शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

डॉ. दाभोळकर हत्या : सनातनचा तावडे मुख्य सूत्रधार

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेला सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे हा हत्येचा सूत्रधार असल्याचे यात नमूद करण्यात आले असून सारंग अकोलकर व विनय पवार यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे.
 
व्यवसायाने डॉक्टर असलेला तावडे हा ‘सनातन’चीच एक शाखा असलेल्या हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता आहे. पनवेलजवळच्या कळंबोली येथे त्याचा दवाखाना असून येथीलच सनातनच्या आश्रमजवळ त्याचे घर आहे. दाभोळकरांच्या हत्येच्या संशयावरून काही दिवसांपूर्वी त्याला सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने जून महिन्यात पुण्यातील सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरावर छापे टाकले होते. तावडे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यावेळी संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला. अकोलकर व तावडे हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे तपासात पुढे आले.

भूमिका स्पष्ट करावी : हमीद 
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होण्यास उशीर झाला, पण आता आरोपपत्र दाखल होणे हे तपासाला योग्य दिशेने नेणारे पाऊल म्हणता येईल. सनातन आणि हिंदू जनजागृती समिती यांच्याबाबत सरकारने आपली भूमिका आतातरी स्पष्ट करावी. अजूनही मुख्यमंत्री आणि गृहमंर्त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही, अशी मागणी डॉ. हमीद दाभोळकर यांनी केली आहे. याविषयी बोलताना हमीद दाभोळकर म्हणाले, गेली काही वर्षे आरोपींवर संशय होता, पण कारवाई झाली नव्हती त्यामुळे या हत्या ते घडवू शकले.