शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दत्त जयंती
Written By वेबदुनिया|

आदिगुरू - श्री दत्तात्रेय

WD
भगवान शंकर, श्री दत्तात्रेय, श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत थोर ऋषीमुनी, साधुसंतांनी जन्म घेतला आणि सार्‍या जगाला आध्यात्माची दीक्षा देऊन उपकृत केले. आज हजारो वर्षे होऊनही ते आपल्या विस्मरणातून गेले नाहीत. सर्वसामान्य माणसाला प्रपंच करून परमार्थ साधता येत नाही आणि घराचे रूपांतर आश्रमात करता येणे शक्य नाही. म्हणून ऋषींना व महासती अनुसूयेचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला तर ते शक्य आहे.

दत्त सांप्रदायाची महाराष्ट्र ही जन्मभूमी आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व गोवा या भागांमध्ये श्रीदत्तात्रेय हे सर्वाधिक लोकप्रिय दैवत आहे. भक्ताच्या हाकेला 'ओ' देणारे दैवत आहे.

सती अनुसूयेच्या व अत्री ऋषींच्या अघोर तपश्‍चर्येस भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन अनुसूयेच्या पोटी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो.

दत्त ही देवता म्हणजे ब्रह्म-विष्णू-महेश या तिघांच्या एकरूपतेचे प्रातिनिधिक स्वरूप असून सत्व, रज आणि तम या त्रैगुणांचे एकत्रीकरण तिच्यात झालेले आहे. श्री दत्तात्रेयाच्या सर्व मूर्तीमधून दिसणारी त्यांची तीन तोंडे म्हणजे ब्रह्म-विष्णू व महेश. त्यांच्यामागे उभी असलेली गोमाता व चार श्‍वान ही अनुक्रमे पृथ्वी व चार वेद यांची सूचक आहे.

दत्तजयंती उत्सव महाराष्ट्रात विशेष करून साजरा होतो. यात नवल नाही. महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश असून दत्ताचा एकूण पेहराव शेतकर्‍यांच्या दैवतेसारखा किंवा सेवकासारखा असतो. तो औदुंबराच्या झाडाखली राहतो व एक प्रकाराने औदुंबराच्या जपणुकीने तो वर्ण विस्ताराची शिकवणूक शेतकर्‍यांना देत असतो. त्यांच्या पाठीशी गाय असते. शेतीधंद्यात पूरक उद्योगधंदा म्हणून दुग्धोत्पादनाची कास धरण्यात येते. जणू काही हे व्रत श्रीदत्तराजानेच शेतकर्‍यांना शिकवले आहे. दत्ताच्या पायाशी कुत्रे असते. शेतीची राखण करावयास व घरादाराची जपणूक करावयास कुत्र्याचे सहाय्य शेतकर्‍याला होत असते.

श्री दत्तात्रेयांनी या पृथ्वीवर विविध कारणास्तव १६ अवतार घेतले आहेत. १) योगीराज, २) अत्रिवरद, ३) दत्तात्रेय, ४) कालग्निशमन, ५) योगिराज वल्लभ, ६) लीला विश्‍वंभर, ७) सिद्धराज, ८) ज्ञानसागर, ९) मायामुक्त, १0) आदिगुरू, ११) मायायुक्त, १२) शिवरूप, १३) विश्‍वंभर, १४) देवदेवं, १५) दिगंबर व १६) कृष्णश्याम-कमलनयन.

या अवतारांच्या कथा वर्णन करणारा संस्कृत ग्रंथ श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिला असून त्याचे नाव 'श्री दत्तात्रेय षोडशोवतार' असे आहे. या सोळा अवतारांशिवाय दासोपंथ हा एक सतरावा आणि सर्वज्ञ अवतार मानण्यात येतो.

श्रीदत्त मूर्ती तपमग्न, शांत, फार कृशही नाही व फार लठ्ठही नाही. ती वाल्मिकीप्रमाणे जटाभाराने युक्त अशी आहे. दत्तगुरूंनी २४ गुरूंकडून २४ गुणांची जोपासना प्राप्त करून साधक मार्गात खडतर वाटचाल केली. प्रत्येक वास्तूंच्या ठिकाणी गुण व अवगुणही असतात. वाईट ते सोडून देऊन वैराग्याची वृद्धी करणारे जे गुण होते, ते सद्गुण समजून त्याची वृद्धी केली. त्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडून मार्गदर्शन लाभले, त्या सर्वांना त्यांनी गुरू केले. क्षूद्र कीटकापासून ते पंचमहाभूतांपर्यंत बोध घेता येतो, हे त्यांनी आपल्या भक्तांना दाखवून दिले. पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी दत्तात्रेयाचा नावजप केल्यावर खर्‍या अर्थाने पितरांना गती मिळून आपण पितृऋणांतून काही प्रमाणात मुक्त होऊ शकतो. कलियुगात दत्तात्रेयाची उपासना आवश्यक आहे. त्यांच्या चरणाची मनोभावे सेवा केली तर भक्तास त्यांच्या कृपाप्रसादाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. साधकाला योग्य अशा सद्गुरूची भेट करून देण्याचे कार्य हे दैवत आज हजारो वर्षे गुप्त व प्रगट स्वरूपात करत आहे. त्यामुळे श्री दत्तात्रेय यांना आदिगुरू म्हटले आहे. उपनिषदकारांनी एक पाऊल पुढे जाऊन त्यांना 'विश्‍वगुरू' म्हटले आहे.

त्रिमुखी दत्तात्रेयातील ब्रह्मच्या हातात जपमाळ असते. त्यामुळे दत्ताचा नामजप सतत सुरू असतो. ही देवता सदैव आपल्या शिष्यांवर दया करणारी, त्यांनी केलेल्या चुकांबद्दल क्षमा करणारी व दुष्ट दैत्यांपासून त्यांना अभय देणारी अशी ही देवता आहे. काही ठिकाणी तिला विष्णूचा सहावा अवतार, तर काही ठिकाणी चौथा अवतार मानले आहे.

श्रीधर स्वामींनी आपल्या 'रामविजय' ग्रंथात अवताराचे रहस्य कुशलतेने सांगितले आहे. जेव्हा साधू-संतांचा छळ सुरू होतो, अशावेळी दुष्टांचे निर्दालन करून धर्मपालन व जगाचा उद्धार करण्यासाठी भगवान अवतार घेतात. संकटाच्या वेळी जो आकस्मिकपणे आपल्यासमोर येऊन उभा राहतो, तेव्हा आपल्या तोंडून सहज उद्गार निघतात की 'दत्तासारखा आलास'.

दत्त अवतार हा इतर अवतारांप्रमाणे कार्य संपताच संपणारा, समाप्त होणारा नाही. दत्त अवताराचे स्वरूप आक्रमक वृत्तीचे नसून साधूंच्या परित्राणा सारखे विधायक वृत्तीचे व स्मरण करण्यास त्वरित भेटणारे असे आहे.

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतत्त्वावर नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असतात. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.

- बिपिनचंद्र अ. ढापरे