शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

भारतातील गणेश मंदिरे

गणेशोत्सव महाराष्ट्रात प्रामुख्याने साजरा होत असला तरी गणेशाची देशभरातही अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्या सर्वांची माहिती देणे अशक्य आहे. अनेक जैन, बौद्ध मंदिरात गणपतीची मूर्ती स्थापन केली आहे. त्यापैकी काही महत्त्वाच्या मंदिराची ही माहिती. 
लुप्त गणपती क्षेत्रे

1. मंगळाने कठोर तपस्या करण्याच्या उद्देशाने नर्मदा किनारी एका ठिकाणी गणेशाची स्थापना केली होती. शास्त्रांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख 'पारीनेर' या नावाने केला आहे परंतु हे ठिकाण कोठे ते नेमके माहित नाही.
2. 'बल्लाळ विनायक' या नावाने एका क्षेत्राचा उल्लेख शास्त्रात आहे. हे क्षेत्र सिंधुदेशात कोठे तरी एका ठिकाणी आहे. परंतु संपूर्ण माहिती हाती नाही.
3. महर्षी कश्यपाने आपल्या आश्रमात वक्रतुंडाची प्रतिमा स्थापन करून तप केले होते. पण हा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे त्याची माहिती उपलब्ध नाही.
4. तेलंगणातील अनल असुराचा वध करण्यासाठी गणपतीने अवतार घेतला होता. याचा उल्लेख जरी मिळत असला तरी त्या ठिकाणाची माहिती मिळत नाही. 
दक्षिण भारतातील गणेश मंदिरे

 
WD

दक्षिण भारतातील गणेश मंदिरे
1. मदुराई जिल्ह्यातील तिरूप्परंकुम पर्वताच्या कुशी‍त भव्य गणेश मंदिर आहे. या ठिकाणी स्वामी कार्तिकेय यांचा विवाह झाला असल्याची दंतकथा आहे. अगदी जवळच 'शर श्रवण' नावाचा प्राचीन तलाव आहे.

2. बारा ज्योर्तिलिंग व चार धामांपैकी रामेश्वरम् द्वादश हे एक धाम असून येथे श्रीरामाने प्रथमत: गणपती आणि नंतर रामेश्वर लिंगाची पूजा केली होती.

3. तिरूच्चिरापल्ली येथील ‍तीन शिखरांमधील सर्वांत उंच शिखरावर गणपतीचे अति प्राचीन मंदिर असून हे मंदिर 'उचिपिल्लेयार' या नावाने प्रसिद्ध आहे.

4. पॉंडेचरीच्या समुद्रकिनारी परदेशी लोकांनी बनविलेले एक मंदिर आहे.

5. कन्याकुमारी : हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे ज्या ठिकाणी एकत्र मिळतात तेथे गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराचे दर्शन केल्यावरच कुमारिकादेवीचे दर्शन घेतले जाते.

6. गोकर्णात सिद्ध गणपतीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर रावणाने आघात केल्याचे चिन्ह आहे.

चमत्कारीक मूर्ती : केरळ राज्यातील कासरा गौड रेल्वे स्टेशनपासून जवळ असलेल्या माधुरे गावात महागणपतीचे एक मंदिर आहे. येथे स्वयंभू गणपतीची प्रतिमा आहे. या मंदिराविषयी एक कथा आहे. एकदा एक दलित महिला गवत कापत असताना तिला जमिनीत एक मूर्ती दिसली. त्या मूर्तीच्या अंगावर घाव पडल्याने रक्त वाहत होते.

तिने ही बातमी गावकर्‍यांना सांगितली तेव्हा गावकर्‍यांनी लगेच त्या ठिकाणी एक मंदिर बनविले. नंतर त्या मूर्तीतून वाहणारे रक्त बंद झाले. अकराव्या शतकात हे मंदिर बनविले होते. त्यावेळी ही प्रतिमा 8 से.मी. x 4 से. मी एवढ्या उंचीची होती. आता ती 25 से.मी. x 10 से.मी एवढ्या मापाची झाली आहे. तिने जवळजवळ सर्व गाभारा झाकून टाकला आहे. 

श्वेत विघ्नेश्वर क्षेत्र : अमृत मंथनाच्यावेळी देवांना अमृत मिळाले नाही. तेव्हा देवांनी भगवान विघ्नेश्वराची आराधना केली. त्याचा वर मिळाल्यावर देवांना अमरत्व मिळाले. दक्षिण भारतातील अति प्रसिद्ध तिर्थस्थान आहे. ते कावेरी किनारी आहे. 
उत्तर भारतातील गणेश मंदिरे

 
WD

उत्तर भारतातील गणेश मंदिरे
उज्जैनमध्ये प्रसिद्ध ज्योर्तिलिंग महाकालेश्वराचे मंदिर आहे. तसेच सहा प्राचीन विनायक मंदिरे आहेत. 1. प्रमोद विनायक 2. मोद विनायक 3. दुर्मख विनायक 4. सुमुख विनायक 5. अविघ्न विनायक 6. विघ्न विनायक. श्री लक्ष्मणाने स्थापन केलेले गणेश तीर्थही उज्जैनमध्ये आहे. अमरकंटकच्या महर्षी भृगुच्या आश्रमात सिद्धी विनायक गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे गणपतीला दोन भुजा आहेत.

जोधपूर : मुख्य शहराजवळील घटियाला गावात राजस्थानी शैलीचा स्तंभ आहे. या स्तभांच्या चारही बाजूने गणेशाची प्रतिमा आहे. हा स्तभ इ.स. 882 साली बांधलेला असल्याचे लिहिले आहे.

रणथंबोर : राजस्थानच्या सवाई माधोपूर जवळ असलेल्या पर्वत रांगेच्या मध्यभागी अतिप्राचीन गणेश मंदिर आहे. या मंदिरात स्थापित गणेशाला लग्नसमारंभाप्रसंगी आणि शुभ कार्यासाठी प्रथमत: निमंत्रण दिले जाते. दरवर्षी येथे हजारो लग्नपत्रिका प्राप्त होतात.

वृदांवन : येथे मोठ्या गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

वाराणसी : वाराणसीमध्ये गणपतीची अनेक मंदिरे आहेत. ढूंढीराज गणपतीचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. याशिवाय काशीतील 56 गणपती मंदिराचा उल्लेख पुराणात मिळतो.