गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: बारामती , शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (11:17 IST)

अजित पवारांच्या ‘दादागिरी'चा फेरअहवाल मागवला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कथित वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. 'आपली बहीण सुप्रिया सुळेंना मत द्या, अन्यथा गावचे पाणी तोडेन’, पवारांच्या या कथित वक्तव्याची चौकशी करून फेरअहवाल सादर करण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत. 

अजित पवारांनी मासाळवाडीच्या गावकर्‍यांना कथित धमकीप्रकरणी ‘आम आदमी पक्षा’चे उमेदवार सुरेश खोपडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पवारांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या प्रकरणी बारामतीचे प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जाधव यांनी चौकशी अहवाल सादर केला होता. मात्र या अहवालातून पवारांना क्लिनचिट मिळण्याची चिन्हे असल्याचा संशय आल्याने खोपडे व महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाला याबाबत पुन्हा हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, जाधव यांनी दिलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे सांगत राव यांनी हा  अहवाल फेटाळला असून पुन्हा चौकशी करण्याचे आदेश जाधव यांना बजावले आहेत.