शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालदिन
Written By वेबदुनिया|

असे होते पंडित नेहरू

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व सहा वेळा कॉंग्रेसचे अध्यक्ष झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर
१८८९ ला अलाहाबाद येथे झाला. हॅरो व केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेऊन नेहरू १९१२ मध्ये बार एट लॉची परिक्षा उत्तीर्ण झाले. भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली न करता स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःला झोकून दिले. 

गांधीजींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. १९१२ मध्येच ते कॉंग्रेसचे सदस्य झाले. १९२० मध्ये प्रतापगड येथे शेतकर्‍यांच्या मोर्चाला संघटित करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. १९२८ मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात केलेल्या आंदोलनत ते जखमी झाले होते. १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहातही ते सहभागी झाले होते. त्यांना अटक करून सहा महिन्यांसाठी त्यांना तुरूंगात पाठविण्यात आले. १९३५ मध्ये झालेल्या अटकेवेळी त्यांना अल्मोडा येथील तुरूंगात ठेवले होते. तिथे त्यांनी आत्मचरित्र लिहिले.

१९४२ च्या आंदोलनात ९ ऑगस्ट १९४२ ला त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांना अहमदनगरच्या तुरूंगात ठेवण्यात आले. तेथून १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनी नऊ वेळा तुरूंगवास भोगला.

स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या हंगामी सरकारमध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले. २७ मे १९६४ ला त्यांचे निधन होईपर्यंत ते या पदावर होते. नेहरूंच्या कार्यकाळात लोकशाही मजबूत करणे, देश व घटनेतील धर्मनिरपेक्षता कायम करणे आणि विविध योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास करणे आदी कामे करण्यावर भर देण्यात आला.

त्यांनी जगातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. स्वातंत्र्यानंतर आंतरराष्ट्रीय नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. पंचशील तत्वेही त्यांनी मांडली. १९५४ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत तटस्थ राष्ट्रांचा गट बनविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.