याकडे या लेखनाची डमी घेऊन आला, तेव्हा त्याचे आडनाव पाहिल्यावर मी निमिषार्धात १९६१ - १९६२ च्या माझ्या इयत्ता १० वी च्या वर्गात जाऊन बसलो. माझ्या वर्गशिक्षकांचे आडनावही कुसनाळे हेच होते. योगायोग असा की, सचिन हा माझ्या अत्यंत आवडत्या वर्गशिक्षकांचा नातू. नियतीची अदृष्ट किमया म्हणूनच हा सुवर्णक्षण मला लाभला हे माझे भाग्यच म्हणायचे.

सचिनच्या भावी लेखनाच्या कितीतरी शक्यता या लेखनात अनुस्यूत-दडलेल्या आहेत; आणि म्हणूनच त्याच्या आगामी लेखनाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.