गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. ओळख क्रिकेटपटूंची
Written By अभिनय कुलकर्णी|

मुरलीचा विश्वविक्रमी प्रवास

NDND
ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नचा सर्वाधिक ७०८ कसोटी बळींचा विक्रम मोडून श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आता या विक्रमाचा शहेनशाह ठरला आहे. विशेष म्हणजे अवघ्या ११६ सामन्यांत त्याने हा पराक्रम साधला. त्या तुलनेत शेन वॉर्नला त्यासाठी १४५ सामने खेळावे लागले. म्हणजे एका कसोटीमागे मुरलीधरनला सहा बळी मिळाले आहेत. याला खरे तर भीमपराक्रम असेच म्हणावे लागेल. पण मुरलीधरनसाठी हे सारे इतके सोपे नव्हते. वाद आणि मुरलीधरन यांचा संबंध त्याचा चेंडू व फलंदाजाची विकेट यांच्याइतकाच घट्ट होता...

दैवगती कशी न्यारी असते ते पहा. ज्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने कसोटीत पदार्पण केले, त्याच ऑस्ट्रेलियाने त्याच्या गोलंदाजीच्या स्टाईलवरून गदारोळ माजवला. त्याच ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नचा विक्रम मोडून मुरलीने विश्वविक्रमावर आपले नाव कोरले. पण या विक्रमाची पदचिन्हे उमटायला सुरवात झाली ती १९९३ मध्ये. ऑस्ट्रेलियाविरूद्ध पदार्पण केल्यानंतर मुरलीच्या गोलंदाजीच्या शैलीबद्दल कुजबूज सुरू झाली. हा बॉल फेकतो असा आरोप होऊ लागला. १९९५-९६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर हे प्रकरण खूपच वाढले. त्यावेळी पंच डेरेल हेअरने त्याचे चेंडू नो बॉल म्हणून द्यायचा सपाटाच लावला होता. एकदिवसीय सामन्यातही याचीच पुनरावृत्ती झाली. अखेर आयसीसीने या प्रकरणाची चौकशी आरंभली. दोन अग्रगण्य संस्थांकडून बायोकेमिकल चाचणी करून अखेर मुरलीची शैली निर्दोष असल्याचा निर्णय आयसीसीने दिला. चेंडू टाकताना तो फेकल्याचा भास होत असल्याचे या संस्थांनी आपल्या निष्कर्षात सांगितले.

पण आयसीसीच्या निर्दोषित्वाच्या सर्टिफिकेटनंतरही वादाने मुरलीची पाठ सोडली नाही. पुढच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही याचीच पुनरावृ्ती झाली. त्यानंतर मुरलीची पर्थ व इंग्लंड येथे चाचणी घेण्यात आली. तेथेही त्याच्या शैलीत काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. पण ऑस्ट्रेलिया आणि मुरलीधरन यांच्यातील वादाचे हे सत्र यानंतर २००४ मध्ये झालेल्या तीन दिवसीय मालिकेतही सुरूच राहिले. या वेळी वाद झाला तो मुरलीधरनचा दुसरा टाकण्यावरून. सकलेन मुश्ताकने शोधून काढलेला हा दूसरा नावाचा चेंडू टाकण्याचा प्रकार मुरलीधरनने अधिक विकसित केला. विशेष म्हणजे तो खूपच यशस्वी ठरला. त्यामुळे भले भले फलंदाज त्याच्या दूसरावर चकतात. पण याही प्रकरणात आयसीसीने चौकशी करून यात आक्षेपार्ह काहीच नसल्याचे सांगितले.

मुरलीच्या देदिप्यमान कारकिर्दीत वादाचे हे मोहोळ मात्र कायम त्याच्या पाठीला लागले. त्यातही ऑस्ट्रेलियाने त्याला कायम वाईट वागणूक दिली. अर्थात या वादांनी त्याचे कर्तृत्व मात्र उणावले नाही. उलट वादातून तो अधिक झळाळून उठला. त्याची कारकिर्द अधिक बहरून निघाली.

