शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. ऑनलाईन दिवाळी अंक
Written By विकास शिरपूरकर|

निराधारांना मिळाला 'आधार'

खान्‍देशातील जळगाव जिल्‍ह्याच्‍या पूर्वेकडे वसलेले सुमारे 50 हजार लोकसंख्‍येचे तालुक्‍याचे गाव अमळनेर. अवघ्‍या महाराष्‍ट्राची मायमाऊली म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या मातृहृदयी साने गुरूजींची कर्मभूमी आणि वारकरी संप्रदायाची पताका डौलाने फडकावणार्‍या संत सखाराम महाराजांची अध्‍यात्‍मनगरी.

स्‍वातंत्र्य संग्रामाच्या आंदोलकांची आणि अध्‍यात्मिक वृत्तीच्‍या लोकांची दीर्घकालीन परंपरा जशी या शहरात रूजली तशीच या गोष्‍टींपासून शेकडो मैल दूर असलेली किंबहुना समाजाचा अविभाज्‍य भाग असूनही गावकुसाबाहेर राहिलेली आणखी एक संस्‍कृती येथील 'बोरी' नदीच्‍या किना-यावर रूजली आणि वाढलीही.

भरकटलेल्‍या...वैतागलेल्‍या आणि काही क्षणांची करमणूक करून घेण्‍यासाठी आलेल्‍या पुरुषांच्‍या हक्‍काचा असा एक वर्ग या गजबजलेल्‍या शहरात दाटीवाटीने वास्‍तव्‍यास आहे. ज्‍याला समाज वेश्‍या म्‍हणून ओळखतो तर त्‍यांची परंपरा त्‍यांना 'हरदासी' म्‍हणून संबोधते.

अगदी पुरातन काळापासून भारतात ही परंपरा चालत आलेली आहे. नाचगाणे करायचे, समाजाची करमणूक करायची आणि त्‍यांच्‍या दयेवर आयुष्‍य घालवायचे हीच त्‍यांची परंपरा. कालांतराने त्‍यात बदल होत जाऊन देहविक्रय सुरू झाला. जळगाव जिल्ह्यातल्‍या पाचोरा तालुक्‍यातील
  भरकटलेल्‍या...वैतागलेल्‍या आणि काही क्षणांची करमणूक करून घेण्‍यासाठी आलेल्‍या पुरुषांच्‍या हक्‍काचा असा एक वर्ग या गजबजलेल्‍या शहरात दाटीवाटीने वास्‍तव्‍यास आहे. ज्‍याला समाज वेश्‍या म्‍हणून ओळखतो तर त्‍यांची परंपरा त्‍यांना 'हरदासी' म्‍हणून संबोधते.      
माहिजी हे गाव 'हरदासींचे गाव' म्‍हणून पूर्वी ओळखले जायचे. पुढे या समाजाने रोजगाराच्‍या (देहविक्रय व्‍यवसाय) शोधार्थ स्‍थलांतर केले. त्याला गावकर्‍यांचा विरोधही कारणीभूत ठरला. या समाजाला माहिजी सोडावे लागले. त्‍यापैकी काही जण खूप वर्षांपूर्वी रेल्‍वेचे गाव म्‍हणून अमळनेरला स्‍थायिक झाले. येथे 'व्‍यवसाय' चांगला म्‍हणून मग त्‍यांची संख्‍या या शहरात वाढली आणि शहरातील गांधलीपुरा नावाच्‍या भागात या समाजाची मोठी वसाहत निर्माण झाली. सुरत-भुसावळ रेल्‍वे मार्गावरील आणि धुळ्यापासून जवळ असल्‍याने तसे सोयीचे म्‍हणून 'आंबटशौकीनांची'ही येथे गर्दी होते.

थोड्याफार पैशांसाठी आपले सर्वस्‍व देणार्‍या या समाजामध्‍ये बाहेरच्‍या समाजासारखे जातीभेद किंवा धर्मभेद नाहीत. किंबहुना पैशांच्‍या गरजेपायी या महिलांनी, तर आणि शरीराच्‍या गरजेपायी येथे येणार्‍या पुरुषांनीच ते नष्‍ट केले आहे. त्‍यामुळे हिंदू कोण आणि मुस्लिम कोण हे सांगणे तसे अवघडच.

