शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दासनवमी
Written By वेबदुनिया|

दास्यभक्ती

सौ. कमल जोशी

PR
सर्व संतांनी आणि भक्तांनी भक्तीचा महिमा गायीला आहे. श्री समर्थांनी दासबोधात सुरुवातीलाच भक्तीचे मर्म सांगितले आहे. ते म्हणतात 'येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग।' ह्या अभंगगाथेत ते म्हणतात - कोणे एकें आधी देवासी भजावें। तेणे पडे ठावे सर्व काही। सर्व काही चिंता देवची करीतो। स्वयें उद्धरीतो सेवकांसी। अशी ही राघवाची भक्ती कीर्तन, नऊ मार्गाने करता येते. त्यातील दास्य - भक्ती हा सातवा टप्पा, श्रवण कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन व वंदन आणि दास्य ह्या सात भक्ती आपोआप होतात.

दास्यभक्तीपर्यंत पोहोचलेला साधक देवाच्या दास्यत्वात आपल्या जीवनाचे सार्थक मानतो. ह्या भक्तीत भक्त देवाचा आश्रय घेतो. त्याला आपले मानून त्याच्यावर विश्वास ठेवणे. देवाला आपला स्वामी करून त्याच्या चरणी आपल्या जवळचे जे जे असेल ते ते सर्व तन मन धन अर्पण करणे. त्याचीच सेवा करणे म्हणजे दास्यभक्ती. ह्या भक्तीत प्रेम असते. कर्म असते आणि योगही असतो. म्हणून भक्तीच्या साम्राज्यात दास्यभक्ती लोकप्रिय आहे. गुरुला किंवा संताला स्वामी बनविले की, भक्ताची चिंता नामशेष होते. 'देव साधकाचा निरंजन' बनतो. 'राम कैसा आहे हे आधी पाहावे। मग सुखेनावें दास्य करू' दास्य कसे करावे? दास्य करू जन देव ओळखोन।' श्री समर्थ दासबोधात म्हणतात गुरूसुद्धा ओळखून करावा. उगाच शिष्याच्या वैभवावर नजर ठेवणाऱ्याला गुरू करूच नये. असेल गुरू अडक्याचे तीन मिळाले तरीसुद्धा त्यांच्या मागे लागू नये. 'दासांची संपत्ती राम सीतापति। जीवाचा सांगाती राम एक । राम एक माता राम एक पिता। राम सर्व भ्राता सहोदगुरू ।। श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली स्वत: निवृत्तीचा दास म्हणवून घेण्यात भूषण मानीत होते. ज्यांच्या गाथेला उपनिषदामध्ये मानाचे स्थान आहे, ते तुकाराम महाराज म्हणतात तरीच जन्मा यावे। दास विठ्ठलाचे व्हावे। तुलसीदासांच्या काव्यात सेवक सेव्य भाव मोठ्या आनंदाने डोलताना दिसतो.

दास्यभक्तीचा सोपान चढून अनेक संत भगवंत चरणी लीन झाले. म्हणून ही दास्यभक्ती आदरणीयच आहे. समर्थ म्हणतात 'काया वाचा मनें यथार्था रामी मिळणे। तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य।' राम हमारा काम करे। हम करे आराम। एकदा फक्त रामाचे दास्यत्व स्वीकारा मग तुमच्या पुढे आराम हात जोडून उभा राहतो. पण त्याकरिता प्रथम 'दास' व्हावे लागते. आणि तळमळीने सांगावे लागते - '' मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा । तू साहेब मेरा।' समर्थ म्हणतात - रात्री राम तोही दास। भेद नाही त्या आम्हांस। रामदास्य करूनी पाहे। सर्व सृष्टी चालता हे । प्राणिमात्र रामदास। रामदासी हा विश्वास । अशी ही दास्यभक्ती मोठी मनोहर आहे. आनंददायी आहे. एकदा हे दास्यभक्तीचे गुह्य साधकाला सापडले की साधकाचे जीवन सार्थ होते. 'जो जो भजनासी लागला तो तो रामदास जाला। असे आहे ह्या भक्तीचे मर्म.
जय जय रघुवीर समर्थ ।