शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रहण
Written By अभिनय कुलकर्णी|

(२५ हजार फूटांवरून) सूर्य पाहिलेला माणूस

WDWD
जमिनीवरून सूर्यग्रहण पाहणे काही विशेष नाही. पण तब्बल २५ हजार फूटांवरून 'ग्रासलेला' सूर्य पाहिल्यानंतर 'जीवनाचे सार्थक झाले', ही केंद्र सरकारच्या विज्ञान प्रसार या संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अरविंद रानडे यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्यांच्या भाग्याचा हेवा वाटल्याशिवाय रहाणार नाही. हनुमानाने त्याच्या लहानपणी सूर्याचा घास घेण्यासाठी अवकाशात उड्डाण करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्याची पौराणिक कथा तर आपल्याला माहितीच आहे. आजच्या आधुनिक हनुमंतांनीही तसाच काहीसा प्रयत्न शतकातील सर्वांत मोठ्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने केला आणि या टीमचे सदस्य होण्याचा मान श्री. रानडेंना मिळाला.

आग्रा येथील हवाई दलाच्या तळावरून श्री. रानडे यांनी पहाटे पाचच्या सुमारास आकाशात एएन १३ या जातीच्या कार्गो विमानातून आपल्या दहा सहकार्‍यांसह आकाशात उड्डाण केले, तेव्हा एक नवा इतिहास घडत होता. गेल्या अनेक दिवसांपासूनचे त्यांचे परिश्रम सार्थकी लागण्याचा हा क्षण होता. हे ग्रहण ऐन मान्सूनकाळात दिसणार असल्याने ढगांचा अडसर ठरण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती. म्हणूनच ढगांच्याही वर जाऊन हे ग्रहण पाहण्याची कल्पना सुचली आणि त्यातून हे सगळे साकारले.

श्री. रानडे यांच्याबरोबर या विमानात विज्ञान प्रसारचे संचालक विनय कांबळे, उदयपूर सोलर ऑब्झर्व्हेटरीचे चार शास्त्रज्ञ आणि दूरदर्शनचे चार कर्मचारी होते. फोटो आणि व्हिडीओ या दोन पद्दतीने सूर्याला 'कवेत' घेण्यात येणार होते. त्याचवेळी दूरदर्शनवर त्याचे लाईव्ह प्रक्षेपणही दाखविले जाणार होते. पण जितक्या सहजपणे दाखवले तेवढ्या सहजपणे ते घडले नाही. त्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. हे ग्रहण सूर्यग्रहणाच्या केंद्रीय रेषेवरूनच कव्हर करण्यात येणार होते. ही रेषा सूरत, बडोदा, इंदूर, भोपाळ, जबलपूर, अलाहाबद, वाराणसी, पाटणा व सिलीगुडी अशी जाणार होती. आकाशात अगदी वर जायचे असल्याने ऑक्सिजन मास्कसह मेडिकल किटही जवळ ठेवण्यात आले होते.

PTIPTI
या तयारीला आलेल्या यशाविषयी बोलताना श्री. रानडे म्हणाले, ''या मार्गावर आम्ही 'रिहर्सलही' केली होती. पण ऐनवेळी आम्ही आमचा मार्ग थोडा बदलला. पहाटे पाच वाजता आम्ही आग्र्यावरून निघालो. ग्वाल्हेर पार केल्यानंतर पुढे मध्य प्रदेशातील मोरावराच्या आसपास आम्हाला हे ग्रहण दिसले. रिहर्सलच्या वेळी आम्ही सोळा ते सतरा हजार फुटांवर गेलो होतो. पण ग्रहणाच्या दिवशी मात्र ग्रहणाच्या केंद्रीय रेषेला चिकटूनच आम्ही तब्बल २५ हजार पूटांवर गेलो. अगदी ढगांच्याही पलीकडे. इतक्या वर गेल्यानंतर हवेच्या कमतरतेमुळे ऑक्सिजन मास्कही लावावा लागला. पण तरीही आम्ही हे ग्रहण पाहिले.''

रानडे आणि त्यांच्या टिमला प्रत्यक्ष ग्रहण दिसले ते जबलपूरच्या आसपास भोपाळच्या दिशेने असलेल्या मोरावरा पसिरातील बजरगडच्या आसपास. त्यासाठी विमानाची मागचे दार उघडण्यात आले होते. त्यातून दूरदर्शनचे कॅमेरे ग्रहण चित्रित करत होते आणि हे शास्त्रज्ञ त्यांच्याकडील उपकरणांच्या सहाय्याने त्याचे निरिक्षण करणे आणि फोटो काढण्याचे काम करत होते. तब्बल तीन मिनिटे त्यांना ग्रहण पाहता आले.

जमिनीपासून २५ हजार फूट उंचीवर सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव कसा होता? यावर बोलताना श्री. रानडे म्हणाले, ''अविस्मरणीय. आयुष्यातली कमाई काय असं कोणी विचारलं, तर नक्कीच मी २५ हजार फूटांवरून ग्रहण पाहिलं असं सांगता येईल. वास्तविक याआधी अशा पद्धतीने कधीच सूर्यग्रहण पाहिलं नव्हतं. त्यामुळे भीती आणि उत्सुकताही होती. पण हे ग्रहण पाहिल्यानंतर मात्र जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान वाटलं. कारण अशा पद्धतीने ग्रहण पाहणार्‍या काही मोजक्या लोकांमध्येच मी होतो.''

केवळ ग्रहण पाहणे हा शास्त्रज्ञांचा हेतू नक्कीच नव्हता. शास्त्रज्ञांना सूर्याविषयी काही महत्त्वाची माहितीही गोळा करायची होती. त्याविषयी बोलताना रानडे म्हणाले, ''होय, हे अगदी खरं आहे. सूर्याच्या बाहेरच्या स्तराला कॅरोना असं म्हणतात. त्याचं तापमान लाखो डिग्री सेंटीग्रेड असते. त्या तुलनेत त्याच्या पृष्टभागाचे तापमान काही हजार सेंटीग्रेड असते. सूर्याच्या या तापमानातील फरकाचा मोठा परिणाम पृथ्वीवर पडतो. शास्त्रज्ञांनाही याचे कोडे पडले आहे. या ग्रहणाच्या निमित्ताने हा कॅरोना जवळून अभ्यासता येणार होता. त्यासाठी लागणारा डाटा यावेळी गोळा करण्यात आला. छायाचित्रे घेण्यात आली. आता त्याचा व्यवस्थित अभ्यास करता येईल. उदयपूरच्या सोलर ऑब्झर्व्हेटरीत हे काम केले जाईल.''