गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 23 मे 2014 (11:13 IST)

काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांवर नाराज!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. राज्यातही कॉग्रेसला केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती पक्षाचे प्रचाराचे सूत्रे होती. मात्र त्यांना आपला प्रभाव पाडता आला नाही. तसेच चव्हाण हे गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि राजेंद्र मुळीक यांची विशेष काळजी घेतात. असेही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. यामुळे नारायण राणे आणि नितीन राऊत यांनी राजीनामा दिल्याचे समजते. 

मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांपेक्षा वयाने व अनुभवाने कमी असून मुख्यमंत्री कायम सतेज-राजेंद्र जोडीकडून सल्ला घेत आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही नारायण राणे, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे व नितीन राऊत यांच्यावर विश्वास दाखवण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दोघांवरच कायम विश्वास टाकला. निवडणुकांमध्ये तरी ते ज्येष्ठ मंत्र्यांचा सल्ला घेतील, असे वाटत होते. मात्र, पृथ्वीराजांनी पुन्हा पाटील व मुळीक यांनाच प्राधान्य दिल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात आता उघड नाराजी व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसच्या सध्याच्या मंत्रिमंडळात गेली चार दशके निवडणुकीचा अनुभव असलेले मंत्री आहेत. मात्र, अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी कधीच विश्वासात घेतले नाही. शिवाय प्रचाराची आखणी करताना दोघांचाच सल्ला घेतला. पराभवानंतर आता ही चर्चा उघड होऊ लागली असून ज्येष्ठ मंत्री राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांना खुर्चीवरून हटवण्यासाठी सक्रिय होऊ लागले आहेत. काँग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांवर विश्वास दाखवला गेला असला तरी काँग्रेसअंतर्गत प्रचंड राग खदखदत असून तो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उफाळून येऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.