बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

आमच्यासह आमच्या कलांची घट्ट मैत्री

-सलील कुलकर्णी

PR
माझी आणि संदीप खरेची मैत्री वेगळीच आहे. म्हणतात ना ह्रदयाचं ह्रदयाशी नातं असतं, थेट तसंच आहे आमचं. आम्ही एकमेकांना कधी कधी आठ-आठ दिवस भेटतही नाही. पण आमच्या मैत्रीवर याचा कोणताही परिणाम होत नाही.

मी तर म्हणतो की माझ्या आणि संदीपच्या मैत्रीपेक्षा त्याची कविता आणि माझं संगीत अधिक जवळचं आहे. या कलांची मैत्री आमच्यापेक्षा अधिक घट्ट असल्याचं मला वाटतं...

आम्ही कामानिमित्तच प्रथम भेटलो. नंतर आम्ही कधी चांगले मित्र झालो ते कळलंच नाही. संदीपचा स्वभाव मुळातच आयुष्याचा मनसोक्त आनंद लुटणारा आहे. अगदी त्याच्या कवितांतूनही हे दिसून येते. त्याच्या स्वभावातील हाच गुण मला अधिक आवडतो.

मैत्रीची संकल्पनाच फार वेगळी आहे. दररोज भेटणे, फोनवर बोलणे याला आम्ही मैत्री मानत नाही. निदान मी तरी याला मैत्री म्हणत नाही. ही मी तडजोड मानतो. सामंजस्य समजतो.

दररोज ऑफिसमध्ये गेल्यानंतर एखाद्याला बोलतो, त्याच्यासोबत काही गोष्टी शेअर करतो म्हणजे मैत्री नाही. मी आणि संदीप कामानिमित्त बाहेर असलो तर आम्ही कधी-कधी आठ दिवसही एकमेकांशी बोलत नाही. पण मला नाही वाटत यामुळे आमच्यात कधी दुरावा निर्माण झाला असेल.

उलट अशामुळे आमची मैत्री अधिक घट्ट होते. आमच्या दोघांचे विचार सारखे आहेत असे नाही. परंतु, आमच्या कला इतक्या सारख्या आहेत की कधी कधी आम्हाला कळतच नाही की एखादं गाणं कंपोज करताना त्याने काय सुचवलं होतं आणि मी काय सुचवलं होतं? याला मी मैत्री मानतो.

संदीपच्या बाबतीत आणखी एक बाब मला सांगावीशी वाटते. संदीप कधीकधी आमचा कार्यक्रम एक प्रेक्षक म्हणूनही पाहत असतो. त्याचा हा स्वभावच मला खूप आवडतो.

आमच्या 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमाचा 500 वा भाग झाल्यानंतर संदीपने 'बाबा' या गाण्याविषयी मला एसएमएस करून शुभेच्छा दिल्या. एक क्षण मी सारं काही विसरून त्याचा तो 'एसएमएस' पाहत होतो. हा क्षण आमच्या मैत्रीतली अत्यंत भावुक क्षण होता. त्याने स्टेजवरून खाली जाताना मला 'एसएमएस' केला, 'ते गाणं तू खरंच खूप छान गायलास', मी एक प्रेक्षक म्हणून ते गाणं ऐकलं. यापूर्वीही असाच एक क्षण मला आठवतो. मी बोरकरांची संधीप्रकाशात कविता गात असताना संदीपला ते इतकं आवडलं की तो स्टेजवरच रडला होता.

मला माहीत नाही आमच्या मैत्रीत काय आहे, पण मला इतकंच माहीत आहे की आम्ही दोघे एकत्र आलो की एक अधिक एक दोन नाही तर अकरा होतात.....

(शब्दांकन: नितिन फलटणकर)