शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

आदासा येथील शमीविघ्नेश

WD
नागपूरपासून 35 कि.मी. अंतरावर असणार्‍या आदासा गावचा वक्रतुंड शमीविघ्नेश हा या अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. या गणपतीचे मंदिर काहीसे उंचावर असे आहे. अठरा फूट उंच, सात फूट रुंद आणि आठ हातांची ही गणपतीची मूर्ती आगळी वेगळी अशी आहे. गाभार्‍यात प्रवेश करताच मूर्तीची भव्यता नजरेत भरते. बळी राजाने गणपतीचा अग्रपुजेचा मान हिरावल्याने वामनाने बळी राजाला धडा शिकवायचे ठरवले. त्यापूर्वी वामनाने या गणपतीची स्थापना केल्याची एक आख्यायिका सांगितली जाते. गंमत म्हणजे हा गणपती लग्नाळू मुला-मुलींना मदत करतो असा दृढ समज आहे. त्यामुळे हव्या त्याच मुलीशी किंवा मुलाशी लग्न व्हावे म्हणून या गणपतीच्या दर्शनाला येणार्‍या उपवर वधूंची गर्दी असते.

टेकडीवरून दिसणारे टुमदार आदासा गाव आणि सभोवतालची निसर्गसृष्टी मन सुखावून जाते. गणपतीच्या मंदिराबाहेर मिळणारी उकडलेली बोरे, तिखट-मीठ लावलेले पेरू आणि रानमेव्यावर येथे येणारे भक्त ताव मारताना दिसतात.