शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रहण
Written By वेबदुनिया|

शतकातले सर्वांत मोठे सूर्यग्रहण

- सौ. भाग्यश्री कुलकर्णी

ND
सुमारे दहा वर्षांपूर्वी म्हणजे 11 ऑगस्ट 1999 ला भारतात खग्रास सूर्यग्रहण बघण्याची संधी मिळाली होती. आता इतक्या वर्षानंतर आपण 22 जुलै 2009 ला परत तो सोहळा अनुभवू शकणार आहोत. इ.स.2114 पर्यंत घडणार्‍या ग्रहणापैकी हे सर्वांत मोठे ग्रहण आहे. त्याची सुरवात भारताच्या पश्चिम किनारपट्टीहून होऊन नेपाळ, बांगलादेश, भुतान, ब्रह्मदेश, चीननंतर, जपानच्या एका बेटातून जाउन शेवटी प्रशांत महासागरात त्याची समाप्ती होणार आहे. ह्या ग्रहणाचा सर्वांत मोठा कालावधी (6 मिनीट 39सेकंद) प्रशांत महासागराच्या उत्तरेला दिसेल. तसेच चंद्राच्या उपछायेच्या येणा-या भागात अंशिक ग्रहण दिसेल. ते भाग म्हणजे भारत, पूर्व अशियाचा बहुतेक भाग आणि प्रशांत महासागर होत.

खग्रास सुर्यग्रहण2009
भारताच्या सुरत, बडोदा, इंदोर, भोपाळ, जबलपूर, अलाहाबाद, वाराणसी, पाट आणि सिलीगुडी या ठिकाणी पूर्ण ग्रहण दिसेल. चंद्राच्या छायेची केंद्ररेख़ा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरुन भारतीय प्रमाणवेळेनुसार 6 वाजून 21 मिनिटांनी सुरु होईल. सुरवातीच्या काळात हा मार्ग 205 किलोमीटर रुंद असेल. सुरतवासी 3 मिनिट 14 सेकंदापर्यंत ग्रहण बघू शकतील. तिथे सूर्य आग्नेयेला 3 अंशावर असेल. जवळजवळ त्याच वेळेला इंदूरचे (मध्य प्रदेशातील) लाखो लोक़ 3 मिनिट 5 सेकंदांपर्यंत हा सोहळा पाहू शकतील. इथे सुर्य 6 अंशावर असेल. केंद्र रेखेच्या उत्तरेला 40 किलोमीमिटरवर येणा-या भोपाळलाही पूर्ण ग्रहण 3 मिनिट 9 सेकंदासाठी बघता येईल. ते सकाळी 6.22 ला सुरू होईल. हे ग्रहण पश्चिम किनारपट्टीवरुन भारताच्या आग्नेयेला तिरक्या रेषेत जाताना भारताचा 2/3 भाग व्यापला जाणार आहे.वाराणसी आणि पाटण्यातही ग्रहण अनुक्रमे 3मिनिट 7 सेकंद आणि 3 मिनिट 47 सेकंद पाहता येईल. पाटण्याजवळ ग्रहण चांगले दिसेल. कारण तिथे सुर्याची क्षितिजापासूनची उंची अनुक्रमे 13 व 14 अंश असेल. कोलकता शहर केंद्र रेखेच्या ईशान्येला 500 किलोमीटर असल्याने तिथे 0.911 प्रभेचे आंशिक ग्रहण पाहता येईल. म्हणजेच सुर्याच्या चकतीचा 91.1% भाग चंद्रामुळे झाकला जाईल. ग्रहण मार्ग पूर्व नेपाळ आणि आग्नेय बांगलादेशाला ओलांडून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी भारत-चीन सीमेवर पोहोचेल.जपानच्या रयूक्यू बेटावर सर्वांत जास्त वेळ म्हणजे 6 मिनिटे 39 सेकंद दिसेल. तिथून प्रशांत महासागरात आग्नेयेला भारतीय प्रमाणवळेनुसार 9:48 ला पृथ्वीवरुन नाहिसे होईल. पृथ्वीवर 3 तास 25 मिनिटांपर्यंत हे ग्रहण दिसेल. त्याच्या छाया सुमारे 15,150 कि.मी. अंतर व्यापतील.

  सुर्याच्या प्रतिमेला पिनहोलमधून भिंतीवर प्रतिबिंबीत करावे. एका छोट्या आरशाला कागदाच्या तुकड्याने झाका. त्यावर 1 ते 2 सें.मी.व्यासाचे छिद्र असावे. कागद लावलेल्या आरशाचा उपयोग सुर्याची प्रतिमा भिंतीवर प्रतिबिंबित करण्यासाठी करता येईल.      
ग्रहण दिसण्याच्या शक्यता
खग्रास सुर्यग्रहण सकाळी सुरु होईल. भारतातल्या बहुतेक शहरात सुर्योदयावेळीच अंशत: ग्रहण लागलेले असेल. ग्रहणप्रेमींना ग्रहण बघण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागेल. तरीही ग्रहण दिसेलच याची खात्री नाही. कारण पाऊस असू शकतो. बहुतेक ठिकाणी आकाश ढगाळलेले असेल. त्यामुळे भारतात ग्रहण दिसण्याच्या शक्यता कमी आहेत.

सुर्यग्रहणाच्या वेळचे आका
सुर्यग्रहणाच्या वेळी सर्वांत तेजस्वी मंगळ, शुक्र आणि बुध आकाशात पूर्वेला अनुक्रमे 65,54 आणि 6 अंशावर असतील. युरेनस आणी नेपच्युनसारखे ग्रह दिसणे शक्य नाही. बुध पश्चिम क्षितिजावर 10 अंशावर असला तरी क्षितिजाजवळ प्रकाशाच्या अपस्करणामुळे तो दिसणे शक्य नाही. सहज दिसण्या-या ता-यांपैकी प्रोसिओन, सिरीयस, बेटेलग्युज, रायगेल आणि कॉपेला हे प्रमुख होत.