शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दत्त जयंती
Written By वेबदुनिया|

इंदूरचे श्रीदत्त मंदिर

रूपाली बर्वे

WD
WD
श्री गुरूदत्ताला ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तीन रूपात मानले जाते. दत्तामध्ये गुरू आणि ईश्वर या दोन रूपांचा समावेश असल्यामुळे त्यांना श्रीगुरूदेवदत्त म्हणूनही ओळखले जाते. मध्यप्रदेशातील इंदूर येथे सुमारे 700 वर्ष जुने श्रीदत्त मंदिर आहे. कृष्णपुरा भागा असलेल्या ऐतिहासिक छत्रीजवळ हे पुरातन मंदिर आहे. दत्तजयंतीला येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते.

इंदुर शहर होळकर राजघराण्यांची राजधानी आहे. होळकर राजघराण्याचे संस्थापक सुबेदार मल्हारराव होळकर यांच्या आगमनापूर्वीपासून येथे दत्त मंदिर आहे. जगतगुरू शंकराचार्यांसह अनेक साधू-संत पुण्यनगरी अवंतिकाला (सध्याचे उज्जैन) जाताना आपल्या आखाड्यांसह या मंदिर परिसरात मुक्काम करत असत.

श्री गुरूनानकजी मध्यप्रदेशाच्या दौर्‍यावर होते. तेव्हा ते इमली साहब नावाच्या पवित्र ठिकाणी तीन महिन्यापर्यंत मुक्कामास होते. दरम्यान, दररोज नदीच्या या संगमावर येत असल्यामुळे मंदिर परिसरातील साधू-संतांबरोबर त्यांची धर्माबाबत चर्चा होत असे.

भगवान दत्ताची निर्मिती हा भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील अद्भूत चमत्कार आहे. भक्ताद्वारे अचानक मदत करणार्‍या शक्तीला दत्ताच्या रूपात मानले जाते. तसेच, मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

गुरूदेवाने भक्तांच्या प्रार्थनेत गुरूचरित्र पाठाला विशेष महत्त्व दिले आहे. गुरूचरित्राच्या एकूण 52 अध्यायात 7491 ओळी आहेत. काही लोक वर्षातून एकदा, तर काही जण एक दिवस किंवा तीन दिवस गुरू चरित्राचे वाचन करतात. मात्र, अधिकांश लोक दत्त जयंत्तीनिमित्त मार्गशीर्ष शुद्ध 7 पासून मार्गशीर्ष 14 पर्यंत वाचन पूर्ण करतात. त्यांचे भक्त 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या महामंत्राचा जप करत भक्तीत मग्न असतात.

दत्तमूर्तीबरोबर नेहमी एक गाय किंवा त्यांच्यापुढील चार श्‍वान दिसतात. पुराणानुसार भगवान दत्ताने पृथ्वी आणि चार वेदांच्या संरक्षणासाठी‍ अवतार घेतला होता. त्यामध्ये गाय आणि चार श्‍वान हे वेदाचे प्रतिक होते. औदुंबराच्‍या वृक्षांखालीही दत्ताचा वास असल्याचे मानले जाते. म्हणूनच प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी आपल्याला औदुंबराचे झाड दिसून येते.

शैव, वैष्णव आणि शाक्त या तीनही संप्रदायाला एकजूट करणा-या श्रीदत्तांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभर पसरलेला आहे. गुरूदेव दत्तात्रय यांच्यामध्ये नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायांची अगाध श्रद्धा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दत्त संप्रदायातील हिंदूबरोबर मुसलमानांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

कसे पोहचाल?
हवाईमार्ग: - इंदूरला मध्यप्रदेशाची व्यावसायिक राजधानी असे मानले जाते. येथे अहिल्याबाई होळकर नावाचे विमानतळ आहे.

रेल्वे मार्ग:- इंदुर जंक्शन असल्यामुळे कोठूनही येथे रेल्वेने पोहचणे सहज सोपे आहे.

रस्ता मार्ग:- इंदुरमधून देशातील सर्वात प्रमुख महामार्ग (आग्रा-मुंबई) जात आहे. देशातील कोणत्याही कानाकोपर्‍यात रस्ता मार्गाने सहजपणे पोहचल्यानंतर रिक्षाने भगवान दत्त मंदिरापर्यंत सहज पोचता येते.