शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

टिटवाळ्याचा महागणपती

MH NewsMHNEWS
दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत न केल्यामुळे शकुंतलेला शाप मिळाला आणि राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. उत्साहाने पतीगृही गेलेली नवीन शकुंतला त्यामुळे आल्या पावली परत फिरली. कण्व ऋषींकडे परत आलेल्या या शकुंतलेने गणपतीची आराधना केली आणि दुष्यंताला सारे काही आठवले. शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती.

टिटवाळ्याचा महागणपती! महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांप्रमाणेच हे श्रीगणपती क्षेत्रही प्रसिद्ध आहे, असे म्हणतात. याच परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतला इथेच वाढली. त्यामुळेही या ठिकाणाला एक प्राचीन महत्त्व आहे. टिटवाळा हे छोटेसे गाव मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. टिटवाळा स्टेशनवर उतरले की, मंदिरात जाण्यासाठी रिक्षा मिळतात. पण आश्चर्य म्हणजे इथल्या रस्त्यावर अजूनही टांगे धावतात. टप.. टप.. आवाज करत धावणार्‍या टांग्यांमध्ये बसून मंदिरापर्यंत जायला लहान-मोठे सगळ्यांनाच आवडते.

MH NewsMHNEWS
गणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. चतुर्थी, मंगळवार या दिवसांशिवाय एरवी फारशी गर्दी नसल्यामुळे रांगेत ताटकळत उभे रहावे लागत नाही. आपण थेट गाभार्‍यात पोहचतो. शेंदरी रंगाची रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेते. रेखीव चेहरा, पुढे आलेली सोंड यामुळे मूर्तीला एक ठसठसीतपणा आला आहे. सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील ह्या मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत. मूर्तीला रोज नेटकेपणाने पितांबर नेसवला जातो. डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मुर्तीवर चांदीचेच छत्र आहे. इथे फुलांची सुरेख आरस केलेली असते. सध्या मोगर्‍याचे दिवस असल्यामुळे मोगर्‍याचे हार छताला बांधले जातात. त्याचा मंद वास संपूर्ण गाभार्‍यात दरवळत असतो. ही गणपतीची मूर्ती गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून आपली नजर खिळवून ठेवते. त्यामुळे आपण आजूबाजूला बघण्याचेच विसरुन जातो. नंतर काही वेळाने लक्ष जाते ते देवघराकडे. जेथे गणपतीची मूर्ती आहे तो संपूर्ण देवारा चांदीचा बारीक कलाकुसर केलेला आहे. चांदीच्या देवार्‍यात असलेली केशरी मूर्ती आणि हिरव्या दुर्वा, पांढरी मोगर्‍याची व जास्वंदाची फुले यामुळे सुरेख रंगसंगती साधली जाते आणि बघणार्‍याची नजर फिरवून ठेवते. गाभारा आणि सभा मंडप मध्ये जाळी लावून वेगळे केले आहे. गाभार्‍याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या दाराने बाहेर पडून आपण सभा मंडपात पोहचतो. इथे स्वरबद्ध गणपती, अर्थवशीर्षाची आवर्तनं सुरू असतात. सत्य विनायक, गणेश याग इत्यादी भक्तांनी बांधलेल्या पूजा सुरू असतात. त्यांचा एकत्रित ऐकू येणारा नाद मनाला शांती देऊन जातो.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून ते सभा मंडपातून बाहेर पडेपर्यंत मूर्तीचे सतत दर्शन आपल्याला होत राहते. मंदिराच्या आवारात एक छोटी दिपमाळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे. हा एकंदर परिसरच खूप रमणीय आहे. आंबा, करवंद, जांभळे असला रानमेवा बघून भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटते.

टिटवाळ्याचा असा हा महागणपती! मन:शांती देणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा आणि हो धकाधकीच्या जीवनात विरंगुळ्याचे काही क्षण भक्तांच्या ओंजळीत अलगदपणे घालणारा!
साभार- महान्यूज