अनेक पिढ्यांपासून येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या या महिलांकडे घर आहे मात्र 'घरपण' नाही. नाती आहेत पण ती जपायची कशी हेच माहीत नाही. म्‍हणायला समाजरचनेतील सर्वांत खालच्‍या थरात त्‍यांनाही स्‍थान आहे. मात्र तरीही समाजाच्‍या मूळ प्रवाहापासून शेकडो मैल दूर असलेल्‍या या वर्गाला ना शिक्षणाचा गंध, ना जगात होत असलेल्‍या बदलांचा. घरात मुलगी जन्‍माला आली तर ती देवाची... म्‍हणून तिला देहविक्रय करण्‍याच्‍या व्‍यवसायाला लावायचं तर मुलगा जन्‍माला आला तर तो या व्‍यवसायात 'दलाल' म्‍हणून काम करेल अशी या समाजाची रचना. पिढ्यानपिढ्या नव्‍हे शेकडो वर्षांपासून हीच समाजरचना बिनबोभाट चाललेली. या समाजाला ना कधी कुणाला शिक्षित करावसं वाटलं ना कुणाला त्‍यांच्‍या शोषणा विरोधात काही करावसं. म्‍हणायला चार-दोन पोरं जवळच्‍या नगरपालिकेच्या शाळेत तिसर्‍या किंवा चौथ्‍या वर्गापर्यंत शिकलेली. मात्र, ते लगेच विसरलेलीही.

आपल्‍या आणि आपल्‍या कुटुंबीयांचे पोट भरायला अवघ्‍या पन्‍नास-शंभर रुपयांसाठी कुणासोबतही शय्यासोबत करायला तयार असलेल्‍या आणि गरीबी, अज्ञान व अंधश्रध्‍देने पिचलेला असा या महिलांचा वर्ग. या महिलांच्‍या अडचणी त्‍यांचे दुःख आणि व्‍यथा सामाजिक काम करणार्‍या भारती पाटील आणि रेणू प्रसाद यांनी जाणल्‍या आणि सुरू झाली एक चळवळ त्‍यांना आधार देण्‍याची... स्‍वबळावर उभं करण्‍याची 'स्‍वाधार' तिचं नाव.

अमळनेरच्‍या आधार बहुउद्देशीय संस्‍थेच्‍या माध्‍यमातून एड्ससंदर्भात जनजागृती करण्‍याचे काम भारती आणि रेणू करतात. हेच काम 'टार्गेट ओरिएंटेड' भागात झाले पाहिजे, असे 'एमसॅक'ने सुचविलं. त्‍यानुसार वेश्‍यावस्‍तीत एड्सची भयावहता आणि त्‍याचा प्रसार रोखण्‍यासाठी कंडोमचा वापर करण्‍याबाबत जनजागृती करण्‍याचे काम त्‍यांच्‍या संस्‍थेला सोपविण्‍यात आलं.

'आधार'ने काम सुरू केले. सुरुवातीला या वस्‍तीत गेल्‍यानंतर देहविक्रय करणा-या या महिला त्‍यांच्‍याशी बोलायलाच तयार नसतं. हे पोलिसांचे लोक म्‍हणून त्‍यांच्‍यापासून दूर पळणे, आपला धंदा बुडवायला आले म्‍हणून शिवीगाळ करणे तर धमक्या देण्‍यापर्यंत अनेक पध्‍दतीने त्‍यांना वस्‍तीत येण्‍यापासूनच रोखले गेले. त्‍यांच्‍याकडे येणारे ग्राहकही कंडोमचा वापर करण्‍यास स्‍पष्‍ट नकार देत, त्‍यामुळे वस्‍तीतील सर्वांचाच रोष भारती आणि रेणू दोघांना सहन करावा लागला. तर दुसर्‍या बाजूला वेश्‍यांचा वस्‍तीत जातात म्‍हणून त्‍यांच्‍यावर पांढरपेशा समाजानेही टीका केली. वेगवेगळ्या प्रकारे बदनामी होऊ लागली. मात्र रेणू आणि भारती यांनी काम सुरूच ठेवलं. या महिलांचा त्‍यांच्‍या वस्‍तीचा, तेथील पध्‍दतींचा आणि अडचणींचा त्‍यांनी अभ्‍यास केला.

वस्‍तीतल्‍या एक-दोन शिकलेल्‍या मुला-मुलींची त्‍यांनी मदत घेतली. वस्‍तीतून छोटासा दवाखाना चालविणा-या डॉक्‍टरला त्‍यांनी हाताशी घेतलं आणि हळूहळू त्‍यांच्‍याशी ओळखी करून घ्‍यायला सुरुवात केली. या समाजातील सगळ्यात मोठा दोष अज्ञान असल्‍याचं त्‍यांच्‍या लक्षात आल्‍याने मुलांना शाळेत घालण्‍यासाठी त्‍यांनी प्रयत्‍न सुरू केले. 'हरदासी' समाजात पुरुष कोणतेही काम न करता घरातील महिलांच्‍या जीवावर मजा करतो. दारू पिणे, सट्टा खेळणे, मारामार्‍या करणे आणि दलाली करणे हीच काय ती पुरुषांची कामे. हे जाणून संस्‍थेने या पुरुषांना रोजगार उपलब्‍ध करून देण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू केले.

