शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By वेबदुनिया|

''...पुढच्या वर्षी लवकर या''

-सौ. स्वाती दांडेकर

PTI
आपण सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचा दहा दिवसांचा मुक्काम हलण्याची आता वेळ आलीय. त्याच्या दहा दिवसांच्या वास्तव्याने आपले जीवन श्रीमंत आणि समृद्ध झाल्याचा अनुभव आपण घेतला. त्याच्या आगमनाने तोपर्यंत क्लांत असलेल्या मनाला शांतता लाभते. त्याच्या या दहा दिवसाच्या वास्तव्याने वर्षभर जगण्याची उर्जा मिळते. वर्षभर येणार्‍या संकटांना सामोरे जाण्याचा विश्वास मनात निर्माण होतो. विचारात सकारात्मकता येते.

गणपती म्हटलं की बालपण आठवतं. माझं बालपण इंदूरला-महाराष्ट्राबाहेर- गेलं असलं तरी गणेशोत्सवाचा तिथलाही थाट काही न्यारा असायचा. इंदूरच्या प्रसिद्ध राजवाडा भागात आता उभं रहायलाही जागा नाही. त्यावेळी तिथे 7 सीटर टेम्पो आणि बाजूला टांगे दिसायचे. नदीकिनारी गुमट्या, रस्त्यावर कापड पसरून फुल विक्रेते बसायचे. कृष्णपुरा पुलावर आखाड्यांची, लेझीम आणि ढोलकाची थाप पडलेली ऐकू यायची. हे सारं भारावून टाकणारं होतं.

ALSO READ श्री गणेश विसर्जन : हे 2 मंत्र म्हणत देवाला निरोप द्या, मिळेल भरभरुन आशीर्वाद

सकाळी लवकर उठून शेणमातीने घर सारवून सुबक रांगोळी काढायची. माझे वडील धोतर, उपरणं आणि डोक्यावर टोपी घेऊन गणपती आणायला जायचे. हातातल्या पाटावर बसून गणपतीचे आगमन व्हायचे. मी आणि माझी भावंड हातात पळी-पंचपात्री वाजवत तोंडाने ''गणपती तुझे नाव चांगले'' अस म्हणत त्याचे स्वागत करत असू. आणि मग दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. नाटक, सिनेमा, ऑर्केस्ट्रा, रांगोळी, दोरीच्या उड्या, असे विविध कार्यक्रम जागोजागी व्हायचे.

गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक (झाकी) निघायची. मल्हारगंज दशनीमा धर्मशाळेत सजणारी झाकी देखणी असायची. रात्री अकरा वाजता सुद्धा भुट्टा, शेव, मुरमुरे, कचोरी, समोसा ह्यांची दुकान चालू असायची. प्रत्येक दिवस आपल्या रंगात रंगलेला आणि येणारा पण तसाच. काळ बदलला, परिस्थिती बदलली, व्यवहार बदलले.

ALSO READ श्री गणेशाला २१ चं दुर्वा का वाहाव्यात ?

आता वेळेच्या अभावी गणपती ऑफिस मधून येता येता डिकीत येतो तर ''येथे मोदक तयार मिळतील'' अशी पाटी लिहिलेल्या ठिकाणाहून प्रसाद घरी येतो. हळू-हळू मिल बंद झाल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी निघणार्‍या झाक्यांची कला आता तितकी राहिली नाही. झाक्यांच्या दिवशी चार वाजता बंद होणारे रस्ते आजही बंद होतात. पण धक्काबुक्की करून झाकी पाहण्याऐवजी लोक आता टिव्हीवर त्याचे प्रसारण पाहू लागले आहेत. बाम्बस्फोटाच्या भीतीने लोक गर्दी सोडून घरात बसायला लागले.

हा सर्व बदल पाहता मनात सहज विचार येतो जर आपण असे बदलत गेलो तर भावी पिढीला आपण काय वारसा देणार? सर्वात मिसळून राहण्यासाठी फिरावे लागते. घरी वेळ द्यावा लागतो. संस्कृती समजण्यासाठी मुलांबरोबर वेळ द्यावा लागतो तरच संस्कृती टिकते. फक्त परिवर्तनाची भाषा बोलून आपल्या कर्तव्याची इतिश्री होत नाही हा वारसा पुढे चालवावा लागतो.

ALSO READ Ganesh Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष

वर्तमान परिस्थितीला बदलण्याची जबाबदारी आपली आहे. एका सुशिक्षित समाजाची आहे. आम्ही मॉडर्न होण्याच्या नावाखाली खूपच पुढे निघून गेलो आहोत. आपल्या पायावर, विचारांवर थोडासा विश्राम देऊन येणाऱ्या पिढीचा विचार करूया. आज आपल्याला रामरक्षा मिळून 50 श्लोक पण माहीत नाहीत, हा वारसा पुढे कसा चालवणार? आपली संस्कृती विस्तृत करायला आपला आध्यात्मिक विकास करणे अत्यंत गरजेचे आहे.

म्हणूनच श्री गणरायाला निरोप देण्याच्या या मुहूर्तावर आपण जागरूक होण्याचा वसा घेऊया. मन:पूर्वक गणेशाला म्हणूया ''गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या''