शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (17:37 IST)

साहित्य सागरातील अनमोल हिरा म्हणजे : : प्रा. प्रवीणकुमार वैद्य

प्रा. प्रवीणकुमार वैद्य
 
सहजासहजी अब्दुल लाट येथे लेखक प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील या द्वयांची भेट झाली. खूप आनंद झाला. प्रा. प्रवीणकुमार वैद्य यांच्यासारखे लेखणी बहाद्दूर आणि डॉ. सुनील पाटील यांच्यासारखे डॉक्टरेट सुदुरवर वाचन संस्कृती वाढविणारे भेटल्यानंतर अत्यानंद कोणाला होणार नाही? त्यांचे कवितासागर प्रकाशन नजीकच्या काळात कॉन्टिनेन्टल प्रकाशन होवो!
 
दुस-या दिवशी ‘उद् बोधन’ आणि ‘सुबोधन’ ही दोन्ही पुस्तके हाताळल्यानंतर मुखपृष्ठापासून अंतरंगात रंगून गेलो. साधारणपणे १९७० - ७२ पर्यंत त्यातल्या त्यात वाचनसंस्कृती फार चांगली नसली तरी ब-यापैकी होती. काळ पुढे सरकत गेला अन् संस्कृती, साहित्याकडे लोक दुर्लक्षून संपत्तीकडे ओढले गेले. यामुळे भविष्यकाळ अंधारमय झाला हे सांगण्यासाठी कोण्या फल ज्योतिषीची आवश्यकता मुळीच नाही. सरस्वतीची जागा संपत्तीने घेतली आहे. हल्ली पहिल्या पानावरच संपूर्ण जाहिरात पाहतो ना? हे कशाचे द्योतक आहे?
 
‘उद् बोधन’  या पहिल्या कथासंग्रहात १७ कथा आहेत. यातील भाषा, संवाद मनाला भुरळ घालतात. सर्व कथा लहान असल्या तरी आशय चांगला आहे. शालेय चमूपासून वृद्धांपर्यंत सर्व घटकांना आवडतील.रूची निर्माण करतील अशाच आहेत. सोबत सात सुभाषिते नि प्रसंगानुसार चित्रांमुळे आकर्षात भर पडली आहे. अक्षरांचा टाईप लहान नाही नि मोठाही नाही. मध्यम मार्गाने चालण्यास कंटाळा वाटत नाही. सदैव समतेची तुतारी फुंकणारे माननीय बी. बी. गुरव यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे.
 
दुसरा कथासंग्रह सुबोधन. यात १३ कथा आहेत. स्वर्गीय ग. ल. ठोकळ यांची यावेळी आठवण येते. सरळ एका रेषेत रेखाटन शेवटी झर्रकन आपले मत अलगद वाचकांच्या मनात बिंबवून मोकळे होत. दोन मेणबत्त्या ही कथा जुन्या पाठ्यपुस्तकात होती. अगदी तसेच प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांच्या ३० कथा आहेत. योगायोगाने दोन्ही पुस्तकांची पृष्ठ संख्या सम समान ५६ आहे.   
 
प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य आपल्या पिताश्रींना दोन्ही कथासंग्रह अर्पण करून एक प्रकारे पितृऋणातून मुक्त झाले आहेत. दोन्ही पुस्तकांची किंमत वाजवी आहे म्हणजे प्रत्येकी फक्त ६० रुपये आहे. मग कथासंग्रह खरेदीसाठी निश्चिंत खिशात हात घाला आणि वाचून आनंदी व्हा! हीच मनिषा! लेखक प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांना पुढील साहित्य सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा!
- क. पा. बिरनाळे, (अब्दुल लाट)