शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

गणरायाची मूर्ती घरच्याघरी

- शंभू गोडबोले

PR
श्रीगणरायाची पूजा सर्वत्र केली जाते. महाराष्ट्राबाहेरची मराठी कुटुंबेही गणेशोत्सव तितक्याच उत्साहाने साजरा करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तिथेही पहायला मिळतात. काही मराठी कुटुंबात तर काही आगळ्या परंपराही पाळल्या जात आहेत. इंदूरचे जोशी कुटुंबीय हे त्यापैकीच एक. या घरात गणपतीची मूर्ती ही घरातील सदस्यांतर्फेच तयार केली जाते. विशेष म्हणजे शिल्पकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता केवळ गणपतीवरील अपार श्रद्धा आणि परंपरा यातून हे साध्य होते, अशी या कुटुंबीयांची कृतज्ञ भावना आहे. सध्या चौथ्या पिढीतील किशोर जोशी आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून गणपतीची मूर्ती स्वतः: बनवून मग त्याची प्रतिष्ठापना करतात. त्यांच्या पणजोबांपासून हे कार्य सातत्याने सुरू आहे.

मूर्ती बनविण्याची माहिती देताना ते म्हणाले, सर्वप्रथम पिवळी माती व कापूस एकत्र करून एकजीव होईपर्यंत कुटून काढली जाते. त्यानंतर मूर्तीच्या आकारानुसार पाट करणे, आसन, मूर्तीचे प्रत्येक अवयव वेगवेगळे तयार करून घेतले जातात. एखाद्या अवयवाचा बेढबपणा बदलण्यासाठी मूर्तीवर ओले कापड ठेवले जाते. संपूर्ण वेगवेगळे अवयव आसनावर जोडत मूर्ती पूर्णाकार घेत असते. यामुळे मूर्तीची सुबकता जपणे शक्य होते. मूर्ती साच्यातील नसल्यामुळे भरीव असते. त्यामुळे साधारण एक ते दीड फूट मूर्तीचे वजन जवळ जवळ 80 ते 85 किलो एवढे होते. मूर्ती तयार झाल्यानंतर रंगकाम करण्यात येते. कॅमलचे वॉटर कलर तसेच आभूषणांसाठी रेडियम आम्ही वापरतो. हे रंग पाण्यात सहज विरघळून जात असल्याने मूर्ती विसर्जन केल्यावर त्याचे प्रदूषण होत नाही. मूर्ती तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो.

गणपती व रेणुकादेवी हे जोशींचे कुलदैवत आहे. प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करण्यात येणा-या मूर्तीचे विसर्जन न करता ही मूर्ती वर्षभर घरातच ठेवून पूजा केली जाते. पुढल्या वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यावर अनंत चतुर्दशी दिवशी या मूर्तीचे विसर्जन केले जाते. घराण्याची परंपरा व आपली श्रद्धा म्हणून त्यांनी हा वारसा आजही सुरू ठेवला आहे. जोशींचे पणजोबा, आजोबा, त्यांचे काकाही मूर्ती बनवीत असत. त्यांच्या पश्चात किशोर जोशी त्यांचा वारसा चालवीत आहेत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणेच त्यांचा मुलगा मनीष हा देखील आता मूर्ती बनवायला लागला आहे. टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघताना, हातात बॅट घेतलेला गणपती अशी कल्पना त्याला सुचून त्याने तशी छोटी मूर्ती देखील साकारली आहे. आपल्या घराण्याचा वारसा व परंपरा यापुढेही सुरू ठेवण्याचा त्याचा मानस आहे.