शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. दिल्ली हादरली
Written By वेबदुनिया|

स्‍फोटानंतर गृहमंत्र्यांचे दोन तासात 3 वेळा ड्रेस चेंज

देशाचे गृहमंत्री देशांतर्गत सुरक्षेच्‍या मुद्यावर सपशेल अपयशी ठरले असून प्रत्‍येक वेळी स्‍फोटांनतर हल्‍ल्‍याची निंदा करणे, मृतांच्‍या नातेवाईकांचे सांत्‍वन करणे आणि दोषींवर कठोर कारवाईचे आश्‍वासन देणे या पलीकडे गृहमंत्री काहीही करू शकले नाहीत, अशा बोटचेपे धोरण राबविणा-या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे.

विशेष म्‍हणजे एवढ्या मोठ्या घटनेनंतर गृहमंत्र्यांनी केवळ भंपकबाजीवर भर देण्‍यापलीकडे काहीही केले नाही. स्‍फोटानंतर 2 तासांत 3 वेळा वेगवेगळे क‍पडे बदलून ते माध्‍यमांच्‍या प्रतिनिंधींसमोर आणि कॅमे-यासमोर गेले. त्‍यांच्‍या अशा वागण्‍याने ते प्रसिध्‍दी मिळविण्‍यासाठी आले आहेत की स्‍फोटासंदर्भात जाणून घेण्‍यासाठी हे काही समजू शकले नाही.

मुंबई, मालेगाव, जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद आणि आता दिल्‍ली प्रत्‍येक वेळी बॉम्‍बस्‍फोटानंतर गृहमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाई करणार असा इशारा देण्‍याशिवाय काहीही केलेले नाही. तर दुस-या बाजूला दहशतवादी सरळ धमकी देऊन आणि आव्‍हान करून स्‍फोटांमागे स्‍फोट करीत आहेत. दिल्‍लीत दि.13 रोजी झालेल्‍या स्‍फोटांनंतरही त्‍यांनी असेच आश्‍वासन दिले आहे. दिल्‍लीत हल्‍ला होणार अशी माहिती असतानाही गृहमंत्रालय गाफील कसे राहिले याबाबत जनतेकडून आता सरळ जाब विचारला जात आहे. तर स्‍फोटानंतर रुग्‍णालयात दाखल केलेल्‍या जखमींच्‍या नातेवाईकांनीही सरकारच्‍या अपयशावर कडक शब्‍दात हल्‍ला चढविला आहे.

प्रत्‍येक वेळी स्‍फोटानंतर माध्‍यमांना सामोरे जाऊन तीच-तीच प्रतिक्रिया देणा-या गृहमंत्र्यांनी तर स्‍फोटानंतर दोन तासात 3 वेळा कपडे बदलवून माध्‍यमांच्‍या कॅमे-यासमोर प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.