गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दासनवमी
Written By वेबदुनिया|

समर्थांचे टाकळी

NDND
नाशिक शहरातच असलेल्या आणि नासर्डी (नंदिनी) नदीच्या तीरावर वसलेल्या टाकळी या छोट्या गावाचे महत्त्व समर्थ संप्रदायात मोठे आहे. समर्थ रामदास लग्नाच्या वेदीवरून पळून आल्यानंतर नाशिकलाच आले होते. याच टाकळी येथे त्यांनी १६२० ते १६३२ अशी बारा वर्षे तपश्चर्या केली. नदीत उभे राहून ते तपश्चर्या करत असत. बलोपासनेचा प्रचार आणि प्रसाराचे व्रत त्यांनी येथूनच सुरू केले. टाकळीच समर्थ विचारांचा पाया रचला गेला. त्यामुळे या गावाला मोठे महत्त्व आहे.

टाकळीत समर्थ रामदासांचा आश्रम नंदिनी नदीला लागून आहे. समर्थ रामदासांनी साधना केली ती गुहा, त्यांच्या पुजेतील राममूर्ती, समर्थांनी स्थापन केलेले शेणाचा पहिला हनुमान ही महत्त्वाची ठिकाणे येथे आहेत.

शिवकालापासून येथे असेलला आश्रम गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षिततेच्या गर्तेत सापडला होता. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला भेट द्यायला येणार्‍या भाविकांना समर्थ संप्रदायातील एक महत्वाचे केंद्र येथे आहे हे माहितच नव्हते. आश्रमाची एकूण अवस्थाही फारशी चांगली नव्हती. मात्र, नंतर नाशिक महापालिकेने पुढाकार घेऊन या परिसराचे स्वरूप आमुलाग्र बदलून टाकले. सिंहस्थ काळात आलेल्या निधीने या आश्रमाचा कायापालट झाला. त्यानंतर जीर्णौद्धार असलेला हा आश्रम मनाला शांतता देतो.

आता इथे भाविकांचीही चांगली गर्दी होते. समर्थ संप्रदायातील लोक तर येथे येतातच, पण त्याशिवायही भाविकांची गर्दी असते. दासनवमीला येथे मोठी यात्रा भरते. मनाचे श्लोक, दासबोध पाठांतराच्या स्पर्धा, सुर्यनमस्काराच्या स्पर्धाही या निमित्ताने घेतल्या जातात.

टाकळी येथे जाण्यासाठी नाशिकला यावे लागेल. नाशिकचेच ते एक उपनगर आहे. नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून येथे जाण्यासाठी बस तसेच रिक्षा उपलब्ध आहेत. याशिवाय रेल्वे स्थानकापासून येथे येण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात.