गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑगस्ट 2016 (10:53 IST)

आयुष्याला कलाटणी देणारे एक क्रांतिकारी पुस्तक...मी गरीब का आहे?

या क्रांतिकारी पुस्तकाच्या माध्यमातून “गरीबी” हा विषय लेखक - राज धुदाट यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. गरीबीची कारणे त्यांनी समर्पकपणे सांगितली आहेत, त्याचं बरोबर गरीबीमधून बाहेर पडण्यासाठी असलेले पर्याय सुद्धा त्यांनी सुचवलेले आहेत / दिलेले आहेत. मी गरीब घराण्यात जन्माला आलो म्हणून मी आयुष्यभर गरीबचं राहावं असे कुठे लिहिले आहे काय? किंवा असा काही नियम आहे काय? प्रत्येकाला आपल्या गरीबीवर नैतिक मार्गाने मात करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी तर असे म्हणेन आपल्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी लागणारी श्रीमंती आमच्या प्रत्येकाला मिळायलाचं हवी आणि किंबहुना तो आमचा जन्मसिध्द अधिकारच आहे. जरी गरीब घरात जन्मास येऊन तो अधिकार आमच्या पासून दूर गेला असेल तरी, अहिंसा व सत्याच्या मार्गाने आम्ही तो अवश्य प्राप्त करू शकतो. आमची गरीबी दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे ऐवढे मात्र खरे. गरीबीवर मात केलेल्यांची अनेक उदाहरणे देता येतील; धीरुभाई अंबानी एकेकाळी पेट्रोल पंपावर किरकोळ स्वरूपाचे काम करीत होते, कारण त्यांचा जन्म एका गरीब परिवारात झाला होता, पण त्यांनी गरीबीशी संघर्ष करून ते देशातील अतिश्रीमंत व्यक्तीपैकी एक बनले.
 
माणसाचे नशीब एक टक्का काम करते आणि नव्यानव टक्के आपली कर्तबगारी काम करते. मी गरीब आहे म्हणून घरातचं बसलो किंवा रोजंदारीचं करीत बसलो तर गरीबीतून बाहेर पडताचं येणार नाही. याचा अर्थ रोजंदारी करणा-यांनी रोजंदारीचं करू नये असा नसून आपल्या दैनंदिन कामातूनचं गरीबीच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा. बेडूक एखाद्या डबक्यात रहात असतो, त्याला वाटते की आपण समुद्रातच रहात आहोत आणि हेच आपले विश्व आहे. दीर्घकाळ तो त्या डबक्याच्या दलदलीत वास्तव्य करत असतो, पण कर्मधर्म संयोगाने तो त्या घाणीतून बाहेर पडतो तेंव्हा त्याला कळते की, आपले विश्व खूप मोठे आहे. पण आपण या मोठया विश्वात येण्याचा, गरीबीच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्नच करीत नाही; आम्ही आमची गरिबी उराशी कवटाळून नशिबाला दोष देत अश्रू ढाळत राहतो, आमच्या डोळ्यातील अश्रुमुळे आम्हांला सारे काही अंधुक दिसते, परिणामतः आम्हांला गरीबीच्या दलदलीतून बाहेर येण्याचा मार्ग दिसत नाही. म्हणून गरिबीला न कवटाळता, डोळ्यातील अश्रू पुसून आम्ही नवा मार्ग शोधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवा.
 
मला अजून एक उदाहरण सांगावस वाटत. मी एका नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीत काम करीत असतांना एकदा एका व्यक्तीची भेट झाली, ती व्यक्ती काही वर्षापूर्वी एका हॉटेल मध्ये वेटर म्हणून महिना सात हजार रुपये पगारावर काम करत होती. ती व्यक्ती रोज हॉटेलमध्ये कामाला आल्यावर विचार करत असे की, एक ना एक दिवस मी महिन्याला पन्नास हजार रुपये पगार मिळवणारचं आणि एक दिवस तो एका नेटवर्क कंपनीत अर्धवेळ कामाला लागला, काही दिवसात त्याची चांगली टीम तयार झाली. आणि तो आठवडयाला पन्नास हजार रुपये कमवू लागला. म्हणजेच सदर इसमाचे उदाहरणावरून आम्ही आमच्या दैनंदिन कामकाजाबरोबरचं आमच्या गरीबीतून बाहेर पडण्याचा विचार करायला हवा, आणि केवळ आम्ही विचार करून चालणार नाही तर त्याला सकारात्मक कृतीची जोड द्यायला हवी. लेखक - राज धुदाट यांचे “मी गरीब का आहे?” हे पुस्तक वाचकांच्या आयुष्याला कलाटणी देणारे एक क्रांतिकारी पुस्तक आहे यात तिळमात्र शंका नाही. हे पुस्तक वाचून वाचकांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकते, मी असेही म्हणेन या पुस्तकाच्या वाचनाने जर काही वाचकांची गरीबी दूर झाली आणि त्यांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडले तर लेखक - राज धुदाट यांचा हा पुस्तक लेखनाचा प्रपंच सार्थकी लागला असे होईल. केवळ काही वाचक नव्हे तर शेकडो आणि हजारो वाचकांच्या जीवनात या पुस्तकाच्या माध्यमातून क्रांती घडेल याची मला पूर्ण खात्री आहे. 
 
