शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मार्च 2020 (13:50 IST)

गुढीपाडवा 2020: शुभ मुहूर्त आणि पूजन विधी

भारतीय परंपरेनुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असून सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सौर पंचांग सुरू होते. या दिवशी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केलं जातं.
 
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याचं अत्यंत महत्त्व आहे. तसेच चैत्र प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रास सुरुवात होते. तर जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजन विधी-
 
चैत्र प्रतिपदा शुभारंभ
मंगळवार, 24 मार्च 2020 दुपारी 2:58 मिनिटे
 
चैत्र प्रतिपदा समाप्ती
बुधवार, 25 मार्च 2020 सायंकाळी 5:26 मिनिटे
 
पंचांगाप्रमाणे सूर्योदयाची तिथी मानली जात असल्यामुळे गुढीपाडवा आणि पूजन 25 मार्च 2020 रोजी करावं. 
पूजनाची वेळ:
सूर्योदय: सकाळी 6:39 मिनिटे
सूर्यास्त: सायंकाळी 6:50 मिनिटे
 
या प्रकारे उभारावी गुढी
गुढीची उंच काठी बांबू पासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. 
काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते. 
ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुऊन पुसून घ्यावी.
त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवली जाते. 
तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावतात.
गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात. 
निरंजन लावून उदबत्ती ओवाळतात. 
दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात. 
दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवतात.
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीस परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरविली जाते. 
ह्या दिवशी आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतन देखील केले जाते. 
 
पंचांग वाचन
या दिवशी पंचांग वाचन केलं जातं. यादिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी शालेय साहित्य, पाटी, वह्या यांचे पूजन केलं जातं. 
 
पाटी किंवा कागदावर सरस्वतीची रांगोळी काढून पूजन केलं जातं. या दिवशी देवासमोर महत्त्वाचे कागद-पुस्तकं ठेवून त्यावर हळद-कुंकू, अक्षता वाहाव्या. फुले अर्पण करावी. मनोभावे नमस्कार करावा.