  आपल्‍या मुलांनी या व्‍यवसायात न पडता शिकावं अशी तेथील स्त्रियांची इच्छा आहे. त्यासाठी त्‍या आता प्रयत्न करीत आहेत. शिक्षणाचे महत्‍व त्‍यांना आता पटू लागल्‍याने या मुलांनाही आता शाळांमध्‍ये पाठविले जाऊ लागले आहे .      
या समाजासाठी काम करण्‍याच्‍या उद्देशाने 'स्‍वाधार' या नावाने चळवळ सुरू केली. देहविक्रय करणा-या महिलांचे आणि पुरुषांचे वेगवेगळे बचत गट सुरू केले. पुरुषांनी सुरू केलेल्‍या बचत गटांतून त्‍यांना पान दुकान, चहाचे दुकान, भाजीपाला विक्री करणे यासारखी कामे सुरू करून दिली. तर महिलांनी जमविलेल्‍या पैशांतून त्‍यांच्‍यासाठी लहान-मोठी घरगुती कामे उपलब्‍ध करून दिली जाऊ लागली. सोबतीला वस्‍तीत गेट मिटींगच्‍या माध्‍यमातून एड्सचा प्रसार, त्‍याची भयावहता, कंडोमचे फायदे या गोष्‍टी पटवून दिली जाऊ लागल्या. गुप्‍तरोग म्‍हणजे काय? एड्स कसा होतो? यासह अनेक गोष्‍टींची माहिती त्‍यांना करून दिली जाऊ लागली. यापूर्वी बचतगटासाठी आणि शिक्षणासाठी 'आधार'ने केलेले प्रयत्‍न यशस्‍वी झाल्‍याने या महिलांकडून त्‍यास प्रतिसाद मिळू लागला.

आज वस्‍तीतील परिस्थित बराच बदल झाला आहे. वस्‍तीत आता कंडोमचा वापर वाढला आहे. महिला आज स्‍वतःहून कंडोम वापराचा आग्रह धरतात. या महिलांची नियमित आरोग्‍य तपासणी केली जाते. एचआयव्‍हीग्रस्‍त असलेल्‍या काही महिलांना एआरटी औषधोपचार उपलब्‍ध करून दिला गेला आहे. त्‍यामुळे एचआयव्‍ही लागणीच्या प्रमाणातही घट आली. आहे.

हा व्‍यवसाय आम्‍ही करू इच्छित नाही आम्‍हालाही वाटतं आपलं घर असावं, आमची मुलं शिकावीत मोठी व्‍हावीत त्‍यांनी या व्‍यवसायात न पडता शिकावं, अशी तेथील स्त्रियांची इच्छा आहे. त्यासाठी त्‍या आता प्रयत्न करीत आहेत. शिक्षणाचे महत्‍व त्‍यांना आता पटू लागल्‍याने या मुलांनाही आता शाळांमध्‍ये पाठविले जाऊ लागले आहे. सुरुवातीला सामान्‍य शाळांमध्‍ये या मुलांना प्रवेश देण्‍यास विरोध झाला होता. मात्र आता हळूहळू स्थिती बदलते आहे. या समाजातील कुणाचीही जन्‍म-मृत्युची नोंदच नसल्‍याने शिवाय हा समाज सातत्‍याने स्‍थलांतर करणारा असल्‍याने त्‍यांच्‍याकडे रेशनकार्डच नसल्‍याने शासकीय कामात अडथळे येत असतात. मतदार यादीतही या समाजाची नोंद नाही. 'आधार'ने त्‍यासाठी आता पाठपुरावा सुरू केला आहे. तर या महिलाही आता आपले म्‍हणणे स्‍वतः शासकीय कार्यालयांमध्‍ये जाऊन मांडू लागल्‍या आहेत. महिला व पुरुषांच्‍या बचतगटांचे कामही त्‍यांच्‍याकडूनच पाहिले जाऊ लागले आहे.

आता गरीबी, अज्ञान आणि अनारोग्‍याविरुध्‍दचा हा लढा केवळ भारती पाटील आणि रेणू प्रसाद यांचा राहिला नसून तो आता वस्‍तीतील प्रत्‍येक महिलेचा झाला आहे. वस्‍तीतील महिलांना स्‍वबळावर उभ राहण्‍याचे बळ देणारी ही चळवळ आता त्‍यांच्‍याकडूनच चालविली जाऊ लागली आहे. म्‍हणूनच आधारने आता तिचे 'स्‍वाधार' असं नामकरण करून ती येथीलच काही महिलांच्‍या हातात दिली आहे.

समाजासाठी या बदलाने काहीही फरक पडणार नसला तरीही शतकानुशतके वंचितांचे जीवन जगावे लागलेल्‍या या महिलांच्‍या आयुष्‍यातला अंधःकार आता नष्‍ट होऊ लागला आहे. एका प्रकाशपर्वाच्‍या दिशेने त्‍यांचा प्रवास सुरू झाला असल्‍याने त्‍यांच्‍यासाठी ही मोठी गोष्‍ट आहे.