शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

मैत्री... तिची त्याची

WD


ती, अगदी नाकासमोर चालणारी. मुलांबददल मनात एक अनामिक भीती बाळगून असलेली. कुणा मुलाशी बोलायलाही न धजवणारी. एखाद्या मुलाशी आपली घट्ट मैत्री होऊ शकेल असा विचारही तिने कधी केलेला नाही. तर त्याची स्थिती मात्र त्याहून जरा वेगळी. नवख्यांसाठी काहीसा अबोल, तर त्याला ओळखणार्‍यांच्यदृष्टीने चालते-फिरते रेडिओ स्टेशन. थोडासा मुडी म्हणा हवं तर. स्वारी रंगात असली की भरभरून बोलणार, नाहीतर घुम्म. अनेक मित्र-मैत्रिणी असलेला. मात्र तरीही एकटाच. कसल्या तरी शोधात. कदाचित मित्र-मैत्रिणींच्या गराड्यातही एखाद्या हक्काच्या अगदी जवळच्या मित्राच्या शोधात.

WD


हं... कदाचित त्याच शोधात असावा तो. एका अशा व्यक्तीच्या शोधात जिच्याशी त्याला भरभरून बोलता येईल. अगदी न थांबता. हातचं काहीही न राहू देता मनातलं साठलेलं, साचलेलं, हवहवंस, बोलावंसं वाटणारं मात्र कुणालाही न सांगितलेलं असं सगळं-सग्गळं भरभरून बोलून मोकळा होईल. अशा एका मैत्रीच्या शोधात.

कितीतरी दिवसांपासून त्याला अशा हक्काच्या व्यासपीठाचा शोध होता. आणि एक दिवस अचानक एखाद्या वावटळीसारखी ती त्याच्या जीवनात आली. त्याचं आख्खं विश्वच त्यादिवसाने पालटून गेलं. एका रॉंग नंबरमुळे दोघांचं पहिल्यांदा बोलणं झालं ते अवघ्या अर्ध्या मिनिटासाठी. आणि पुन्हा दुस-यांदा त्या दिवसाचा तो नंबर मिळाला की नाही हे विचारण्यासाठी त्याने स्वतःहूनच तिला केलेल्या फोनमुळे. सुरुवातीला तिनं त्याला काहीतरी सांगून टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तिच्या आवाजात काही तरी जादू असल्यासारखं वाटत राहिल्यानं त्यानं तिला अधून-मधून फोन करणं सुरूच ठेवलं.

WD


एव्हाना पाच-सात वेळा फोनवर बोलणं झाल्यामुळे दोघांना एकमेकांचा प्राथमिक परिचय झालाच होता. तो खानदेशातला तर ती पार कोकणातली. दोघंही एकाच राज्यातली असली तरीही भौगोलिक परिस्थिती, रीतिरिवाज वेगवेगळे. त्यामुळे त्यांना बोलायला आता विषयच मिळाला. तो तिला कोकणातल्या पर्यटन स्थळांबददल तिथल्या लोकजीवनाबददल आणि खाण्या-पिण्याच्या पद्धतीबददल विचारायचा तर ती त्याला खानदेशातले लोक, त्‍यांच्‍या रीतिरिवाज, परंपरा याबददल विचारायची. दोघांची आता चांगलीच गट्टी जमली. तब्बल दीड-दोन महिने दोघही एकमेकांशी बोलत होते. मात्र ना त्याने तिला पाहिलेलं ना तिनं त्याला.

WD


कोकण-खानदेशावरून आता मैत्री एकमेकांच्या घरापर्यंत, शिक्षणापर्यंत आणि करियरपर्यंत आली. दोघांचे विचार सहज जुळत असल्याने त्यांच्या गप्पा राजकारणापासून बॉलीवूडपर्यंत आणि स्वातंत्र्यलढ्यापासून विज्ञानतंत्रज्ञानापर्यंत भरपूर रंगू लागल्या. दोघांनाही एकमेकांच्या आवडी-निवडी मनं आणि मतंही आता चांगलीच ठाऊक झाली. असं असलं तरीही अजूनही दोघं एकमेकांसाठी अनोळखीच. एक दिवस त्यानंच तिला भेटणार का? म्हणून विचारलं. आणि इतके दिवस त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलणारी ती गोंधळली. त्याला काय सांगावं हो की नाही हा गोंधळ बरेच दिवस चालला. अखेर एक दिवस भेटायचं ठरलं आणि चक्क दोघे भेटलेही. भरभरून बोलले एकमेकांशी.


WD


आता तिची आणि त्याची मैत्री अधिकच घट्ट झाली आहे. त्यांच्यात मैत्रीचं इतकं निखळ नातं तयार झालंय की दोघं कुठल्याही विषयावर एकमेकांच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेत नाहीत. एका हक्काच्या मैत्रीची त्याची गरज आता पूर्ण झाली आहे. तर तिलाही कुणीतरी आपलं हक्काचं मिळालं आहे. इतके दिवस कुणाही मुलाशी मैत्री नसलेल्या तिचा तो आता जीवाभावाचा सखा बनला आहे. दोघं एकमेकांशी खूप बोलतात... खूप भांडतात... आणि एकमेकांवर रागावतातही. एकंदरीतच दोघांचंही आता छान चाललंय.