गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
Written By
Last Updated : शनिवार, 19 एप्रिल 2014 (15:14 IST)

चित्रपट परीक्षण : "2 स्टेट्स"

चेतन भगत या अफाट लोकप्रिय लेखकाच्या '2 स्टेटस, याच नावाच्या कादंबरीवरुन हा चित्रपट बेतलेला हा एक शादीवाला चित्रपट आहे. शादीवाला चित्रपट म्हणजे तुम्हाला लागेच 'हम आपके है कौन', दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे' वगैरेची आठवण होईल; पण हा चित्रपट जरा वेगळा आहे. पुर्वीच्या या दोन्ही चित्रात लग्ने एकाच समाजातली होती आणि सर्व पात्रे स्वभावाने गोड गोड होती. इथे मात्र हे लग्न आंतरराज्य पद्धतीचे आहे. म्हणजे नवरा दिल्लीकडचा पंजाबी व चेन्नई मद्रासी कन्या आणि दोन्ही बाजुची वडीलधारी माणसे चालू काळाच्या मागे असलेली. म्हणजे 60 च्या दशकात वावरणारी. म्हणजे हुंडा पध्द्ती, देणं-घेणं, मानपान वगैरे मानणारी आणि नको ते इगो बाळ्गून असणारी आहेत त्यांचे इगो बरेच टोकदार आहेत. प्रेमविवाह आणि तोही दोन्ही घरच्या अशा अडेलतट्टू लोकांच्या संमतीने म्हणजे सगळी मजाच मजा.

हल्ली मुलांना व मुलींना नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई असे कुठेही जावे लागत असल्याने. असे आंतरराज्यीय विवाह आपल्याला पहायला मिळतातच; पण या विवाहमागच्या व्यक्तिगत हेव्यादाव्याच्या रंगतदार कहाण्या त्या आपल्या लक्षात येतात.

अनन्या स्वामीनाथन (आलिया भट्ट) आणि क्रिश मल्होत्रा (अर्जुन कपूर) ही जोडी अहमदाबादच्या आय. आय. एम. कॉलेजला प्रवेश घेते. पहिल्याच दिवशी अनन्याला कॉलेजमधील सांबाराची चव आवडत नाही. म्हणून क्रिश तिला बाहेरच्या हॉटेलमध्ये घेऊन जातो. तेथून ते दोघे मित्र होतात. मग कॉलेज आणि बेड, बडे आणि कॉलेज. (अभ्यास कधी करतात कुणास ठाऊक) शेवटी अशा प्रेमाच्या प्रवासातून सुटून, एके दिवशी ते आपल्या नशिबाने ग्रॅज्युएट होतात. नोकर्‍या वगैरे बघतात  व आपल्या आई-वडिलांच्या संमतीने लग्न करायचे ठरवतात आणि मग त्यात येणार्‍या अडथळ्यांच प्रवास सुरु होतो. ज्या चित्रपटाचा शेवटे अपेक्षित असतो, तो चित्रपट कंटाळवाणा होण्याचा धोका असतो; पण दिग्दर्शक अभिषेक वर्मन याने हे खुबीने हे टाळले आहे. शेवटपर्यंत आपण हा सिनेमा एंजॉय करु शकतो. कारण आलिया भट्ट व अर्जुन कपुरने त्यांच्या भुमिका उत्तम केल्यात. रोनित रॉय व अमृता सिंग, रेवती आणि शिवकुमार सुब्रह्मण्यम यांनी आई-वडिलांच्या भूमिका चांगल्या केल्या आहेत. त्यामध्ये उत्तर-दक्षिणेकडचे सामाजिक फरक स्टोरी रायटर व अभिनेत्यांनी हुबेहूब टिपलेले आहेत. विशेषतः आलिया भट्टने मद्र देशीय कन्या सादर करणे हे एक प्रकारचे चॅलेंज होते. ते तिने अप्रतिम जमवले आहे.
अमृतासिंग स्वतः पंजाबी असल्याने तिने पंजाबी ढंग उत्तम सादर केलाय. रोनित रॉयचा दगडी चेहरा कठोर पित्याची भूमिका करताना भाव खाऊन जातो. चित्रपटाचे संगीत, गाणी, नाच या पंजाबी स्टाईलच्या गोष्टी मजा आणतात. मुलांना बिस्किटापासून वधूपर्यंत काहीही हवे असले तरी पालकांना मात्र सतत प्रॉब्लेम असतो. 'सुंदर मुली नेहमी बरोबर असतात.' 'जगातला सर्वात शहाणा आणि वेडा मनुष्य नेहमी आपल्यातच असतो पण कोणता कोण ते आपण सांगू शकत नाही.' अशा अर्थाचे मजेशीर डायलॉग या चित्रपटात भरपूर आहेत. परंतु हा हिंदी सिनेमा असला तरी कॉलेज स्टुडंटस्ना डोळ्यासमोर ठेवून लिहिला असल्याने हे सर्व टाळीवाले डायलॉग इंग्रजीतून आहेत. सुट्टीत ग्रुपने पहायला हा एक उत्तम सिनेमा आहे.
-विद्यासागर अध्यापक