माझे एक मित्र आहेत. खरं तर परिचित आहेत. प्रत्येक परिचित मित्र असतोच असे नाही. माझे ते सहकारी आहेत. ते अतिशय गरिबीतून आले आहेत. पण त्यांच्याशी बोलताना ते इतक्या गरिबीतून आले असतील असे कधीच जाणवत नाही. त्याविषयी ते कधीच तक्रारीच्या सुरातही बोलत नाहीत. त्याची त्यांना गरज वाटत नसावी. त्यांच्याविषयी जवळच्याकडून काही माहिती कळते. कधी कधी आपणहून विषय काढला तर ते एवढंच बोलतात. खरं शिक्षण हे गरिबीमुळेच मिळते. गरिबी ही शिक्षा देऊन शिक्षण देत असते. आपल्या गरिबीविषयी तक्रार करण्यापेक्षा आपण गरीब का आहोत, याची कारणे शोधली पाहिजेत. त्यात मी गरीब आहे, याचे कारण माझे वडील गरीब होते. माझे वडील गरीब का होते, कदाचित त्यांचेही वडील गरीबच असतील. त्या पूर्वीची काही माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. शांत डोकं ठेवून विचार केला तर कोणीही माणूस आपली गरिबी घालवू शकतो. ते काही अशक्य नाही. केवळ कष्ट करण्याची तयारी ठेवली तर आपली गरिबी जाऊ शकते. मग काहींची गरिबी जात का नाही? ते कष्टही करतात, पण हातातोडांची गाठ पडत नाही. आपली कमाई किती आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. जे लोक व्यसनी आहेत, त्यांनी कितीही कमाई केली तरी त्यांची गरिबी कशी काय जाणार? जे लोक आळशी आहेत, त्यांना कोणीही काम सांगणार नाही. काही लोक कामचुकार असतात, ते कसे काय मग आपली परिस्थिती बदलणार आहेत. माझ्या मित्राने गरीब माणसं गरीब का असतात, याची बरीच कारणे सांगितली, ही करणे केवळ उदाहरणादाखल आहेत. असं त्याचंही मत असतं. आपण ठरविलं तर नियोजन करून आपली गरिबी घालवू शकतो. तशी संधी प्रत्येकाला मिळते. याला काही अपवादही असतील, पण अपवादाचा विचार करू नये. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच.
 
मला तो म्हणायचा - त्याने आपल्या राहत्या घरात एक वाक्य भिंतीवर लिहून ठेवले होते. मी गरीब म्हणून जन्माला आलो असलो तरी गरीब म्हणून मरणार नाही. असं भितींवर लिहून ठेवणं सोप आहे, ते कोणीही करू शकेल. भिंतीवर लिहिलेल्या वाक्याबद्दल एकदा त्यानेच मला सांगितले. भिंतीवर लिहून ठेवल्यामुळे रोज त्याची जाणीव होते. त्यावर मी त्याला विचारलं, अशी कल्पना कशी काय सुचली? त्यावर त्याने साधूचे उदाहरण दिले. साधू झाल्यावर साधू हे साधूचा वेषच का परिधान करतात? कारण त्यांना त्यांच्या वेषामुळे आपण साधू आहोत आपणास इतर नागरिकांप्रमाणे वागून चालणार नाही, याची सतत जाणीव होत राहते. तो खरा तर पुरुषच असतो, पण त्याने वेष परिधान केल्यामुळे त्याला साधूत्व येते. साधूत्व केवळ वेषात नसले तरी त्यामुळे त्याची ओळख ठरते. स्वतःला जाणीव ठेवण्यासाठी भिंतीवरती मलाच सूचना देणारे वाक्य माझ्यासाठी मीच लिहिले होते. त्यापासून वाटचाल सुरू झाली. मार्ग कितीही खडतर असला तरी दिशा योग्य असेल तर आपण ज्या स्थळी पोचण्याचे ठरवले आहे, त्या स्थळी पोचणार आहोत. किमान त्या दिशेने प्रवास तरी सुरू होतो, तसा माझा प्रवास सुरू झाला. आता इथपर्यंत आलो आहे. इथपर्यंतही मी कुठून, कसा आलो, हे बघता कोणालाही आश्चर्य वाटेल. पण यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. मी एक सामान्य माणूस आहे, मला जे जमलं ते कोणालाही जमू शकेल. मार्ग भिन्न असू शकतात. मी त्यातून शिकतो आहे. प्रत्येकाने शिकले पाहिजे. 
 
