शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. आमने-सामने
Written By अभिनय कुलकर्णी|

तिकीट मिळविण्यासाठी नेत्यांची धडपड !

विधानसभा निवडणुकांची एकमेव चर्चा जिल्ह्यात चालू आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना पक्षांतर्गत तिकीटासाठी नेत्यांचे डावपेच एकमेकांचे अंदाज आणि त्याच्या बातम्या असे राजकीय वातावरण आहे. जोपर्यंत राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत नाहीत तोपर्यंत अशाच उलट सुलट चर्चा चालू राहतील.

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात झालेल्या पुनर्रचनेमुळे प्रस्तापित राजकीय नेतृत्वाला अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जावे लागत आहे यात राष्ट्रवादी काँगे्रसचे पालकमंत्री राजेश टोपे, जालना शहर व मतदार संघावर गेल्या वीस वर्षापासून एक हाती नेतृत्व करणारे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर तर गत विधानसभेत बदनापूरमधून निर्वाचित झालेले राष्ट्रवादीचे आमदार अरविंद चव्हाण यांचे राजकीय अस्तित्व या निवडणुकीत कसोटीला लागणार आहे.

जालना विधानसभा मतदार संघात जालना शहराचा मतदार निर्णायक आहे. लोकसभा निवडणुकीत शहरात भाजप-सेनेला असलेले प्रतिकुल वातावरण यासाठी कारणीभूत मुस्लिम आणि दलित समाजाची वोटबँक हेच आहे. आमदार अर्जुन खोतकरांनी मतदार संघ बदलण्यापाठीशी असलेल्या अनेक कारणांपैकी हे एक महत्वाचे कारण मानल्या जाते.

जालन्यात काँग्रेसचे तिकीट माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासोबत डॉ. संजय राख आणि डॉ. संजय लाखे पाटील यापैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा अंदाज घेऊनच शिवसेना जालन्याच्या आखाड्यात आपला उमेदवार देईल माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी नगराध्यक्ष राजेश राऊत या दोघांपैकी एक उमेदवार असेल. त्यामुळे ही निवडणुक कमालीची चुरस निर्माण करणारी असेल. या निवडणुकीत शिवसेनेच्या दुसर्‍या फ ळीतील नेतृत्वाला संधी मिळणार आहे. त्याला प्रस्तापितांची किती साथ मिळते? याकडे जाणकारांचे लक्ष असेल! शिवसेनेच्या विजयात उपरोक्त घटक महत्वाचा ठरणार हे निश्चित! परतूर विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्यासोबत कोणी संघर्ष करायचा? यावर विरोधकांचे एकमत होताना दिसत नाही. मात्र शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमदार सुरेशकुमार जेथलिया हेच बबनराव लोणीकर यांना विरोध करत आहेत.

हा जिल्ह्यातील भाजप-सेना युतीअंतर्गतचा पेच अन्य मतदार संघावर निश्चित परिणाम करणारा असेल. घनसावंगी मतदार संघातून भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनिल आर्दड यांची तयारी हा या वादाचा परिणाम आहे. गत विधानसभा निवडणुकीत बबनराव लोणीकरांना शिवसेनेचे तालुका प्रमुख माधवराव मामा कदम यांनी बंडखोरीचे दिलेले आव्हान जिल्ह्यातील युतीमध्ये पडलेले सर्वात मोठे भगदाड होते. दहा वर्षापूर्वीच महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्य होते त्यावेळी जालना जिल्ह्यातील याच पाचही विधानसभा मतदार संघात भाजप -सेनेचे आमदार होते. हा इतिहास फार जुना नाही मात्र बदनापूर, भोकरदन व अंबड या तीन जागा भाजप-सेनेच्या अंतर्गत बंडाळी व कमतरतांमुळे पराभूत झाल्या ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील भाजप-सेनेच्या नेतृत्वाने या गोष्टीचा गंभीर विचार करण्याची गरज आहे.

बदनापूर विधानसभा राखीव झाल्यामुळे उमेदवारी मागणार्‍यांची सर्वच पक्षात एकच झुंबड उडाली आहे. सर्वाधिक उमेदवारांची ही निवडणुक असेल एवढेच सांगता येईल. भोकरदन विधानसभा मतदार संघात जाफाबाद तालुक्याचा महत्वाचा सहभाग निर्णायक असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकास्तरावरील सर्व नेते विमान आमदार चंद्रकांत दानवे यांच्या विरोधात उभे राहिल्याने आमदार दानवे यांना या निवडणुकीत खूप मोठी राजकीय लढाई स्वकीयांविरूध्दच लढण्यात वेळ खर्च करावा लागणार आहे. भाजपचा परंपरागत असलेला हा मतदार संघ उमेदवार कोणीही असला तरी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरच संपूर्ण जबाबदारी विजयाचे श्रेय आणि पराभवाचे खापर फोडणारा असतो. सध्यातरी उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यामध्ये कमालीची धडपड मोठ्या चर्चेचा विषय आहे.