शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दासनवमी
Written By वेबदुनिया|

रामदास्य हे साराचे सार!

एकदा अनंताचा मार्ग आक्रमण करण्याचे ठरले की साधकाने आपल्या आराध्य दैवताचा आश्रय घ्यावा. त्यातच परमार्थाचे वर्म आहे असे आपले शास्त्र सांगते. श्री समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम. तेव्हा ह्या रामाचे दास्यत्व त्यांनी स्वीकारले. तेच गुह्य ते इतर भक्तांना सांगतात. श्रीरामाचे दास्यत्व करणे म्हणजे काय? म्हणजे श्रीरामावर दृढ विश्वास ठेवणे, त्याचे चरणी लीन होऊन त्याला शरण जाणे, त्यालाच स्वामी मानून त्याची मनोमन सेवा करणे. म्हणजेच दास्यभक्ती होय. श्री समर्थ म्हणतात 'रामदास म्हणे साराचेही सार। सर्वांसी आधार भक्तिभाव।'

नवविधाभक्तीमध्ये दास्यभक्तीला महत्त्व आहे. एकदा फक्त रामाचे दस्यत्व स्वीकारा तुमच्यापुढे आराम हात जोडून उभा राहतो. पण त्याकरिता प्रथम दास व्हावे लागते. ''मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा। तु साहेब मेरा' अशा कबीर वचनात स्वामी आणि दासाचे नाते दिसून येते. जो प्रथम दास होतो तोच स्वामीत्व गाजवू शकतो. हे सारे समजवून घेऊन संसार कसा असार आहे ह्याची जाणीव साधकाला व्हावी लागते. समर्थ म्हणतात 'भक्तिभाव क्रिया मोक्षाचे साधन।' हे साधन करावे व आराध्यदैवतेच निजध्यास घ्यावा. सर्व काळ कथा निरूपण करावे. कशाकरता? सामान्य माणूस संसारात इतका रमतो की माया हे बंधन त्याला वाटतच नाही. ह्या संसारात 'नाना व्यथा उद्भवती। प्राणी अकस्मात जाती।' हे जीवाला कळत नाही आता मन आटोपावे। आपुल्या निजधामा जावे।' त्याकरिता भक्तीचा मार्ग आक्रमण करावा. रामाचे दास्यत्व स्वीकारावे त्याकरता समर्थ म्हणतात 'मना व्हावे सावचित। त्याग करणे उचित।' साधक जेव्हा प्रापंचिक आसक्ती सोडेल तेव्हाच त्याला रामाची सेवा करण्यात आवड उत्पन्न होईल. 'रामविण आन आवडेना। आवडेना भार नाथिला संसार। रामदासी सार रामदास्य।'

हा सर्व संसार केवळ भार आहे. ह्यात मिळालेल्या नरदेहाचे सार्थक नाही. ते सार्थक केवळ रामाच्या स्मरणात आहे, त्याच्या सेवेत आहे. संसार नाशिवंत आहे, सत्य केवळ राम आहे. राम म्हणजे परब्रह्मच. एकदा रामनामाचे गुह्य आकलन झाले की मग राम दास्यत्वाचे महत्त्व पटते. योग्यांना साधूंना ते पटले. श्रीसमर्थांनी त्याचा अनुभव घेतला म्हणूनच ते अनुभवाचे बोल बोलतात 'रामी रामदासी राघवी विश्वासी। तेणे गर्भवास दुरी ठेला।' रामवरच्या विश्वासाने संतसंगतीत राहून, स्वत:ला विसरून, कथा निरूपणात दंग होऊन निर्गुणाचे ज्ञान होते. 'सद्गुणाची भक्ती होते मुक्ती। ऐसे हे श्रुती बोलतसे। भक्ती ज्ञानाची माऊली आहे म्हणून 'भक्तीविण ज्ञान कदा पाविजेना'। भक्ती करावी संतांच्या सहवासाचा आनंद घ्यावा त्यातच जीवन साफल्य आहे. रामदास म्हणे साराचेही सार। सर्वांसी आधार भक्तिभाव। हेच तर त्रैलोक्याचे सार आहे.

जय जय रघुवीर समर्थ
सौ. कमल जोशी