गेल्या आठवड्यात माझ्या एका खास प्रकाशक मित्राने मला सांगितले की, ‘मी मागेसुद्धा सांगितले होते आणि आजसुद्धा सांगतो की, माझे नशिब प्रकाशन व्यवसायाच्या गुंतवणुकीत चांगले नाही..!’ ‘यापूर्वीसुद्धा मी अशा प्रकारे प्रयत्न करून बघितला, परंतु आजपर्यंत मला सफलता मिळाली नाही आणि भविष्यातसुद्धा मला यश मिळणार नाही, तुम्हाला प्रयत्न करावयाचा असल्यास मला हरकत नाही. माझ्या नशिबात या क्षेत्रापासून फायदा नाही, हे सत्य आहे.’ अशा वेगवेगळ्या संभाषणांची वाक्ये आपण पुष्कळ लोकांकडून ऐकली असतील. प्रश्न हाच आहे की, तुम्हालासुद्धा असेच वाटते का? संपत्ती, सर्जन किंवा श्रीमंत होणे हा नशिबाचा भाग आहे? प्रसिद्ध गुंतवणूक गुरू वॉरेन बफेट यांचे एक वाक्य मला अतिशय आवडते ते म्हणतात, ‘तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात हा तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मेलात तर याला जबाबदार तुम्हीच आहात.’ सत्य नेहमी कटू असते. ते तुम्हाला पटेल अथवा नाही, परंतु संपत्तीचे निर्माण करण्यासाठी प्रकाशन व्यवसायातील गुंतवणूक हा अतिशय सोपा आणि सरळ मार्ग आहे.
 
राजकारण, राजकारणातून पैसा, भ्रष्टाचार आणि पुढे सत्ता असे चित्र सर्वत्र दिसत असले, तरी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार मात्र याला अपवाद आहे. देशातील सर्वांत गरीब मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव पुढे आले आहे. याबाबतचे वृत्त आपण सर्वांनी वाचले असून, लोक माझ्या गरिबीबाबत बोलतात याचा आपणास आनंद वाटतो, असे सरकार यांनी म्हटले आहे. मागील वर्षी चार राज्यांत पार पडलेल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. देशातील प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा तर विचारच न केलेला बरा. गेल्या जानेवारी महिन्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यांनी धनपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या वेळी माणिक सरकार यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्याकडे फक्त 1080 रुपये असल्याचे नमूद केले होते. गेल्या सोळा वर्षांपासून ते त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या साधेपणाविषयी म्हणूनच राज्यातील जनतेला आदर आहे. आमचा मुख्यमंत्री गरीब आहे मात्र भ्रष्ट नाही, असे लोकच अभिमानाने बोलतात आणि ही आमच्या भारतीयांच्या साठी अभिमानाची बाब आहे. पण आज प्रत्येक्षात नोकरशाही लाखो रुपयांचा पगार व अन्य सोई सुविधा असतांना सुद्धा मी मंडळी मोठ्ठ्या प्रमाणात वाम मार्गाने पैसा कमावण्यात गुंतली आहे, पण या बेईमानीच्या पैशाने त्यांना आनंद व समाधान तर निश्चितच मिळत नसणार, आमचा बाप प्रामाणिक आहे असे त्यांची मुले कधीच म्हणू शकणार नाहीत. एकीकडे राजकारणात सर्वाधिक भ्रष्ट नेते दिसून येतात. पैसा हेच त्यांचे ध्येय असते असे असतांना आपण इतका साधेपणा आणि स्वच्छ प्रतिमा कशी काय जपली यावर सरकार म्हणाले, ‘मी गरीब आहे याचे श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जाते. पक्षाने माझ्यावर जे काही संस्कार केले आहेत. त्या संस्काराची शिदोरी घेऊनच माझी वाटचाल सुरू आहे.’ त्रिपुरात आपण इतके लोकप्रिय कसे झालात? यामागचे गुपित काय? यावर ते म्हणाले, ‘लोकांपासून मी कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही. मी असे कोणतेही आश्‍वासन देत नाही जे मला पूर्ण करता येत नाही. जे बोलतो ते करून दाखवितो. त्यामुळे राज्यातील जनतेचा माझ्यावर आणि पक्षावर विश्वास आहे.’
 
एखाद्या पुस्तकाला / कलाकृतीला मिळणा-या प्रसिद्धीचं गणित कोणालाच मांडता येत नाही. मात्र विश्लेषण करायचे झाल्यास ते पुस्तक / ती कलाकृती रसिकांना आपलीशी वाटते. त्या पुस्तकाशी वाचकांची नाळ जुळते आणि नंतर ते पुस्तक / कलाकृती हे त्या संबंधित लेखकाची मालमत्ता न राहता वाचकांचीच होऊन जाते असं म्हणता येईल. ‘मी गरीब का आहे?’ हे पुस्तक लेखक - मुद्रक - प्रकाशक - वितरक - वाचक या सर्वांना अत्यंत लाभदायक ठरत आहे, राज धुदाट यांचे लेखन हे केवळ त्यांच्या पुरते मर्यादित न राहता आता ते संपूर्ण समाजाचे झाले आहे. भविष्यात लेखक - राज धुदाट यांनी वाचकांसाठी अनेक नवीन नवीन विषयावर अगणित पुस्तकांची निर्मिती करावी, त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी आणि त्यांच्या या वेगळ्या प्रयत्नासाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!