त्याच्या आयुष्यात टर्निग पॉईंट ठरलेली घटना १९९४ साली घडली. खरे तर त्याचे महत्त्व फार कुणाला माहितही नाही. लखनौत खेळताना नवज्योतसिंग सिद्धूने मुरलीला त्याच्या शतकी खेळीत सहा षटकार ठोकले आहेत. या डावानंतर मुरलीचे आयुष्यच पार बदलून गेले. चेंडूची दिशा आणि इतर बाबींवर तो खूपच भर देऊ लागला. फलंदाजांच्या शैलीचाही तो अभ्यास खूपच बारीकपणे करतो. म्हणूनच भारताच्या राहूल द्रविडला त्याने आतापर्यंत सहावेळा बाद केले आहे, ते त्याच्या शैलीचा अभ्यास करूनच. मुरलीच्या चेंडूचे वैशिष्ट्य म्हणजे फलंदाजाला तो चुकवता येत नाही. त्याला काही तरी प्रतिक्षिप्त क्रिया करावीच लागते. त्यातूनच अनेकदा झेलबाद होण्याचे प्रकार घडतात.

NDND
अतिशय वळणारा ऑफब्रेक आणि दोन प्रकारे टाकणारा टॉप स्पीन ही त्याची शस्त्रे आहेत. टॉप स्पीनमधील एक थेट फलंदाजाच्या दिशेने जातो आणि त्याचा दुसऱ्या प्रकारच्या चेंडूलाही दुसरा असेच नाव आहे. हा दूसरा टप्पा टाकल्यावर अगदी वेगळ्या दिशेला जातो. त्यामुळे फलंदाजाची भंबेरी उडते.

आकड्यांच्या दुनियेत गेलो तर मुरलीच्या विक्रमांचे महत्त्व आहे त्याहून अधिक कसं आहे ते समजेल. मुरलीला पहिले शंभर बळी मिळविण्यासाठी २७ सामने खेळावे लागले. पण पुढील शंभर बळींसाठी अनुक्रमे, १५, १६, ४, १५, १४ आणि बारा कसोटी सामने खेळावे लागले. म्हणजे शेवटचे शंभर बळी त्याने अवघ्या बारा सामन्यांमध्ये मिळवले आहे. ही अगदी विश्वास न बसणारी पण खरी आकडेवारी आहे. म्हणजे जवळपास आठहून अधिक बळी त्याने प्रत्येक सामन्यामागे मिळवले आहेत. हे केवळ नैसर्गिक गुणवत्तेनेच शक्य आहे.

श्रीलंकेने आतापर्यंत पन्नास कसोटी सामने जिंकले आहेत. त्यातील ४५ सामन्यांत मुरलीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यात त्याचे बळी आहेत ३७३. म्हणजे सरासरी १५.१९ ची आहे. त्याने ३६ वेळा पाचहून अधिक बळी मिळवले आहेत. झिम्बाब्वेच्या विरूद्ध त्याने कॅंडी येथे नऊ बळी मिळवले होते. मुरलीने सलग चार सामन्यात दहा बळी मिळविण्याचा पराक्रम दोन वेळा केला. एकाच डावात पाच बळी त्याने ६१ वेळा मिळवले आहेत. एका सामन्यात दहा विकेट मिळविण्याचा पराक्रम त्याने तब्बल वीस वेळा केला आहे. तर त्याचे सातत्य यातून दिसून येते. तो ज्या देशांविरूद्ध आजपर्यंत खेळला त्या प्रत्येक देशांविरूद्ध त्याचे पन्नासाहून अधिक बळी आहेत. हे करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. त्याचा ७०९ वा बळी ठरलेला इंग्लंडचा पॉल कॉलिंगवूड हा त्याचा इंग्लंडविरूद्धचा पन्नासावा बळी होता.

विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. असे कुणीतरी म्हटले आहे. त्यानुसार शेन वॉर्नचा विक्रम मुरलीने मोडला. पण मुरली आता जो नवा विक्रम करेल तो नजिकच्या भविष्यात मोडण्याची शक्यता फारच दुरापास्त दिसते आहे. मुरलीच्या विक्रमाचा पाठलाग करणाऱ्यात त्यातल्या त्यात जवळचा म्हणजे भारताचा अनिल कुंबळे ५७५ बळी मिळवून मागे आहे. पण हा विक्रम मोडणे त्याच्यासाठीही फारच कठीण असेल. वॉर्नचा विक्रम मोडल्यानंतर त्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया या दृष्टीने फारच बोलकी आहे. वॉर्न म्हणतो, मुरलीची इच्छा १००० बळी मिळविण्याची आहे आणि तो हे साध्य करू शकतो. दुर्देवाने तो हा विक्रम नाही करू शकला तरी त्याच्यापुढे कोणी जाऊ शकेल असे वाटत नाही. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत कुणी काहीही बोलो. पण मुरली एक महान गोलंदाज म्हणूनच ओळखला जाईल.

शेन वॉर्नचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे. अगदी वॉर्न ऑस्ट्रेलियन असला तरी.