गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Updated : सोमवार, 13 जानेवारी 2020 (16:55 IST)

दिल्ली विधानसभा निवडणूक: मतदान 8 फेब्रुवारीला तर मतमोजणी 11 फेब्रुवारी

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान शनिवार 8 फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक मुख्य निवडणूक आयुक्त सनील अरोरा यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत जाहीर केलं.
 
70 सदस्यीय दिल्ली विधानसभेची मुदत 22 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याआधी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे.
 
विधानसभा निवडणूक तारखा -
नोटिफिकेशन जारी होणार - 14 जानेवारी
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 21 जानेवारी
उमेदवारी अर्जांची पडताळणी - 22 जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारिख - 24 जानेवारी
मतदान - 8 फेब्रुवारी
मतमोजणी आणि निकाल - 11 फेब्रुवारी
दिल्ली विधानसभेत सध्या 62 जागा आम आदमी पार्टीकडे, 4 जागा भाजपकडे तर 3 जागा अपक्षांकडे आहेत. दिल्लीत CBSE अंतर्गत येणाऱ्या शाळांची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून आहे, त्यामुळे या निवडणुका त्यापूर्वीच होणार आहेत.
 
पेटलेल्या दिल्लीत निवडणुका
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात झालेली निदर्शनं, जामिया मिलिया इस्लामिया आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठांमध्ये झालेल्या हिंसाचारांमुळे गेल्या काही दिवसात दिल्लीतलं वातावरण ढवळून निघालं आहे.
 
कालच रात्री JNUमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर उद्भवलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निवडणुकांवर परिणाम टाकू शकतो का, असं विचारल्यावर सुनील अरोरा म्हणाले, "आम्ही या निवडणुका घेण्याच्या दृष्टिकोनाने दिल्ली पोलीसच्या सर्व आयुक्त-उपायुक्तांशी चर्चा केली आहे. आम्हाला आशा आहे की ते मतदानासाठी अनुकूल असं वातावरण तयार करू शकतील."
 
गरज भासल्यास आम्ही निवडणुका पुढेही ढकलू शकतोच राज्यघटनेने निवडणूक आयोगाला ते अधिकारही दिले आहेत, असंही अरोरा म्हणाले.
 
केजरीवाल यांच्यासमोर आव्हान
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली कामं घेऊन ते मतदारांसमोर येत आहे. आपच्या आधी 15 वर्षं दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती.
 
भाजपला इथे गेल्या 21 वर्षांपासून सत्ता मिळालेली नाही. त्यामुळे भाजप संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याची शक्यता आहे.