शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बजेट 2008
Written By वार्ता|

आता दीड लाखापर्यंत प्राप्तीकर माफ

अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी प्राप्तीकराची मर्यादा वाढवून नोकरदार वर्गांची मने जिंकली. त्याचबरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा बर्‍याच मोठ्या प्रमाणात वाढविल्याने हा वर्ग तर चिदंबरम यांच्यावर जाम खूष झाला आहे.

यापूर्वी एक लाख दहा हजार उत्पन्नापर्यंत कर माफ होता. अर्थमंत्र्यांनी ही मर्यादा आता दीड लाखापर्यंत नेली आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अनुक्रमे एक लाख ८० हजार व सव्वा दोन लाख उत्पन्नापर्यंत कर भरावा लागणार नाही.

प्राप्तीकराची मर्यादा वाढविल्याने प्रत्येक करदात्याला कमीत कमी चार हजार रूपयांचा दिलासा मिळाला आहे. प्राप्तीकराची मर्यादा वाढवितानाच त्याच्या स्लॅबमध्येही बदल केला आहे. त्यानुसार आता दीड लाख उत्पन्नापर्यंत कोणताही कर लागणार नाही. दीड लाख ते तीन लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना दहा टक्के प्राप्तीकर द्यावा लागेल. तीन लाख ते पाच लाखापर्यंत उत्पन्न असणार्‍यांना वीस टक्के प्राप्तीकर द्यावा लागेल. पाच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्यांना तीस टक्के कर भरावा लागेल.

आपल्या आई-वडिलांसाठी आरोग्य विम्याचा प्रीमीयम देत असल्यास त्यांना कलम ८० जी अंतर्गत पंधराशे रूपयांपर्यंत वार्षिक कर सवलत मिळू शकते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना २००४ व पोस्ट ऑफिस बचत योजनेला ८० जी अंतर्गत असेल. प्राप्तीकरावर दोन टक्के शिक्षण अधिभार लावला जाईल.

याचा अर्थ एखाद्याचे उत्पन्न वर्षाला दहा लाख असेल. तर त्याला २ लाख ५ हजाराचा कर भरावा लागेल. यापूर्वीच्या कररचनेनुसार त्याला २ लाख ४९ हजार रूपये भरावे लागले असते. महिलांचा विचार केला, तर याच उत्पन्नासाठी त्यांना दोन लाख दोन हजाराचा कर नव्या रचनेनुसार भरावा लागेल. पण याआधी तो २ लाख ४५ हजारांपर्यंत भरावा लागला असता. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांना आता २ लाख ३६ हजारांऐवजी १ लाख ९७ हजार ५०० रूपये एवढाच कर भरावा लागेल. ज्याचे उत्पन्न दीड लाख असेल त्याला चार हजार रूपये कर भरावा लागेल.