गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. संवाद
  4. »
  5. मुलाखत
Written By वेबदुनिया|

मतदान करा, चप्पल फेकू नकाः स्मृती इराणी

- गायत्री शर्मा व भिका शर्मा

'स्टार प्लसवरील 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधील 'तुलसी' अर्थात स्मृती इराणी राजकारणातही उतरली आहे. भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबादरीही ती सांभाळत आहे. सध्या तिच्या 'स्टारडम'मुळे देशभरात प्रचारासाठी तिला मागणी आहे. ज्या तुलसीच्या भूमिकेमुळे तिला हे सारे मिळाले त्या भूमिकेचा आणि राजकारणातील नव्या भूमिकेचा घेतलेला हा वेध.

प्रश्नः 'तुलसी'च्या भूमिकेला एवढी प्रसिद्धी मिळण्याचे कारण काय?
उत्तरः नशीब. कारण मेहनत सगळेच करतात. पण फार कमी जणांवर नशीब प्रसन्न होते. म्हणूनच माझी मेहनत आणि देवाचा आशीर्वाद दोन्ही फळले आणि यश मला मिळालं असं वाटतं.

प्रश्नः राजकारणात आल्यानंतरही तुम्ही 'तुलसी'च्या भूमिकेतून बाहेर का आला नाहीत?
उत्तरः जी भूमिका मी स्वतः जगलेली आहे, त्यातून मी बाहेर कशी येऊ? एखाद्या भूमिकेशी तब्बल आठ वर्षे आपले नाव निगडीत असेल तर त्यापासून वेगळे होणे सोपे नसते. ज्या भूमिकेने मला एवढी प्रसिद्धी दिली, ओळख दिली, त्यापासून मी स्वतंत्र कशी होऊ?

प्रश्नः तुलसी अचानक 'क्योंकी...'तून बाहेर पडल्यानंतर आपल्या चाहत्यांची प्रतिक्रिया काय होती?
उत्तरः मला सांगायला आनंद वाटतो, की लोक माझ्यावर प्रेम करतात याची जाणीव मला प्रकर्षाने झाली. लोक फक्त माझ्या भूमिकेवर नाही, तर माझ्यावर प्रेम करतात ही सुखद जाणीव झाली. त्यांनी माझ्यावरचे प्रेम एका सिरीयलपुरते सीमीत ठेवले नाही. म्हणूनच सिरीयल सुरू असतानाही आणि नसतानाही लोकांचे प्रेम अबाधित राहिले.

प्रश्नः चित्रपटात किंवा सिरीयल्समध्ये नशीब आजमावल्यानंतर बहुतांश अभिनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची कारणे काय असावीत?
उत्तरः हे तुम्ही त्यांना विचारा ज्यांनी राजकारण हा अभिनयाला पर्याय म्हणून निवडला आहे. माझे तसे नाही. मी एका स्वयंसेवकाच्या घरात जन्माला आलेली आहे. त्यामुळे राजकारण मला नवे नाही.

प्रश्नः स्मृती इराणी कलाकार नसत्या तर कोण बनल्या असत्या?
उत्तरः निःसंशय मी स्वयंसेवक असती.

प्रश्नः स्मृती इराणी आणि तुलसी यांच्या साम्य काय?
उत्तरः 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मध्ये जे संस्कार आहेत, ते माझ्या स्वतःवर झाले होते. त्यामुळे तुलसीच्या भूमिकेत अभिनय फारसा नव्हता. माझ्यावरचे संस्कारच ते असल्याने ही भूमिका करणे माझ्यासाठी फारसे कठीण नव्हते. 'तुलसी' व 'स्मृती'मध्ये पांढरे झालेले केस हाच काय तो फरक होता.

प्रश्नः हल्ली निवडणूक प्रचारसभांत चप्पल फेकणे ही नवी परंपरा रूजू पहात आहे. यामागे काय कारण असू शकेल?
उत्तरः यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे चप्पल फेकल्याने मिळणारी प्रसिद्धी. वास्तविक विरोधच करायचा असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहे. चप्पल फेकणे योग्य नाही. कोणीही याचे समर्थन करणार नाही. आपले मत व प्रसार माध्यमांद्वारे मांडलेली आपली भूमिका या दोनच मार्गानेही आपण लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचू शकता. यापेक्षा तिसरा मार्ग नाही. त्यामुळे या दोन मार्गांवरच विश्वास ठेवायला हवा.

प्रश्नः निवडणूक प्रचार सुरू असताना आपण लोकांना काय सांगू इच्छिता?
उत्तरः लोकांनी मतदान करायला हवे. आपले मत मांडण्याचा तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांनी बजावायलाच हवा. कुटुंबासह बाहेर पडून लोकांनी मतदान करावे.