शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : शनिवार, 18 जून 2016 (19:44 IST)

एका आगळ्या वेगळ्या विषयाला स्पर्श करणारी सर्वोत्तम दीर्घकथा - सावट

आज ब-याच दिवसातून एक अनोखी आणि वास्तवाशी मिळती जुळती दीर्घकथा वाचण्यासाठी मिळाली. लेखिका सौ. दीपाली ओमेश पाटील यांच्या द्वारा लिखित ‘सावट ही दीर्घकथा वाचण्यास सुरवात केली. वाचत असतांना एक रहस्यमय चित्रपट पाहिल्याचा भास मनाला होत होता. खूप वेगळा विषय आणि कुणा एका स्त्रीचा जीवनपटच समोर उभा ठाकणारी अशी ही दीर्घकथा आहे. जसजशी ही दीर्घकथा वाचत पुढे पुढे जात होतो तसतसे अनेक प्रश्न मनात काहूर माजवू लागले. अतिशय एकांतात ही दीर्घकथा मी वाचत असतांना त्या कथेमध्ये मी पूर्णपणे रमून गेलो होतो. असे वाटत होते की, मी आणि ही दीर्घकथा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. एक रहस्य आणि त्याच बरोबर कोणत्याही वाचकाला स्वतःचे मन गुंतवून ठेवणारी अशी उत्तम प्रकारची मांडणी मी प्रथमतः पाहिली.

कथा वाचत असतांना मी स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या अनेक चांगल्या/वाईट अनुभवाशी हे कथानक खूप मिळते जूळते आहे. कोणतेही काम जेव्हा मन लावून, नि:स्वार्थी, प्रामाणिक आणि स्वतःचे सर्वस्व झोकून देवून करत असतो त्यावेळी ते काम आणि आपलं जीवन एकरूप झाल्याचे असा अनुभव कित्येकाला येतो. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या कामामध्ये यश हे नक्कीच मिळत असते. परंतु एखाद्या वेळी अशा कामाची सवय झाली तर त्यातून स्वतःला शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाला देखील सामोरे जावे लागते.

सावट या दीर्घकथेच्या पहिल्या भागामध्ये लेखिकेने असे दाखविले आहे की, कथेतील नायिकेला एक प्रकारची सावली दिसते आणि पुढे ती सावली स्वतःवर झालेल्या अन्यायाला न्याय मागते. तिला तो न्याय मिळवून देत असतांना स्वतः नायिका सर्वस्व पणाला लावते आणि त्या पिडीत स्त्रीला न्याय मिळवून देते. कथेच्या दुस-या भागात नायिकेवर विविध संकटांचे डोंगर उभे ठाकतात त्या सर्वांवर खंबीरपणे आणि अत्यंत धाडसाने सामोरे जाते. त्यातच स्वतःच्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला कशा पद्धतीने घेते त्यामध्ये ख-या अर्थाने सर्वात कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची नारीशक्ती जन्मतःच तिला मिळालेली असते याची प्रचिती येते. कोणतीही स्त्री स्वतःच्या कुटुंबावर झालेला अन्याय कदापिही सहन करू शकत नाही हे वास्तववादी चित्र आपणास या दीर्घकथेच्या माध्यमातून वाचावयास मिळेल.

सावट ही दीर्घकथा कथा वाचत असतांना अगदी कोणतीही व्यक्ती या कथानकामध्ये स्वतःला हरवून जाईल यात मात्र शंकाच नाही. तसेच कथेमध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता वाचकाला वाटत राहते. दीर्घकथेचा शेवट देखील खूप छान पद्धतीने केला असून त्यातून छान प्रकारचा सामाजिक संदेश लेखिकेने दिला आहे. अनेक चांगल्या/वाईट प्रसंगाला सामोरे जावूनसुद्धा एक स्त्री स्वतःमध्ये खंबीरपणा आणून कशा पद्धतीने न डगमगता उभी राहू शकते याची प्रचिती वाचकाला सावट ही दीर्घकथा वाचत असतांना निश्चितच येईल. या दीर्घकथेच्या लेखिका सौ. दीपाली ओमेश पाटील आणि ही दीर्घकथा पुस्तक रूपामध्ये सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देणारे कवितासागर प्रकाशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनिल दादा पाटील यांना मी पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देतो.